जमिनीवरुन मार्ग काढण्यावर ग्रामस्थांचा भर
जमिनीवरून मार्ग काढण्यावर ग्रामस्थांचा भर
सागरी महामार्ग; काळबादेवीतील ‘फ्लायओव्हर ब्रीज’ला विरोध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ः सागरी महामार्गावरील मिऱ्या-काळबादेवी पूल आणि त्यापुढील महामार्ग या संदर्भात घेतलेल्या काळबादेवी येथील विशेष ग्रामसभेत फ्लायओव्हर ब्रीजला विरोध करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२४ला झालेल्या ग्रामसभेने केलेल्या ठरावाप्रमाणे महामार्ग करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने दिलेला फ्लायओव्हरचा प्रस्ताव ग्रामस्थांना मान्य नाही. गावाबाहेरील काही उद्योजकांची मदत करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा संशय सरपंच पृथ्वीराज मयेकर यांनी व्यक्त केला आहे. काळबादेवी ग्रामपंचायतीत ७ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एमएसआरडीसीने दिलेल्या नवीन प्रस्तावानुसार जो सर्व्हे सुरू केला आहे तो आम्हाला मंजूर नाही. ५ सप्टेंबर २०२४ ला ग्रामसभेने जो ठराव मंजूर केला होता त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.
एमएसआरडीसीने या संदर्भात ग्रामसेविका, काळबादेवी ग्रामपंचायतीला दिलेल्या २४ एप्रिल २०२५च्या पत्रावरही उपस्थित ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्या पत्रामध्ये काळबादेवी पुलाची नवीन व सुधारित आखणी ग्रामस्थांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दाखवण्यात आली होती. त्याला ग्रामस्थांनी मंजुरी दिली, असा उल्लेख केला होता. त्यावरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. या सुधारित आखणीला काही ठाराविक ग्रामस्थांनी मंजुरी दिली होती. ती ग्रामसभा होती का, तसे असेल तर त्या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या प्रोसेडिंगवर सह्या का घेण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या सुधारित आखणीला व त्याबाबतच्या सर्व्हेला ग्रामसभेची मंजुरी नाही. निव्वळ ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे आणि जबरदस्तीने काही ठराविक लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
---
बंधाऱ्याच्या आतील बाजूने मार्ग आखा
ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे समुद्रकिनाऱ्यालगत धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या आतील बाजूने (पूर्वेकडील बाजूने) असलेल्या ग्रामस्थांच्या जागेतून हा महामार्ग जमिनीवरूनच आखला जावा व भोवारी येथील कै. परमानंद गावाणकर यांच्या कंपाउंडच्या बाजूने वळण घेऊन तो भोवारीतील शेतमळ्याच्या जागेतून आरेवारे रस्त्याला जोडला जावा, असा ठरावही ग्रामसभेने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.