ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांनी निःश्वास सोडला

ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांनी निःश्वास सोडला

Published on

rat13p1.jpg
63383
रत्नागिरीः प्रवाशांची गैरसोय दूर करता रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून धावली लालपरी.
-------------
ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांनी निःश्वास सोडला
मध्यवर्ती बसस्थानकातून लालपरी धावली; रखडलेले काम १८ महिन्यात पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकाचे सात वर्षे रखडलेले काम अखेर पूर्ण झाले आहे. बसस्थानक नसल्यामुळे ऊन-पावसाचा मारा झेलत गाड्यांची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांनी निःश्वास सोडला आहे. रस्त्याच्या बाजूला एसटीची वाट बघत बसण्याचा प्रवाशांचा वनवास संपला आहे.
राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सात वर्षे रखडले होते. जुन्या ठेकेदाराला काढून हे काम निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी अवघ्या १८ महिन्यात हे बसस्थानक पूर्ण केले. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामामुळे १२ वर्षांपूर्वी बसस्थानक रहाटागर येथे स्थलांतरित केले होते. त्यामुळे सर्व गाड्या रहाटागर येथूनच धावत होत्या. सुरवातीला बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या एसटी बसस्थानकाचे काम रखडले होते. हे काम सुरू करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते; पण ठेकेदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. उद्योगमंत्रीपद मिळाल्यानंतर सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला तसेच जुन्या ठेकेदाराकडील काम काढून निर्माण कंपनीला ठेका दिला. त्यांनी दर्जेदार काम करत बसस्थानकाच्या इमारतीचे काम पूर्ण केले. रविवारी याचा लोकार्पण सोहळा झाला आणि सोमवारपासून लालपरी नव्या बसस्थानकातून धावू लागली आहे. गेली सात वर्षे भरउन्हात बसची वाट पाहत राहण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. कधी उन्हाचा तर कधी पावसाचा तडाखा झेलत प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते. नूतन बसस्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

चौकट
बसस्थानकाची दुमजली इमारत
रत्नागिरीतील या बसस्थानकाची इमारत दुमजली आहे. तळमजल्यावर शहरी तर वरच्या मजल्यावर ग्रामीण, लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. शहरी बसेस दिवसाला ५०० तर ग्रामीण, लांब व मध्यम पल्ल्याच्या दिवसभरात १००० गाड्या धावतात.

कोट
पूर्वी एसटीची शहरी बस वेळेवर येत नसल्यामुळे खासगी गाड्याने जावे लागत होते; मात्र आता बसस्थानकाची स्मार्ट इमारत झाली आहे. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यात आली आहे. सर्वांनी बसस्थानक स्वच्छ ठेवावे आणि एसटी महामंडळाने वेळेत गाड्या सोडाव्यात म्हणजे प्रवासीवर्ग अजून सुखावेल.
- मंथन खापरे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com