नियुक्ती द्या; अन्यथा बेमुदत उपोषण

नियुक्ती द्या; अन्यथा बेमुदत उपोषण

Published on

नियुक्ती द्या; अन्यथा बेमुदत उपोषण
आशा सेविकांचा इशारा ः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः आरोग्य सेविका भरती २०२३ अंतर्गत झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत असलेल्या (एएनएम) उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊनही या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. अद्यापही या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती पत्र दिलेले नाही. त्यामुळे कागदपत्र पडताळणीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध करून तत्काळ नियुक्ती द्यावी; अन्यथा बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा आरोग्य सेविका भरती पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
महिला आरोग्य सेविका पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी २०२४ मध्ये उमेदवारांच्या परीक्षा होऊन त्यानुसार १५० उमेदवारांची ऑनलाईन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली; मात्र अद्याप या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाकडून यासाठी नाहक विलंब केला जात आहे. या भरती प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांची सरसकट कागदपत्र पडताळणी करण्यात यावी व त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्रे देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
न्यायप्रविष्ठ बाब असतानाही फार्मासिसच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गने नियुक्तीपत्रे दिली आहेत. त्याच धर्तीवर महिला आरोग्य सेविका (एएनएम) भरती २०२३ मधील सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यातील पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावी, अशी मागणी १८ मार्चला केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली; मात्र कागदपत्र पडताळणी होऊनही अद्याप अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे कागदपत्र पडताळणीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध करून तत्काळ नियुक्ती द्यावी; अन्यथा बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा आरोग्य सेविका भरती पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी महिला आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नंदिनी नाईक, निधी राऊळ, चिन्मयी जाधव, स्मिता सावंत, अक्षता रावराणे, नीलम परब, विशाखा निगुडकर, दर्शना साऊळ आदींसह मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com