कणकवली- आचरा रस्त्यावरील वाहतूक बंद

कणकवली- आचरा रस्त्यावरील वाहतूक बंद

Published on

65746

कणकवली- आचरा रस्त्यावरील वाहतूक बंद

वरवडे पूलाचे काम अपूर्ण; ठेकेदाराच्या दिरंगाईचा प्रवाशांना भुर्दंड

कणकवली, ता. २३ ः कणकवली आचरा मार्गावरील वरवडे येथील पुलाचे काम अपूर्ण स्थितीत राहिले. गेले चार दिवस होत असलेल्‍या पावसामुळे येथील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्‍यामुळे कणकवली-आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक कलमठ कुंभारवाडी मार्गे वळविली आहे. यामुळे वाहन चालकांना चार किलोमिटरचा वळसा घालून जावे लागत आहे.
कणकवली आचरा मार्गावरील वरवडे चव्हाण दुकान ते पिसे कामते हद्दीपर्यंत रस्ता दुपदरीकरण, क्राँक्रिटीकरणाचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. यात यंदा जानेवारी महिन्यात आचरा मार्गावरील वरवडे पूल पाडण्यात आला आणि तेथे नवीन पूलाचे काम सुरू करण्यात आले. या पुलापासून काही अंतरावर जानवली नदीपात्रात भर टाकून तात्‍पुरता रस्ता करण्यात आला.
मे महिन्याच्या मध्यापर्यंत या पुलाचे काम पूर्णत्‍वास जाणे अपेक्षित होते. मात्र, या पुलाचे काम अपूर्ण राहिले. गेले चार दिवस सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस होत आहे. त्‍यामुळे गड आणि जानवली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. काल (ता.२२) रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्‍या. त्‍यामुळे जानवली नदीपात्रात वरवडे पुलाच्या लगत तयार केलेला रस्ता पाण्याखाली गेला. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्‍यान कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक सेंट उर्सूला स्कूल वरवडे मार्गावरून कलमठ कुंभारवाडी मार्गे वळविली आहे.
आचरा मार्गावरील वरवडे येथील पुलाचे पिलर आणि स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी जोड रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाने उंसत दिली तर आठ ते दहा दिवसांत हे काम पूर्णत्‍वास जाऊ शकते. पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र पावसाळ्यानंतरच हे काम पूर्ण होईल. तोपर्यंत आचरा मार्गावरील कणकवली ते वरवडे पर्यंतची वाहतूक ठप्पच राहणार आहे.
----
ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे संताप
जानवली नदीपात्रातील वरवडे आणि कणकवली शहर हद्दीतील गणपती साणा येथील पुलांचे काम दोन वर्षापूर्वीच मंजूर झाले होते. एप्रिल २०२४ मध्ये तत्‍कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते या दोन्ही पुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यात कणकवली शहरातील गणपती साणा येथील पूल तीन महिन्यात पूर्ण झाला. जून २०२४ पासून या पुलावरून वाहतूक देखील सुरू झाली. तर वरवडे येथील पूलाचे काम जानेवारी २०२५ मध्ये सुरू होऊन देखील ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्‍यामुळे आचरा मार्गावरील वाहन चालक आणि प्रवाशांना चार किलोमिटरचा वळसा घालून कणकवली शहरात यावे लागत आहे.
---
कलमठ मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी
कणकवली-आचरा या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून कलमठ कुंभारवाडी ते वरवडे या मार्गावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र, कुंभारवाडी हा मार्ग ठिकठिकाणी अरूंद आणि वळणांचा आहे. सर्व वाहतूक या मार्गावरून वळविल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असून त्‍याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com