पावसाचे पाणी वाया घालवतो याचे नाही भान

पावसाचे पाणी वाया घालवतो याचे नाही भान

Published on

rat18p15.jpg-
N64609
प्रशांत परांजपे

वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो

इंट्रो

महाराष्ट्राच्या भूरचेनचा अभ्यास करता भूरचना घाटावर सपाट व काळी मातीमय आणि पाणी धरून ठेवणारी तर कोकणामध्ये डोंगर, दऱ्या, उंच, सखल आणि बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. संपूर्ण सच्छिद्र जांभ्या दगडाने बनलेला कोकण प्रदेश असल्याने या प्रदेशात मोठी धरणे यशस्वी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे...!

- प्रशांत परांजपे, दापोली
----------

पावसाचे पाणी वाया घालवतो याचे नाही भान

कोकणासारख्या प्रदेशात आणि गुंठ्याच्या प्रमाणात जमिनी असलेल्या भाऊबंदकीच्या देशात पाणी अडवा बंधारे बांधा ही मोहीमही वाहून जाते. अनेक नद्यांवर ३० सप्टेंबरला शासनाच्या तारखेप्रमाणे बंधारे बांधणे अनिवार्य करण्यात येते. या दिवशी सर्व तयारी केली जाते, फोटो काढले जातात. पाणी साठवले जाते. याचेही फोटो काढून फाईलला चिकटवले जातात. मात्र डिसेंबरअखेरीनंतर या नदीपात्रातून पाणी गायब झालेले असते. पुन्हा पुढील वर्षी याच नदीवर याच ठिकाणी बंधारा घातला जातो. या करता पाणी अडवण्याकरता काही ठिकाणी रेती भरुन पोती रचली जातात त्यामुळे नदीमध्ये सिमेंटच्या पोत्यांचा कचरा होतो. पावसाळ्यात हा मानवनिर्मित कचरा नदीद्वारे सागराला मिळतो आणि निसर्गनियमानुसार सागर आपल्या पोटातील मानवाने टाकलेला कचरा किनाऱ्यावर पुन्हा मानवाला देतो आणि किनारे अस्वच्छ बनतात.
हे नमन खड्यापूर्वीचे आहे. कारण खड्डे खणा पाणी जिरवा, हे अडवा जिरवा पेक्षा कोकणभूमीत अधिक फलदायी आहे. मानवाचा स्वभाव गुण आहे रस्त्यावरचे पाणी माझ्या दारात येता नये म्हणून स्वतःच्या घराभोवती सिमेंट काँक्रिटचे अंगण व कंम्पाऊंड वॉल करून स्वतःचे अस्तित्त्व जमिनीच्यावर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्या नादामध्ये आपण पावसाचे पाणी वाया घालवतो याचे भान रहात नाही.
काँक्रिटी कारणामुळे घराच्या छपरावर पडणारे पाणी घराच्या आजूबाजूला जमिनीत जिरण्यापासून अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या आवारातील विहीर किंवा बोरवेल पुनर्भरण (रिचार्ज) होताना अडथळे निर्माण होतात. प्रत्येकाने आपल्या घराच्या आवारात शक्य त्या ठिकाणी दोन बाय दोन किंवा एक बाय तीनचे ज्या पद्धतीने जागा असेल त्या पद्धतीने छोटे-मोठे खड्डे किंवा चर पावसापूर्वी मारून ठेवले आणि शक्य असल्यास जे बाहेरून पाणी जाणारे आहे ते आपल्या कंपाऊंडमध्ये दोन होल दोन बाजूला मारून घेतले आणि येणाऱ्या पाण्याला वाट करून दिली तर बाहेरून येणारे अतिरिक्त पाणी आपण मारलेले चर आणि खड्ड्यामध्ये साचून राहील आणि ते कमी पावसाच्या काळात आपल्या जमिनीत घेऊन आपली विहीर आणि बोरवेल ही रिचार्ज होईल अर्थात त्याचे पुनर्भरण होईल.

