बळीराजाला काय हवंय याचा विचार शिक्षणात नाही

बळीराजाला काय हवंय याचा विचार शिक्षणात नाही

Published on

बोल बळीराजाचे---------लोगो
(३ मे टुडे ३)
कोकणात नेहमी तीन प्रश्नांची चर्चा होते. एक मोठे प्रकल्प, व्यवसाय नाहीत त्यामुळे नोकऱ्या नाहीत. मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर त्या शहरांचे आणि कोकणाचेही प्रश्न बनलेत. दुसरा विचार येथील उद्योगधंद्यांसाठी मनुष्यबळ नाही. कोकणचा सुप्रसिद्ध आंबा आणि मासेमारी व्यवसाय पूर्णतः नेपाळी कामगारांच्या जीवावर चाललाय. तिसरा आणि बुचकळ्यात टाकणारा प्रश्न हा की, माणसे काम करत नाहीत. त्यांना जबाबदारीची जाणीव नाही किंवा कामाप्रती ती पुरेशी गंभीर नाहीत. हे सारे प्रश्न माझ्या बळीराजाशी थेट निगडित आहेत आणि या प्रश्नांचे मूळ ‘शिक्षण’हेच आहे.
- rat९p३.jpg-
25N62688
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड, रत्नागिरी
----
बळीराजाला काय हवंय
याचा विचार शिक्षणात नाही
कोकणात आता शैक्षणिक सुविधांची काही वानवा नाही. भौतिक सुविधा आता खेडेगावातही पोहोचल्यात. जिल्हा परिषदेच्या शाळा तर आता अगदी एसटीही पोचत नाही तिथे आहेत. नवीन शैक्षणिक धोरण काय आहे ते अजून सर्वसामान्य स्तरापर्यंत पोचायचंय. ग्रामीण भागात मुलं शाळेत पोचलीत; पण शिक्षण मात्र त्यांच्यापर्यंत पोचलंय का? हा प्रश्न आहे. शैक्षणिक सुविधा आणि शिक्षण यातली दरी सुशिक्षित बळीराजाची नेमकी परीक्षा पाहतेय. त्यामुळेच की, काय शिकायचं हा प्रश्न व्यापक झालाय.
पंचविशीतील मुलांची जीवनशैली, आत्महत्यांचे प्रमाण, व्यसनाधीनता, नकारात्मकता...ही यादी खूप मोठी आहे. अगदी ठोबळ मानाने शिक्षण म्हणजे तरी काय? बुद्धी, शारीरिक कुवत, नशीब हे आपण वरून घेऊनच आलोय. याच्या मर्यादा आणि विकास यांची सांगड म्हणजे शिक्षण..! मग या शिक्षणाने व्यक्तीचं व्यक्तीमत्व खुलायला बहरायला हवं ना? आता मूल्यशिक्षण देण्याची गरज आली म्हणजे इंग्रजाळलेल्या शिक्षणव्यवस्थेत आपण किती खोलवर वाट लावून घेतलीय याची जाणीव होते. रत्नागिरीत आणि जवळपासच्या अनेक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात बोलायला जायचा योग येतो. कॉलेज जीवनानंतर आपण काय करणार याचं उत्तर एक टक्काही मुलं शेती असे देत नाहीत. बरं यातील बहुसंख्य मुलं घरी शेतीवाडी असलेलीच असतात! कोणालाच शेतीत ग्लॅमर दिसत नाही. काय आहेत कारणं..? मोठ्ठ आणि महत्वाचं कारण ‘फेक नॅरेटिव्ह’ पालकांनाच असं वाटतं की, जे मला माझ्या आयुष्यात ‘भोगावं’ लागलं ते माझ्या पुढच्या पिढीला भोगावं लागू नये. या फेक नॅरेटिव्हने साऱ्या शिक्षणव्यवस्थेतच दुबळेपणा आणलाय, जो माझ्या बळीराजाला कोकणातून उखडून टाकू पाहतोय. कोणी उद्योगपती, राजकारणी नाही..फक्त हाच अपप्रचार..!
आधीच शिक्षण कारकून बाबू बनवणारं, कौशल्य विकास, व्यवसायाभिमुख, तांत्रिक अनेक शाखा झाल्या; पण माझ्या बळीराजाला काय हवंय याचा विचार त्यात कुठेच नाही. अंक आणि अक्षरज्ञान म्हणजे शिक्षण नाही. माझ्या बळीराजाची पुढची पिढी शेतकरी व्हायला अष्टपैलूत्वही कमी पडेल. बरं होतं, पूर्वी मोठी घरं, त्यात मोठी कुटुंबे होती तेव्हा त्यातला कमीत कमी शिकलेला मुलगा शेती पाही..पण आता परिस्थितीत खूप बदल झालाय. मुळात कुटुंब छोटी झालीत. नाती कळायला ‘हम दो हमारा एक’च्या जमान्यात आत्ते, मावशी, ताई, माई नाहियेत. या एकांड्या शिलेदारांवर दशदिशांनी आव्हानं घोंगावतायं. मग शिक्षणानं तो प्रगल्भ होण्याऐवजी अभिमन्यू झालाय. या व्यवस्थेच्या तो चक्रव्युहात शिरलाय पण यशस्वीतेत परावर्तित होताना गुरफटतोय.
कोकणची निसर्गसंपन्नता हे वरदान खरेच मग माझा बळीराजा ‘गणपती बाप्पा मोरया’पुरताच घरी बाकी शहरात असं का? त्याला इथल्या रोजगाराच्या संधी दाखवणारं शिक्षण का नाही? आता आलेल्या आणि येऊ घातलेल्या उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ तयार करणारे कारखाने म्हणजे शिक्षणसंस्था त्यांनीच तयार केल्यात. हे इंग्रजांनी भारतीयांना त्यांना आवश्यक शिक्षण दिलं तसंच झालं; पण मग आपली शिक्षणव्यवस्था आपल्या निसर्गसंपन्नतेशी निगडित, इथल्या संधींना अनुकूल का नाही! नारळ, काजू, आंबा, मासे, भात, पर्यटन, मसाल्याचे पदार्थ, प्रक्रिया उद्योग इ. शिक्षणाचे विषय कधी होणार? मला लेखनासाठी शनिवार दिलाय. मारूतीला म्हणे, त्याच्या क्षमतांची आठवण न होण्याचा शाप होता. त्या क्षमतांची जाणीव झाल्यावर तो काय अफाट काम करू शकला, हे आपण जाणतोच. मला मिळालं ते निसर्गाचं देणंच छान होतं, आहे, असणार आहे हा वास्तविक दृष्टिकोन पालकमुलांसह शिक्षणव्यवस्थेत परावर्तीत होण्याची जाणीव समाजमनाला तो बजरंगबलीच करून देवो.

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com