शिंदे शिवसेनेत नव्या-जुन्यांना न्याय देण्याचे आव्हान
शिंदे शिवसेनेत नव्या-जुन्यांना न्याय देण्याचे आव्हान
नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा ; एक व्यक्ती एक पदाची शक्यता
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी न्यायालयीन आदेशानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षीय पातळीवरील रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. याला शिंदे शिवसेना अपवाद असून खेड, मंडणगड, दापोली वगळता उर्वरित सहा ठिकाणच्या तालुका कार्यकारिणी, जिल्हाप्रमुखांसह सर्व पदांवरील नियुक्त्यांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ठाकरे शिवसेनेतील अनेक शिलेदार शिंदे शिवसेनेत गेल्यामुळे नवीन कार्यकारिणीतील निवडीत नव्या-जुन्यांना न्याय देताना पालकमंत्र्यांना कसरत करावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांनी गेल्या अडीच वर्षात आपला पक्ष मजबूत राहण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. सत्ता असल्यामुळे शिंदे शिवसेनेचा वरचष्मा राहिला असला तरीही ठाकरे सेनेचा तळागाळातील कार्यकर्ता टिकवून आहे. त्याची प्रचिती लोकसभा आणि विधासनभा या दोन्ही निवडणुकीत आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे शिलेदार शिंदे शिवसेनेकडे वळले. त्याच दक्षिण व उत्तर जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी आमदार संजय कदम यांच्यासह बंड्या साळवी, रोहन बने, सुभाष बने, राजेंद्र महाडिक, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा समावेश आहे. या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांना उचित न्याय देण्याची जबाबदारी ही शिंदे शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर राहणार आहे. मागील महिन्यात जिल्हा कार्यकारिणी, सहा तालुक्यांमधील तालुका कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. नवीन निवडी होईपर्यंत विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर झालेल्या मेळाव्यामध्ये पालकमंत्री सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देतानाच नव्या-जुन्यांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सूचना दिली होती. करबुडे येथे झालेल्या एक मेळाव्यामध्ये त्यांनी काम करणाऱ्यांना पदे दिली जातील, असा सुतोवाच केले होते. त्यामुळे नवीन कार्यकारिणीत कुणाकुणाला संधी दिली जाणार, याकडे लक्ष आहे.
गेल्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या परिस्थितीत शिंदे शिवसेनेची नवीन कार्यकारिणीची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही मंत्री सामंत यांना निवडून आणण्यासाठी निकटवर्तीयांनी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे जिल्ह्यासह तालुका कार्यकारिणीतील प्रमुख पदांवर जुन्यांचीच वर्णी लागावी, अशी अपेक्षा राहणार आहे. नव्याने पक्षप्रवेश झालेल्यांना आपल्या ताकदीनुसार न्याय मिळेल, अशी आशा असेल. यामध्ये सुवर्णमध्य काढताना एक व्यक्ती एक पद संकल्पना राबवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
------
कोट
सभासद नोंदणीची मोहीम सर्वत्र सुरू आहे. जास्तीत जास्त नोंदणी करण्यावर आमचा अधिक भर आहे. कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकारिणी हा पक्षीय पातळीवरील निर्णय आहे.
- बाबू म्हाप, प्रभारी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.