विहिरीची पाण्याची पातळी वाढवण्याकरता सोपा उपाय

स्वतःच्या कंपाऊंडमध्ये विहीर किंवा बोरवेल केंद्रस्थानी घेऊन जेवढी म्हणून मोकळी जागा असेल त्या क्षेत्रामध्ये २× २ किंवा ३× ३ अथवा शक्य तेवढे लहान मोठे खड्डे मारावेत. विहीरीच्या सर्व बाजूंनी गोल किंवा चौकोनी जसा विहीरीचा आकार असेल त्यानुसार जागा असेल त्याप्रमाणे दोन किंवा एक फुट रुंद खोल चर मारावा. त्याचप्रमाणे आपल्या आवारात जर मोठे वृक्ष असतील प्रामुख्याने नारळ, पोफळ, आंबा, चिकू इ. त्यांच्या पायथ्याजवळ रिंग मारावी. या सर्व प्रकारातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जिरते आणि त्यामुळे आपल्या विहीरीची पाण्याची पातळी वाढलेली दिसते. पावसाचे प्रचंड पडणारे आणि वाहून जाणारे पाणी बंधाऱ्याच्या रूपात अडवणे प्रचंड प्रवाह व सच्छिद्र जमिनीच्या रचनेमुळे असफल ठरत असले तरी प्रचंड पडणारे आणि वेगाने वहाणारे पाणी खड्ड्यांमध्ये साचून निश्चितपणे जमिनीमध्ये मुरते आणि त्याचा उपयोग विहीरीची पाण्याची पातळी वाढण्यास होतो आणि पर्यायाने मार्च ते मे टंचाईग्रस्त काळामध्ये आपण आपल्या पाणी संचयामुळे समृद्ध व आरामदायी जीवन जगू शकतो.

नदी व डोंगर उतरावर खड्डे मारा

कोकणातील बहुतांश नद्या पावसाळी पाण्याच्याच आहेत. सर्वसाधारणतः जानेवारीपासून पुढील पाच महिने कोकणातील वाशिष्ठी, जगबुडी आणि सावित्री या नद्यांसारख्या प्रमुख नद्या सोडल्यास इतरत्र अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये नदीपात्र कोरडे पडलेले आढळते. बाकी गावातील नद्या म्हणजे ग्रामीण भाषेतील पऱ्हया'' हे कोरडेच असतात.या कोरड्या पात्रामध्ये लोकवस्तीच्या जवळपास काही अंतरावर १५ ते २० फूट खोलीच्या विहीरी मारून आणि जमिनीच्या वरती किमान पाच ते सात फूट बांधकाम करून तसेच तळापासून बांधकाम केल्यास या पाण्याचा संचय होऊन मार्च ते मे या टंचाईकाळात परिसरातील नागरिकांना या पाण्याचा वापर करता येईल.
तसेच गावाजवळच्या डोंगरमाथ्यावर तलाव खोदून आणि पडीक टेकडीला अनेक खड्डे किंवा चर मारून ठेवल्यास खड्ड्यामध्ये आणि माथ्यावरील तलावामध्ये पाणी साचून उरलेले वाहून जाईल व पाऊस थांबल्यावर ते पाणी जमिनीमध्ये जिरेल.ऑगस्ट अखेरीला यातील काही खड्ड्यांत लागवड केल्यास वृक्षलागवडही यशस्वी होईल. या खड्ड्यांचा फायदा टेकडीच्या पायथ्यालगत असणाऱ्या नागरिकांना होईल. निसर्गनियमानुसार डोंगरावर जिरलेले पाणी उतारावरून मुरत जाऊन गावातील विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. हे कठीण असले तरी अशक्य नाही.
भविष्यकाळात जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी वाढवायची असेल आणि सुजलाम सुफलाम आयुष्य जगायचं असेल तर प्रत्येकाने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलणार काळाची गरज आहे लहान असताना आपण शाळेत शिकलो थेंबे थेंबे तळे साचे याच न्यायानुसार प्रत्येकानं पावसाचा पडणारा पाणी जेवायला सुरुवात केली तर या थेंबाचा मोठा तलाव डोहला वेळ लागणार नाही आणि आपल्या भूगर्भातलं पाणी वाढण्यास खूप मदत होईल.

(लेखक जल, वन आणि कचरा व्यवस्थापन कार्यात अग्रेसर आहेत )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com