देवी भगवती चरणी भाविक नतमस्तक
63282
देवी भगवती चरणी भाविक नतमस्तक
डाळपस्वारी उत्साहात; चाकरमान्यांसह हजारो भाविकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १२ ः येथील देवी भगवतीची डाळपस्वारी उत्साहात व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. फटाक्यांच्या आतषबाजीत वाडीवाडीमध्ये देवीचे आणि भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तीन वर्षांच्या मर्यादापूर्ण डाळपस्वारीस गुरुवारपासून (ता. ८) सुरुवात झाली होती.
देवी भगवतीचा त्रैवार्षिक डाळपस्वारी सोहळा ८ ते ११ मे या कालावधीत झाला. गावामध्ये तीन दिवस मुक्काम करून चौथ्या दिवशी रविवारी (ता. १२) रात्री देवी भगवती रयतेच्या लवाजम्यासह मंदिरात आली. भगवती मंदिरामध्ये सर्व देवस्थळांना भेट देऊन देव स्थिर झाले. या अलौकिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील ग्रामस्थांनी जानेवारीपासूनच रेल्वे आणि एसटी तिकिटांचे आरक्षण करून ठेवले होते. हजारो मुंबईकर ग्रामंस्थ या डाळपस्वारी सोहळ्याला उपस्थित होते. गुरुवारी (ता. ८) दुपारी ४ वाजता देवी भगवतीने ग्रामस्थ व भाविकांसह डाळपस्वारीस भगवती मंदिरातून सुरुवात केली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी बांबरवाडी देवी बायचीची अभिषेक, पूजा व नैवेद्य झाला. सकाळी १०.३० वाजता देवीने डाळपस्वारीस पुढे जाण्यासाठी कौलप्रसाद दिला. दुपारी २ वाजता कारीवणेवाडी येथील श्री ब्राह्मण देवाची भेट देऊन आडबंदरवाडी चव्हाटा मंदिर येथे प्रस्थान केले. आडबंदर येथे देव चव्हाटाची भेट घेऊन आपईवाडी रात्री विठोबा मंदिर येथे मुक्काम झाला. तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १०) सकाळी देव विठोबाची अभिषेक, पूजा व नैवद्य, दुपारी अडीज वाजता आडवळवाडी ब्राह्मण देव मंदिर येथे भेट घेऊन भंडारवाडी देव जळबांधा येथे प्रस्थान केले. तेथून भंडारवाडी मार्गे सडेवाडी मंदिरास भेट व रात्री ११ वाजता कांबरदेव मंदिरात रात्री मुक्काम केला. चौथ्या दिवशी (रविवारी ता. ११) सकाळी कांबरदेवची अभिषेक, पूजा व नैवेद्य करून दुपारी २ वाजता लब्देवाडी देव जांभळकी भेट, तेथून सावंतवाडी मोऊळ येथे भराडीस भेट, तेलीवाडी, हरिजनवाडी, आईरवाडी, देऊळवाडी येथून देवी भगवतीचे मंदिरामध्ये रात्री १२ वाजता आगमन झाले. देवीच्या मुक्काम स्थळी ओटी भरणे, तळी देणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम झाले. देवीच्या (तरंग) अवसरांनी अडचणीत असलेल्या भक्तांना मार्ग सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.