पर्यटनाचा शेवटचा टप्पा अडचणीत

पर्यटनाचा शेवटचा टप्पा अडचणीत

Published on

swt१४.jpg मध्ये फोटो आहे.
63739
63740
63738
मालवणः येथील किनाऱ्यावर देशविदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

पर्यटनाचा शेवटचा टप्पा अडचणीत
उन्हाळी हंगामः उष्मा, मंदीसह युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम
प्रशांत हिंदळेकरः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ः वातावरणात वाढलेली उष्णता, निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या शाळा व आर्थिक मंदीसह माशांचे गगनाला भिडलेले दर याचा फटका पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात बसला आहे. पर्यटक केवळ शुक्रवार ते रविवार याच कालावधीत येत असल्याने किनारपट्टी भागात गर्दी होत असली तरी त्यांचा मुक्काम नसल्याने याचा मोठा फटका निवासव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे हंगामातील शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या दिवसात पावसाळ्यातील चार महिन्यांची बेगमी कशी होणार? या विवंचनेत सध्या पर्यटन व्यावसायिक असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या पर्यटन हंगामाची सुरुवात दिमाखात झाली. ऑक्टोबरपासून सुरुवात झालेल्या या हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी जिल्ह्यात झाली. पर्यटकांचा ओढा किनारपट्टी भागाकडे असल्याने तारकर्ली, देवबाग, वायरी भूतनाथ, दांडी, बंदर जेटी, चिवला बीच, आचरा, तळाशील बीच याकडे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे तसेच त्यांच्याकडून साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटला जात असल्याचे दिसून आले. यातून पर्यटन व्यावसायिकांचा चांगला व्यवसायही झाला.
जानेवारी व फेब्रुवारीतही येथे पर्यटकांचा ओघ बऱ्यापैकी होता; मात्र दहावी, बारावी परीक्षांमुळे किरकोळ पर्यटकच येथे दाखल झाले. या परीक्षा झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून बाळगली जात होती; मात्र माध्यमिक शाळा एप्रिलच्या २५ तारखेपर्यंत सुरू राहिल्याने मे मधील सुटीचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबवत्सल पर्यटक फारच कमी प्रमाणात दाखल झाले. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले.
पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अधिकारी वर्गाच्या सुट्या रद्द झाल्या. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतून येथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. ऐन पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांची संख्या रोडावल्याने त्याचा फटका साहसी जलक्रीडा प्रकारांसह अन्य छोट्या पर्यटन व्यावसायिकांना बसला.
वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे पर्यटक कमी प्रमाणात येथे दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. मेमध्ये येथील पर्यटन हंगाम ''हाउसफु्ल्ल'' असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले; मात्र यावेळी पर्यटक केवळ शुक्रवार ते रविवार या सलग सुटीच्या काळातच येथे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी होत आहे.
मे मधील पर्यटन हंगामात किनारपट्टी भागात पर्यटकांकडून निवासाचे आगाऊ आरक्षण केले जात होते; मात्र यावेळी अशी परिस्थिती किनारपट्टी भागात दिसून आली नाही. येथे येणारे पर्यटक केवळ साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटून, किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन तसेच अन्य पर्यटन स्थळांना भेट देऊन माघारी परतत असल्याचे दिसून आले. त्यामुळे किनारपट्टी भागातील निवास व्यवस्थेला मोठा फटका बसला असल्याचे चित्र आहे. हंगामातील शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे पावसाळ्यातील चार महिन्यांची बेगमी कशी होणार, अशी चिंता सध्या पर्यटन व्यावसायिकांना भेडसावत आहे.
हंगामात माशांची जशी आवक अपेक्षित असते, तशी यावेळी झाली नाही. स्थानिक बाजारपेठेत किंमती मासळीची म्हणावी तशी आवकच झाली नाही. परिणामी हॉटेल व्यावसायिकांना किंमती मासळीची मुंबई, रत्नागिरी, गोव्यातून आयात करावी लागली. परिणामी माशांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून आले. याचा फटका मत्स्यखवय्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

चौकट
सहा-सात दिवसांचा हंगाम आता शिल्लक
येथील पर्यटन हंगामाची सांगता २५ मे पासून होणार आहे. त्यामुळे येथील किल्ले दर्शन, साहसी जलक्रीडा प्रकार बंद होणार आहेत. शिवाय हवामान विभागाने यावेळी २० मे नंतर पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता पर्यटन हंगामात केवळ सहा-सात दिवसांचा व्यवसाय पर्यटन व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माशांचे दर
सुरमई १३०० रुपये किलो, पापलेट १७०० रुपये किलो, बांगडे १००० रुपये टोपली, छोटी कोळंबी ५०० रुपये किलो, व्हाईट कोळंबी ६५० रुपये किलो, सरंगा ७०० रुपये किलो, तिसरे ३०० रुपये किलो.
थाळ्यांचे दर
पापलेट ५५० रुपये, सुरमई ६५० रुपये, कोळंबी ५०० रुपये, बांगडा २५० रुपये, तिसरे ५५० रुपये.

कोट
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मेमध्ये पर्यटकांची संख्या घटली आहे. वातावरणातील वाढलेली उष्णता, आर्थिक मंदी, युद्धजन्य परिस्थिती या सर्वांचा परिणाम यावेळी येथील पर्यटनावर झाला आहे. गतवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने चांगला व्यवसाय झाला; मात्र यावर्षी हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाही म्हणावा तसा व्यवसाय झालेला नाही. पर्यटक केवळ आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसांसाठीच येथे येत आहेत; मात्र दरदिवशी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
- मीरा म्हाडगुत, पर्यटन व्यावसायिक

कोट
यावर्षीच्या हंगामात पर्यटक केवळ शुक्रवार ते रविवार या दिवशीच येत आहे. अन्य दिवस हे ‘स्लॅग’ जात आहेत. यात माशांचे दरही गगनाला भिडलेले आहेत. स्थानिक बाजारपेठेत किंमती माशांची आवकही नाही. त्यामुळे मत्स्यखवय्यांचा हिरमोड झाला. पर्यटकांचे वास्तव्यच नसल्याने त्याचा मोठा फटका निवास व्यवस्थेला बसला आहे. यात कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे पर्यटकांचे वास्तव्य कमी झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जो प्रतिहल्ला झाला, त्याचा परिणामही येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून आले. शाळा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे पर्यटन हंगाम उशिराने सुरू झाला. येथे १५ एप्रिलपासून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची अपेक्षा होती; मात्र पर्यटक २८ एप्रिलनंतरच येथे दाखल होऊ लागले. स्थानिक पातळीवर प्रस्थापित व्यावसायिकांचा व्यवसाय झाला; मात्र छोट्या पर्यटन व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे नव्या हंगामास कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. आंब्याचा दरही अद्याप उतरलेला नाही. सद्यस्थितीत आंब्याच्या डझनाचा दर ५०० रुपये एवढाच असल्याचे दिसून येत आहे. आंब्याचा माल कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com