सुट्ट्यांमुळे गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी
64666
64667
64668
गुहागरात रोज १२०० हून अधिक पर्यटक
सुट्यांमुळे गर्दी; पर्यटन व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १८ ः शांत समुद्र आणि निसर्गाने वेढलेला परिसर यामुळे गुहागर कोकणचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे पर्यटन केंद्रबिंदू ठरले आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने पर्यटकांनी गुहागरमध्ये गर्दी केली आहे. दिवसाला सुमारे १२०० ते १६०० पर्यटक तालुक्यात दाखल होत आहेत. त्यामुळे गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी फुलली आहेत. पर्यटन व्यवसायातून कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा समुद्र किनारा हा गुहागर तालुक्यात आहे. वाशिष्ठी नदी आणि जयगडच्या खाडीजवळ गुहागर आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहराला लाभलेला समुद्रकिनारा सात किलोमीटर लांब आहे. तालुक्यातील गुहागर, पालशेत, अडूर - बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील समुद्र किनारे आहेत. यापैकी बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. तिथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. समुद्र किनाऱ्यांसह गुहागरमध्ये निसर्गाचे विविध चमत्कारही पाहायला मिळतात. हेदवी समुद्र किनाऱ्यावर वर्षानुवर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन येथील खडकावर एक मोठी अरुंद भेग (घळ) निर्माण झालेली आहे. भरतीवेळी समुद्राचे पाणी या घळईत जोराने घुसते. यानंतर या घळीतून एखाद्या कारंजाप्रमाणे पाणी वेगाने वर उसळते. ही घळ ‘बामणघळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत आहेत. गुहागरमध्ये एक छुपा समुद्र किनारा आहे. हे ठिकाण ‘बुधल सडा’ नावाने ओळखले जाते. इथं चंद्रकोरच्या आकाराची खोच आहे. धार्मिक पर्यटनस्थळांमध्ये भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’, दगडी बांधणीचे व्याडेश्वर, दशभूज गणेशाचे मंदिर लोकप्रिय आहे.
तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे १२०० ते १६०० पर्यटक येत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरांसह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतो. एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयांच्या सुट्यांमुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक कोकणात धाव घेत आहेत.
चौकट
जेटी ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, उंट सफारी, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होत असल्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. किनाऱ्यावरील तोडण्यात आलेली जेटीही पर्यटकांसाठी आकर्षण बनली आहेत. पर्यटक सेल्फी पॉईंट म्हणून तिचा वापर करताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.