हत्ती माघारी; दिवसाढवळ्या वस्तीत
62532
62533
62534
हत्ती माघारी; दिवसाढवळ्या वस्तीत
बागायती पायदळीः हत्ती पकड मोहीमेबाबत हालचालीच नसल्याने संताप
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ८ः झोळंबेकडे सरकलेला हत्तींचा कळप पुन्हा एकदा माघारी फिरला आहे. त्यांनी कोलझर आणि तळकट भागात पुन्हा मुक्काम ठोकत नुकसानीची तीव्रता वाढवली आहे. हत्ती तळकटमध्ये दिवसाढवळ्या वस्तीत घुसल्याने स्थानिकांची तारांबळ उडाली. हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत काहीच हालचाली नसल्याने स्थानिकांची भिती वाढली आहे.
५ हत्तींचा कळप गेला दीड आठवडा या भागात धुमाकुळ घालत आहे. वस्तीत घुसून त्यांनी बागायतीचे मोठे नुकसान केले. कोलझर आणि तळकट या गावांच्या सिमेवर बाद्याची राय येथे दाट जंगल आणि पाण्याची सोय असल्याने दिवसा ते या भागात स्थिरावत आहेत. रात्री खाली उतरून बागायतीचे नुकसान करत होते. गेले दोन दिवस ते थेट वस्तीत दिवसाढवळ्या घुसू लागल्याने हे संकट आणखी गडद झाले आहे.
हा कळप मंगळवारी रात्री तळकटमार्गे झोळंबेच्या दिशेने रवाना झाला. तो या भागातून खडपडेमार्गे चंदगड किंवा केरच्या दिशेने जाईल असा अंदाज होता; मात्र तो फोल ठरला. मंगळवारी रात्रभर हे हत्ती झोळंबेतील बागायती असलेल्या भागात होते. सकाळी वनविभागाच्या पथकाने फटाके लावून त्यांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा कळप वरच्या जंगलमय भागात जावून स्थिरावला; मात्र काल सायंकाळी तो तळकटच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागला. तेथे थेट वस्तीत हत्ती घुसल्याने स्थानिकांची तारांबळ उडाली. या कळपात ओंकार हा टस्कर अधीक आक्रमक असल्याने भितीचे सावट आणखी गडद झाले आहे. सोबत असलेल्या वनविभागाच्या पथकाने त्यांना वस्तीपासून दूर करायचा प्रयत्न केला; मात्र बागायतीत घुसून त्यांनी धुडगूस घातला. तळकटमधील स्मशानभूमीजवळ असलेल्या बागायतीत नारळ, सुपारी, केळी अशी झाडे त्यांनी पायदळी तुडवली. यात सुनील सावंत यांचे मोठे नुकसान झाले.
हा कळप आज सकाळी कोलझर आणि तळकट गावाच्या सिमेवरील मालकी जंगलात स्थिरावला आहे. तेथून तो पुन्हा एकदा या दोन्ही गावात नुकसानीची परिसीमा गाठण्याची शक्यता आहे. या संकटाने स्थानिक दहशतीखाली आहे. हत्तींना परत पाठवण्यासाठी वनविभागाच्या कोणत्याच हालचाली नसल्याने संताप वाढला आहे.
चौकट
अभ्याससत्रात होताहेत स्थानिकांना मरणयातना
या हत्तींपैकी ओंकार या टस्कराने मोर्लेमध्ये शेतकऱ्याचा बळी घेतला होता. या नंतर स्थानिकांचे मोठे आंदोलन झाले. यावेळी या हत्तीला हटवण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र हत्ती हटावसाठी पुढे फारशा हालचाली झाल्या नाहीत. वनचे अधिकारी या हत्तींच्या वागणुकीबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगत आहेत; मात्र या अभ्याससत्रात स्थानिकांचे अक्षरशः मरण ओढवत आहे. उघड्या डोळ्यांनी बागायतीचे नुकसान होताना पहावे लागत आहे. सायंकाळच्यावेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
चौकट
हालचाली होणार कधी?
हत्ती पकड मोहीमेसाठी कर्नाटक वनविभागाची मदत घेतली जाणार आहे. यासाठी कर्नाटकच्या वनविभागाशी सामंजस्य करार करावा लागणार आहे; मात्र याबाबतची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. हा करार झाल्याशिवाय पकड मोहीमेच्या पुढच्या हालचाली सुरू होणार नाहीत. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागत असेल तर हत्तींना किमान कोलझर परिसरातून माघारी तिलारीकडे नेण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.