-तुका म्हणे...

-तुका म्हणे...

Published on

संतांचे संगती ------लोगो
(८ मे टुडे ३)
आपण प्रापंचिक लोक परमार्थसुद्धा व्यावहारिक बुद्धीने करतो. आपला नरदेह परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे, हे लक्षात न घेता प्रापंचिक सुखासाठी नरदेह चांगला राहावा म्हणून देवाची भक्ती करतो. संतांना शरण जातो जणू देवांचे संतांचे सद्गुरूंचे ‘समस्या निवारण केंद्र’ करून टाकतो. मनापासून प्रपंचावर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे उत्तम चित्रण जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगात केले आहे.

- rat२१p४.jpg -
P25N65261
- धनंजय चितळे
---
तुका म्हणे...
एका गावात एक आवा नावाची एक स्त्री राहत असते. तिला अनेक दिवस पंढरपुरी जायची इच्छा असते. एक दिवस त्या गावातील वारकरी पंढरपूरला जायला निघतात. त्यांच्याबरोबर आवाबाई पंढरपूरला जायला निघते. सर्वजण वेशीवर जमतात तेव्हा ती सहप्रवाशांना म्हणते, मी पटकन घरी जाऊन येते. त्यांनी लवकर ये, असे सांगितल्यानंतर त्यांना लगेच येते, असे सांगून ही आवा आपल्या घरी येते आणि अंगणातूनच आपल्या सूनबाईला हाक मारते. अग सूनबाई ऐकलस का? आणि मग तिला सूचनांची जंत्री ऐकवते. त्या सूचना कोणत्या ते मूळ अभंगातच पाहूया, श्री तुकाराम महाराज म्हणतात...
परिसे गं सूनबाई नको वेचू दूध दही ।।१
आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा ।। २
आईके गोष्टी सादरबाळे करी जतन फुटके पाळे ।।३
माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू ।।४
वळवटक्षीरीचे लिंपन नको फोडू मजवाचून ।।५
उखळ मुसळ जाते मन माझे गुंतले तेथे।।६

म्हणजे अगं सूनबाई माझं जास्त दूध-दही वापरू नको. माझी मोडकीतोडकी भांडी मी घरात नाही म्हणून फेकून देऊ नको. ती सांभाळून ठेव. गोवऱ्यांची कलवड मी आल्याशिवाय फोडू नको. खिरीसाठीच्या शेवया मी आल्याशिवाय वापरू नकोस. उखळ मुसळ जातं, या सगळ्या गोष्टींमध्ये माझं मन अडकलं आहे. ती सासू पुढे म्हणते, जर समजा कोणी भिकारी आले तर त्यांना भीक घालू नको. त्यांना सांग सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत. त्या आल्यावर या. तू सुद्धा, मी नाही म्हणून उधळमाधळ करू नकोस. मोजकेच खा. सारख्या सूचना देणाऱ्या या सासूचे सूचना नको म्हणणारी सून किती ऐकून घेणार! ती पटकन म्हणाली, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आता तुम्ही सुखाने यात्रेला जा आणि सासूबाई आता प्रपंचाची आशा सोडा आणि स्वहिताचा विचार करा. अभंगाच्या मूळ ओळी अशा आहेत,
भिक्षूक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा ।।७
भक्षी मपित आहारू, नको फारसी वरीवारू।।८
सून म्हणे बहूत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे।।९
सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा ।।१०
सूनमुखीचे वचन कानी ऐकूनी सासू विवंची मनी ।।११
सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाटे ।।१२
आता कासया यात्रे जाऊ काय जाऊनि तेथे पाहू।।१३
मुले लेकरे घरदार हेचि माझे पंढरपूर ।।१४
तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये करून ।।१५

सुनामुखीचे मागची सर्व आशा सोडा, हे उद्गार ऐकून ती आवा मनात काळजी करू लागली म्हणून लागली आपल्या सुनेचे वर्तन वेगळेच आहे. तिला मी जावे असेच वाटत आहे. जणू ती माझी सवत आहे. मग आता पंढरपूरला कशासाठी जावे? शेवटी आपलं घर मुलेबाळे हेच आपलं पंढरपूर; अशा तऱ्हेने पंढरपूरला निघालेली आवा वेशीपासून पुन्हा घरातच आली. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आपणही असेच मायेत बद्ध झालेले जीव भगवंतांपर्यंत जाऊ शकत नाही. या अभंगातील आवा ही तुमच्या माझ्यामध्येच असलेली प्रपंचाची असती आहे, जी आम्हाला परमार्थ करू देत नाही बरोबर ना?

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com