दहशतवादाविरुद्ध ‘इंटरनॅशनल फ्रंट’ आवश्यक
63463
दहशतवादाविरुद्ध ‘इंटरनॅशनल फ्रंट’ आवश्यक
सुरेश प्रभू ः केवळ सैन्य कारवाईने प्रश्न सुटणार नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः भारतीय सैन्याने पाकिस्तानमधून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्य दहशतवादाविरुद्धच्या या कारवाईत पूर्णपणे यशस्वी झाले आहे. पाकिस्तानलाही दहशतवादाचे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘इंटरनॅशनल फ्रंट अगेन्स्ट टेररिस्ट’ उभारण्याची गरज आहे. केवळ सैन्य कारवाईने दहशतवाद संपणार नाही, तर त्यांच्या मनात भरवलेली विषवल्ली दूर करणेही आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय मंत्री तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सुरेश प्रभू यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
श्री. प्रभू म्हणाले, ‘‘पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, ज्यांचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नव्हता. अशा पर्यटकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते आणि भारताने ते दिले. हे युद्ध १९६५ किंवा १९७१ सारखे मोठे नसून ते मर्यादित स्वरूपाचे होते. केंद्राने आणि देशातील नागरिकांनी दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला होता. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर यशस्वी हल्ले करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताच्या या प्रभावी कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी भारताच्या सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून युद्ध थांबवण्याची विनंती केली. भारताने आपले जे उद्दिष्ट्य निश्चित केले होते, ते साध्य झाल्यावर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नव्हता. पाकिस्तानलाही दहशतवादाचे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘इंटरनॅशनल फ्रंट अगेन्स्ट टेररिस्ट’ उभारण्याची गरज आहे. केवळ सैन्य कारवाईने दहशतवाद संपणार नाही, तर त्यांच्या मनात भरवलेली विषवल्ली दूर करणेही आवश्यक आहे.’’
पाकिस्तानात आजही दहशतवादी अड्डे कार्यरत आहेत आणि तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तानमधील कमजोर राजकीय नेतृत्व दहशतवाद्यांच्या अशा कृत्यांना प्रोत्साहन देत असते. मात्र, आता भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की अशा दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. दहशतवाद हा जागतिक स्तरावर एक गंभीर प्रश्न असल्याचेही श्री. प्रभू यावेळी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या ‘व्यापार युद्धा’ची चर्चा सुरू असल्याचा उल्लेख करत प्रभू यांनी सांगितले की, वाणिज्य मंत्री असताना त्यांनी ट्रम्प प्रशासनाशी या संदर्भात चर्चा केली होती. चाळीस वर्षांपूर्वी कोणताही देश स्वतःचे उत्पादन करून कुठेही विकू शकत होता. या परिस्थितीत चीनने जागतिक बाजारपेठ काबीज केली. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून ही परिस्थिती बदलली आहे. आता प्रत्येक देश स्वतःभोवती संरक्षण भिंत उभी करत आहे, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा परिस्थितीत भारताने परदेशी बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपल्या जीवनावर आणि व्यापारावर कसा परिणाम होतो, हे स्पष्ट करताना प्रभू यांनी पूर्वी फिलिपिन्सहून नारळ भारतात आल्याने नारळाचे दर कसे घसरले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या काजूमुळे काजूच्या दरावर कसा परिणाम झाला होता, याची उदाहरणे दिली. त्यामुळे यापुढील काळात आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारे बदल आणि त्याचे आपल्या जीवनावरील व व्यापारावरील परिणाम याबद्दल समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेषतः कोकणात याबद्दल अधिक जनजागृती झाली पाहिजे.’’ देशाच्या एकतेवर जोर देताना प्रभू म्हणाले, ‘‘प्रत्येक भारतीयाने आता एकसंध झाले पाहिजे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रधर्म महत्त्वाचा मानला पाहिजे. प्रत्येकाने देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि ते जपतानाच राष्ट्रधर्मालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. यावेळी त्यांच्यासोबत नकुल पार्सेकर उपस्थित होते.
---------------
‘कोरे’च्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधणार
कोकण रेल्वेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त करत प्रभू म्हणाले की, ‘‘लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधणार आहे. मी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, तो निधी खर्च न झाल्याने हा मार्ग रखडला आहे. मी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी प्रयत्न केले आणि आता दुपदरीकरण सुरू आहे. आपल्या प्रयत्नांमुळे रेल्वेचे विद्युतीकरणही झाले आहे. आता कोकण रेल्वेच्या सर्व समस्या सुटायला हव्यात.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.