माजगाव प्रभारी सरपंचपदी रिचर्ड डिमेलोंची निवड
माजगाव प्रभारी सरपंचपदी
रिचर्ड डिमेलोंची निवड
सावंतवाडीः माजगावच्या सरपंचा अर्चना सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी विद्यमान उपसरपंच रिचर्ड डिमेलो यांची निवड केली. सांवंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत तो सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तसा अहवाल जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ग्रामपंचायत अधिनियमानुसार विद्यमान उपसरपंच रिचर्ड डिमेलो यांची पुढील कालावधीसाठी निवड केली आहे. यावेळी संजय कानसे, संतोष वेजरे, ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी, गीता कासार, माधवी भोगण, प्रज्ञा भोगण, ऊर्मिला मोर्ये, विशाखा जाधव, मधु कुंभार, पुजा गावडे उपस्थित होते.
------------------
मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी
सावंतवाडीत निवड चाचणी
सावंतवाडीः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांच्या लेदरबॉल क्रिकेट साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १५ वर्षांखालील मुलींचा संघ निवडण्यासाठी येथील जिमखाना मैदानावर सोमवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निवड चाचणी होणार आहे. १ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०१३ या कालावधीत जन्मलेल्या मुलींना या निवड चाचणीत सहभागी होता येईल. खेळाडूंनी पूर्ण गणवेशात, आधारकार्ड (सध्याच्या फोटोसह) सोबत आणावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन गुरुनाथ चोडणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रघुनाथ धारणकर यांच्याशी संपर्क साधावा.
-----------------
खांबाळे येथे सोमवारी
संयुक्त जयंती उत्सव
वैभववाडीः बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जागर समतेचा-महापुरुषांच्या विचारांचा हा भव्य जयंती महोत्सव सोमवारी (ता.१२) सकाळी ९.३० वाजल्यापासून खांबाळे-बौद्धवाडी येथे होणार आहे. या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन खांबाळे बौद्ध विकास मंडळ, मुंबई-ग्रामीण, महिला मंडळ यांच्यावतीने केले असून शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. सकाळी ९.३० ते १० धम्म ध्वजारोहण व बुद्ध पूजापाठ, १०.३० ते ११ गुणवंत विद्यार्थी गौरव, ११ ते १२ प्रबोधनात्मक व्याख्यान-जयवंत मोरे, ३ ते ४ वाजता महिला व मुलांसाठी फनी गेम्स, रात्री ९ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
----------------
चिंदर ब्राह्मणदेव मंदिरात
उद्या धार्मिक कार्यक्रम
मालवणः चिंदर-हडकरवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिरात रविवारी (ता.११) धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री १० वाजता ब्राह्मणदेव नाट्य मंडळ, चिंदर सडेवाडी निर्मित ''चांदणे शिंपीत जा'' नाटक सादर होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळ, चिंदर सडेवाडी हडकरवाडी यांनी केले आहे.
-------------
कणकवलीत उद्या
धार्मिक कार्यक्रम
कणकवलीः आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, कणकवली-कुडाळतर्फे हरे कृष्ण सत्संग भवनास दोन वर्ष पूर्ण झाल्याने येथे रविवारी (ता.११) ब्रह्मोत्सव व नरसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ६ वाजता कीर्तन, ६.३० वाजता गौर आरती, ७ वाजता कथा, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वाजता महाआरती, पुष्पाभिषेक, ९ वाजता महाप्रसाद होणार आहे. या आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
--------------
चौकुळ मल्लनाथचा
१४ ला कलशारोहण
आंबोलीः चौकुळ, खडपडे येथील श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा बुधवारी (ता.१४) सकाळी ११.५० या शुभमुहुर्तावर आयोजित केला आहे. हा कार्यक्रम १२ ते १४ मे असा होत आहे. या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन चौकुळ, कुंभवडे, खडपडे गावचे प्रमुख मानकरी, गावकरी, ग्रामस्थ मंडळींनी केले आहे. चौकुळ, खडपडे येथील श्री देव मल्लनाथ, श्री सातेरी देवी, श्री भावई देवी, भूतनाथ, वेताळ व लिंग सहपरिवार देवता स्थिर प्रतिष्ठा आणि श्री देव मल्लनाथ प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा बुधवार १४ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. यापूर्वी १२ ला सकाळी ८ ते १ या वेळेत प्रायश्चित (खौर), पुण्याहवाचन, जलाधिवास आदी कार्यक्रम होणार आहेत. १३ ला सकाळी ८ ते १ या वेळेत प्राकारशुद्धी, मुख्य देवता स्थापन, वास्तू-गृहयज्ञ, पर्याय होम आदी कार्यक्रम होणार आहेत. १४ ला सकाळी ८ ते दुपारी १ प्राकारशुद्धी, स्थापित देवता पूजन, शिखर स्थापना, देवता स्थिर प्रतिष्ठा, बलिदान, पूर्णाहुती, गाऱ्हाणे, आरती आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
---------------
पावशीत उद्या
निळ उत्सव
कुडाळः पावशी येथील श्री देवी सातेरीचा पारंपारिक निळ उत्सव सोमवारी (ता.१२) साजरा होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादास प्रारंभ होईल. सर्व म्हाडेश्वर वंश घराण्यांनी तसेच ग्रामस्थ व भाविकांनी आपल्या घराण्याच्या संरक्षणार्थ व राखणीसाठी होणाऱ्या या पुजा अर्चा सोहळ्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन म्हाडेश्वर ज्ञातीबांधव यांनी केले आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.