कोकणी व्यवस्थापनेचे धडे

कोकणी व्यवस्थापनेचे धडे

Published on

गावच्या मालका.............लोगो
(४ मे पान ६)

कोकणातील गावागावातील व्यवस्थेचा उत्तम नमुना म्हणजे पूर्वसुरींनी घालून दिलेली कामांची पद्धत. मग दिवाळीला साऱ्या गावाने देवळात जमून देवाला दिवा दाखवून फराळाचा नैवेद्य दाखवणे असेल किंवा जागराला देवाचे पोवते (रक्षा कवच) धारण करणे असो वा थोरल्या दिवाळीला खेळ्यांचे उद्‍घाटन करणे असो, सारी कामे वेळेवर अन् शिस्तीत केल्या जातात. अन् या सर्व कामे करणाऱ्या सेवेकऱ्यांना मानकऱ्याचा, खुमकऱ्याचा दर्जा दिलेला आहे पूर्वजांनी. त्यामुळे जो तो आपल्या कामावर म्हणजेच मानावर हजर असतो. गावाच्या रचनेत राजसत्ता अन् पूर्वसत्ता असे दोन भाग असतात. राजसत्तेच्या प्रमुख मानकऱ्याचा हुकूम घेऊन पूर्वसत्तेचा प्रमुख ज्याला गावाचा गांवकर म्हणतात. त्याच्या हाताखालील खुमदार म्हणजेच वाडीप्रमुख यांच्याकडून गावकर देवस्थानाची कामे करून घेतो.

- rat१७p१.jpg-
25N64395
- अप्पा पाध्ये, गोळवली
---
कोकणी व्यवस्थापनेचा धडा
कोकणात, विशेषत: रत्नागिरी-सिंधुदुर्गात ग्रामदैवताचे मंदिर असतेच असते अन् त्यावर गावाची नितांत श्रद्धा असते. ग्रामदैवत म्हणजे एकतर देवी वा शंकराची किंवा विष्णूची प्रमुख मूर्ती असते अन् त्यांचे गण असतात. उदा., मारका, मान्या, खुन्या, निर्वंशी निराकार, जैन कांड, ब्राह्मणकांड, लिंगडी मालकी, बायंगं वगैरे. यातील बहुतांशाना वर्षातून एकदोन वेळेला कोंबडे, बकरे, नारळ यांचा नैवेद्य, त्याला भक म्हणतात... द्यावा लागतो. ग्रामदेवता जर देवी असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारी पूजा होते अन् गावाच्या भल्यासाठी कौल घेतला जातो. खूप ठिकाणी पुजारी हे भाविक गुरव किंवा लिंगायत गुरव असतो. पुजारी मूर्तीच्या कासेवर (कंबरेवर), अमृतावर (छातीवर) अथवा हातावर पपईचे, तगरीचे कळे किंवा निगडीची पाने वा भाताचे दाणे पाण्यात भिजवून चिकटवतात. मग जो गावठ्या असतो तो देवाजवळ विनवणी करतो की, गावात काही आक्रित घडणार नाही ना? गावातील सुखाला गालबोट लागणार नाही ना? तर उजवी कळी सोड, तशी ती कळी आली की, डावी कळी मागतो अन् ती आली की पुराव्याची म्हणून परत उजवी कळी मागतो. ती आली की, जाबसाल होऊन आठवारी संपते.
ग्रामदेवतेचा प्रमुख उत्सव म्हणजे शिमगा !!
हा सण जरी हिंदू कालगणनेनुसार, फाल्गुन महिन्यात येत असला तरी प्रत्येक गावच्या परंपरेनुसार तेरसा (त्रयोदशी), पौर्णिमेचा किंवा भद्रेचा (प्रतिपदा) असा साजरा होतो. शिमग्याच्या आधी देवाला चांदीचे मुखवटे लावले जातात. यास रूपे लावणे म्हणतात. मग माड (होळी) तोडून वाजतगाजत आणली जाते. यातही मानाप्रमाणे माड तोडण्यासाठी गावकर अन् त्याचे सहकारी घाव घालतात. त्या वेळी ढोलही, ढोलाचा ज्याच्याकडे मान आहे त्याच्या नेतृत्वात वाजवले जातात. माडाचा बुंधा जड असतो तेव्हा गावातील संख्येने मोठ्या वाडीला तो मान दिला गेलाय. त्यामुळे त्या वाडीतील लहानथोर, अबालवृद्धही ओंबलासारखे बुंध्याला चिकटून माड खाली पडणार नाही, याची जीवापाड दक्षता घेतात. माडाचा शेंडा मात्र संपूर्ण गाव उचलतो. त्यामुळे कितीही लांब अंतरावरूनही ते झाड सुखरूप सहाणेवर आणले जाते ते तसे जाग्यावर आले की, नेम (खड्डा) काढण्याचा मान ज्यांच्याकडे आहे ते खड्डा काढतात अन् त्यात तो माड उभा करतात अन् मग दुसऱ्या दिवशी पेटवणाऱ्या होमाची तयारी केली जाते.
पालखी धुवूनपुसून स्वच्छ करण्याचाही मान दिलेला असल्याने ते सेवेकरी जातीने आपले काम चोख बजावतात. दुसऱ्या दिवशी होम पेटवून देवाची पालखी नाचवली जाते; मात्र पालखी देवालयातून बाहेर प्रदक्षिणा करण्यासाठी येते. तेव्हा राजसत्तावाले अन् पूर्वसत्तावाले मानाप्रमाणे खांदेपालट करतात. नंतर देवाची पालखी गावभोवणीला निघते तिही मानाच्या घराप्रमाणे !! ही इतकी सुंदर अन् कल्पक इव्हेंट मॅनेजमेंट आहे की, त्यात मागे-पुढे होण्याची शक्यता धूसर आहे. या सर्व सेवेकऱ्यांच्या कामाला मानाचे स्वरूप दिल्याने जो तो मानकरी आपल्या कामाला आवर्जून हजर राहतो. त्यामुळे कोणतेही काम अडत नाही, सुलभतेने होते. आता मात्र काही ठिकाणी आपण देवाचे सेवेकरी आहोत, हेच विसरून आपण मानकरी किंवा खुमकरी म्हणजे जणूकाही राष्ट्रपतीच आहोत, असे समजू लागल्याने शिमग्यात भानगडी होऊ लागल्या आहेत; मात्र हे प्रमाण अल्प आहे हे सुदैव. हा गावगाडा उत्तम चालावा, अशी प्रार्थना करतो अन् थांबतो...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com