बळीराजाचं जीवन सुगंधित करणारी श्रीमंती

बळीराजाचं जीवन सुगंधित करणारी श्रीमंती

Published on

बोल बळीराजाचे ..........................लोगो

rat23p2.jpg
65738
जयंत फडके


इंट्रो

कोकणात बहावा बहरल्याचा स्टेटस आणि गर्दहिरव्या डोंगरात डोलणारी सोनेरी फुलांची ती झाडं पावसाच्या आगमनाची चाहूल तर देतातच; पण त्याचबरोबर कोकणच्या पुष्पवैभवाचीही जाणीव करून देतात. तसं कोकणचं हे संपन्न पुष्पवैभव तसं दुर्लक्षितच ! उत्सवप्रिय बळीराजाचं जीवन सुगंधित करणारी ही श्रीमंती खरंच समजून घ्यायला हवी.
- जयंत फडके, जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी


बळीराजाचं जीवन सुगंधित करणारी श्रीमंती

इथल्या लाल मातीत पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शेडनेटमधल्या जर्बेरा, लीली, गलाटा, निशिगंधाची व्यापारी फूलशेती बळीराजाने बघितली आहे. त्यात तो चांगला पोळलाय.. मग खरं कोकण कशात आहे याचा विचार केला तर बारा महिने फुलणारी, आहारात समाविष्ट असणारी, औषधी गुणधर्म असणारी सुगंधी, मोहक, आकर्षक अशी खूप सारी फुलं असली तरीही मोठा बहर म्हणाल तर वसंतातच ! आंबा-काजूचा फुलोरा चार पैसे मिळण्याची आशा निर्माण करत असला तरीही प्रत्येक महिन्यात फुटणारी माडाची पोय, त्याचा सुगंधही उत्पन्न मिळवून देतोच की! ही पोय बांधूनच गोड माडी काढतात. आता तर त्यापासून साखरही बनवतात; पण फुटलेली पोय सुमधूर शहाळ्याची माताच नव्हे का? फुलांचा हा उत्सव कोकणात वर्षभर साजरा होत असतो. कुड्याची सुगंधी फुलं छान औषधी भाजी करायला उपयोगात येतात. नाहीच जमलं तर शेंगाची भाजीही छान लागते. शेवग्याच्या फुलांची, शेंगांची भाजी, केळफुलाची भाजी नाहीतर मग केळीचं, अगस्त्य फुलांची भाजी..किती किती संपन्नता !
कोकणात सीता अशोक याच काळात बहरतो. लाल-पांढरा खूरचाफा, सोनचाफा, नागचाफा..आसमंतात भरून राहील, असा सुवास पसरवतात. आता सोनचाफ्याचा परफ्यूम, नागचाफ्याचा नागकेशर, सुरंगीचं पराग संकलन, अत्तर हे व्यवसायाचे विषय झालेत; पण दुर्लक्षित उक्षीची फुलं थोडं लक्ष घातलं तर बारमाहीने टिकणारे हार बनवण्याच्या शर्यतीत उतरेल. खुरई, कुचरीच्या फुलांच्या सुगंधाने अत्तराच्या बाटल्या भरतील. करवंदाची, तोरणाची फुलं उद्याच्या पिकांची प्राथमिक अवस्था आहे; पण त्यांचा सुगंध दुर्लक्ष करून चालणारा नाही. सुपारीची, रातांबीची, रिंगीची फुलं हे असेच पायाचे फुलोरे निसर्गतःच कोकणाला संपन्न बनवतात. पांढरा-पिवळा केवडा, पावसाळी सोनसळ, कावळा-चिमणी आणि असंख्य अनामिक किंवा कोसाकोसावर नावं बदलणारी फुलं रंगिल्या कोकणात हिरव्या कोंदणात जणू रत्नांसारखी शोभतात.
माझा बळीराजा ही संपन्नता जन्मोजन्मी अनुभवतोय. वाढत्या रासायनिक फवारण्यांनी माशांचे थवे नाहीसे झालेत. परागीभवनासाठी या वेगवेगळ्या माशांचे महत्व तो जाणतोय. त्यामुळेच वर्षागणिक उत्पादन घटत चाललंय. माशा न मारता रोग, शत्रू कीटक घालवायचं तंत्र त्याच्यापर्यंत पोचत नाहीये. मित्रकीटक या सरसकट कीटकनाशकांच्या वरवंट्यात नाहीसे होतायत, हे त्याला समजत नाही असं नाही; पण समर्थ पर्यायी यंत्रणा त्याच्यापासून खूप दूर आहे. मधाची पोळी त्याच्यामागच्या पिढीने अनुभवलीत; पण मधुमक्षिकापालनाचं तंत्र अजूनही त्याच्या पचनी पडत नाहीये. या मधमाशाचं त्यांचं बागेतील उत्पादन वाढवणारेत हे कळतंय; पण वळत मात्र नाहीये. विद्यापिठानं ज्या आत्मियतेनं फवारणी करायला शिकवलं त्याच प्रामाणिकपणानं मधुमक्षिकापालन शिकवायला, पटवायला हवं.
कोकणात गावठी गुलाबांची, बारमाही झेंडूंची, लीलीची फूलशेती हळुहळू; पण खंबीरपणे बहरतेय. त्याला मधसंकलनाची जोड मिळायला हवी. मग टपोऱ्या मोगऱ्याचं छान दिसणं, छान असण्यात परावर्तित होईल..त्याचंही अर्थशास्त्र माझा बळीराजा नक्कीच समजून घेईल. वर्षभर फुलणारी मधुमालती, एकदाच फुलणारी सुगंधी पाटलीण, हष्याची फुलं अनुभवायची की, घाण वासाची सुरणाची, हेळ्याची फुलं बघून नाकं मुरडायची हे ज्याचं त्यांनीच जाणावं.. नाहीतर बिनवासाच्या काटेरी बोगनवेलीच कुरवाळायची वेळ यायची..!

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com