लोटिस्माच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे रविवारी उद्घाटन
रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे रविवारी उद्घाटन
दुर्मिळ खजिना सुरक्षित : पाचशे वर्षांपासूनच्या वस्तू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण पालिकेचे प्रशासक विशाल भोसले आणि पुरातनवस्तू संग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
चार वर्षापूर्वीच्या भयावह महापुरात झालेल्या अपरिमित नुकसानीतून अत्यंत परिश्रमपूर्वक सावरलेले वस्तूसंग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभे राहिले आहे. या ठिकाणी मागील पाचशे वर्षांपासूनच्या अप्रतिम शिल्पकलेच्या व अलौकिक धातूशास्त्राच्या मूर्ती व ऐतिहासिक व अत्यंत दुर्मिळ शस्त्र ते अश्मयुगीन हत्यारांपर्यंतचा खजिना स्थानापन्न झाला आहे. हरणाच्या शिंगाचे ‘माडू’ हत्यार, शत्रूच्या शरीरात आणि विशेषतः पोटात मारून त्याची आतडी ओढणारे ‘गुर्ज’ हत्यार आदी विविध काळातील शस्त्रे, कोकणातील नारळाच्या झापांचे घर, शिमगा-संकासूर, ग्रामदेवतांची पालखी आदी ऐवज पाहता येणार आहेत. चिपळूणचे ‘लोटिस्मा’ वाचनालय पुस्तकांची केवळ देवाणघेवाण पुरते मर्यादित न राहाता मुक्त वाचनालय, कलादालन, ऐतिहासिक दस्तावेजाचं लोकजागरण यांसह स्वातंत्र्यसमरातील क्रांतीकारक व त्यांचे कार्य, स्पर्धा परीक्षार्थीसाठी अरविंद जाधव अपरान्त संशोधन संस्थेसह कार्यरत आहे.
------
महापुरात झाले होते उद्ध्वस्त
लोटिस्माचे हे संग्रहालय २०२१ मध्ये चिपळूणला आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झाले होते. संचालक मंडळाने पुरामुळे निर्माण झालेल्या चिखलातून एकेक वस्तू गोळा करून ठेवली होती. पालकमंत्री सामंत यांनी उद्ध्वस्त झालेल्या संग्रहालयाला भेट देऊन हे संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता. संग्रहालयाच्या या उद्घाटन समारंभाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोटिस्माच्या संचालक मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.