कोलझरमध्ये आढळला दुर्मिळ ‘नाकाड्या साप’
62726
कोलझरमध्ये आढळला दुर्मीळ ‘नाकाड्या साप’
महाराष्ट्रातील दुसरी नोंद ः स्थानिक तरुणांनी घेतले छायाचित्र
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ९ ः ‘हंप नोस्ड पिट वायपर’ अर्थात नाकाड्या साप या अत्यंत विषारी असलेल्या दुर्मीळ सापाचे येथे दर्शन झाले आहे. महाराष्ट्रातली हा साप मिळण्याची ही दुसरी नोंद आहे. याआधी तिलारी खोऱ्यात ही प्रजाती आढळली होती. स्थानिक तरुणांना येथील शिडप भागात हा साप आढळला.
नाकाड्या साप अत्यंत विषारी असला तरी तो फार कमी प्रमाणात आढळतो. दक्षिण भारतात पश्चिम घाटाच्या कमी ते मध्यम उंचीच्या प्रदेशात त्याचा अधिवास आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेपासून ते केरळ आणि तामिळनाडूपर्यंत तो आढळतो. श्रीलंकेतही त्याची नोंद झाली आहे. पालापाचोळ्यात आणि दाट झुडपांमध्ये विश्रांती घेणारा हा साप सकाळी आणि रात्री सक्रिय असतो. काहीवेळा सूर्योदयावेळी पाण्याच्या प्रवाहाजवळ कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी तो बाहेर पडतो. त्याचा आकार लहान असून डोके चपटे आणि त्रिकोणी असते. तोंडाच्या पुढील भागावर नाकाकडे असलेल्या उंचवट्यावरून त्याचे ‘हंप नोस्ड’ असे नाव पडले आहे. त्याचा रंग प्रामुख्याने तपकिरी, राखाडी किंवा फिकट तपकिरी असून शरीरावर गडद रंगाचे अनियमित ठिपके किंवा पट्टे असतात. पोटाकडचा भाग फिकट असतो. तो साधारण दोन फुटांपर्यंत वाढू शकतो. पाली, लहान बेडूक, सरडे, लहान पक्षी आदी त्याचे भक्ष्य असते. तो रात्रीच्या वेळी सक्रिय होतो. आक्रमक नसला तरी त्याला डिवचल्यास जोरदार प्रतिकार करतो. त्याच्या चाव्याने मृत्यूही ओढवू शकतो.
सध्या या सापाला संकटग्रस्त प्रजातीत वर्गीकृत केलेले नाही. मात्र, जंगलतोड, अधिवासाचा नाश यामुळे त्याची संख्या कमी होत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात आधी याची नोंद जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात झाली होती. गुरुवारी (ता. ८) कोलझर-शिडप या भागात तेथील स्थानिक अमर सावंत, सिद्धेश देसाई, साई देसाई, छोटू देसाई, दीपक देसाई, अजित सावंत, मारुती सावंत, मुन्ना देसाई आदींनी या सापाचे पाणवठ्याजवळ दर्शन झाले. आकार आणि रंग वेगळा असल्याने त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली.
----------------
कोट
‘हंप नोस्ड पिट वायपर’ अर्थात नाकाड्या साप हा दुर्मीळ प्रजातीत येतो. दोडामार्ग तालुक्यात याचा आढळ आहे. याआधी तिलारी खोऱ्यात त्याचे दर्शन झाल्यानंतर काही अभ्यासकांनी त्यावर शोधनिबंध प्रसिद्ध करत ही नोंद अधिकृत केली होती. कोलझरमध्ये तो सापडणे ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे. दोडामार्ग तालुक्यात समृद्ध पर्यावरण असल्याने येथे साप, पक्षी, प्राणी, कीटक आदींच्या दुर्मीळ प्रजाती आढळतात.
- डॉ. गणेश मर्गज, वन्यजीव अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.