राजापूर-पाऊस, वादळाने मच्छीमार बांधव निराश
rat२३p१५.jpg
६५७८५
राजापूरः किनाऱ्यावर विश्रांती घेत असलेल्या होड्या.
-------------
साखरीनाटे बंदरातील
लाखोंची उलाढाल ठप्प
हंगामाच्या अंतिम टप्प्यात दणका; पाऊस, वादळाने मच्छीमार निराश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ : समुद्र किनारपट्टीवर धडकलेले वादळ आणि मान्सूनपूर्व पावसाने मासळी हंगामाचा अंतिम टप्पा आर्थिकदृष्ट्या सुखद करण्याची धडपड करणार्या तालुक्यातील साखरीनाटे बंदरातील मच्छीमार बांधवांना निराश केले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून खवळलेल्या समुद्रातील मासेमारी ठप्प झाल्याने बंदरातील दरदिवशीची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अचानक उद्भवलेल्या वादळामुळे मच्छीमार बांधवांची तारांबळ उडाली आहे.
तालुक्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर दिवाळी ते मे महिनाअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय चालतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या तालुक्यातील नाटे, साखरीनाटे, सागवे, आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे आदी गावांतील सुमारे २५०-३०० मच्छीमार या हंगामामध्ये मच्छीमारी करतात. या काळात केल्या जाणार्या मच्छीमारीवर पश्चिम किनारपट्टीतील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल हंगामामध्ये होते. मासेमारी बंदीकाळ १ जूनपासून लागू होणार आहे. त्याला काही दिवसांचा कालावधी असल्याने मासळी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हा टप्पा आर्थिकदृष्ट्या सुखद करण्याची मच्छीमारांची लगबग सुरू होती; मात्र आठवडाभर मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्याच्या जोडीला किनारपट्टीवर वादळही येऊन धडकले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असून, उंच लाटा उसळत असल्याने मासेमारी करणे धोक्याचे बनले आहे. या सगळ्याचा परिणाम साखरीनाटे बंदरावर झाला असून, दरदिवशी होणारी लाखो रुपयांची उलाढाल पाच-सहा दिवसांपासून ठप्प झाली आहे. वादळीवारे, खवळलेला समुद्र आणि उंच लाटांमुळे समुद्रामध्ये असलेल्या नौका किनाऱ्यावर आणणेही मुश्किल झाले आहे. मच्छीमारांकडून पावसासह वादळ थांबण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
कोट
१ जूनपासून मासळी हंगाम बंद होणार असल्याने शिल्लक असलेल्या कालावधीमध्ये मासेमारी करण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र, मान्सूनपूर्व पाऊस आणि त्याच्या जोडीने येत असलेले वादळ यामुळे समुद्रामध्ये जाणे मुश्किल झाले आहे. एवढेच नव्हे तर समुद्रातून बोटी बाहेर काढणेही मुश्किल झाल्याने पुरती तारांबळ उडाली आहे.
- अमजद बोरकर, मच्छीमार, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.