मंडणगड-रोहिणीच्या अगोदरच पावसाची हजेरी
rat23p13.jpg-
65772
मंडणगड : भातखाचरात साचलेल्या पाण्यामुळे पेरणी खोळंबण्याची शक्यता आहे.
--------
रोहिणीच्या अगोदरच पावसाची हजेरी
पेरणी रखडली; धूळवाफेऐवजी चिखल पेराची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ः पावसाळ्याची सुरवात म्हटलं की, शेतीतील लगबग डोळ्यांसमोर येते. यंदा मात्र पावसाने मे महिन्यात सुरवात केल्याचे चित्र असले तरी रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांना धूळवाफेऐवजी चिखलपेरा करावा लागण्याची शक्यता आहे.
रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली की, शेतकरी शेतीपूर्व मशागतीला सुरवात करतो. या नक्षत्राला शेतकरीवर्गात विशेष महत्व आहे व या नक्षत्रात पेरणी करणे महत्वाचे मानले जाते. रोहिणी नक्षत्रात पडणारा पाऊस जमिनीला योग्यप्रकारे ओलावा पुरवतो. या पावसामुळे जमिनीत वापसा तयार होऊन बियाणे लवकर आणि व्यवस्थित उगवते. योग्य वातावरणामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते. रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झाल्यास तो शेतीसाठी पोषक असतो; मात्र रोहिणीच्या अगोदरपासून सतत पाऊस झाल्यास ते बियाणांसाठी चिंतेचे असते. यंदा रोहिणी नक्षत्राला २५ मे पासून सुरवात होणार आहे; मात्र पावसाने २० मे पासूनच संततधार धरल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी वाट पाहावी लागणार आहे. पेरणीची सगळी तयारी करून वापसा तयार झाल्यावर पेरा करता येईल. यंदाच्या पावसाळ्यात खरिपाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी सगळी जुळवाजुळव सुरू केली आहे. बियाणांची निवड, शेतीतील अवजारे या कामांत शेतकरी व्यस्त आहेत. शासनाच्यावतीने मिळणारे बियाणे किंवा स्वउत्पादित केलेले बियाणे यांची निवड शेतकरी करतात. यंदाच्या उष्णतेमुळे पाऊस चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकरी उत्साही असल्याचे दिसते.
कोट
यंदा पावसाने रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच सुरवात केल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे; मात्र वापसा तयार झाल्यानंतरच पेरणी करणे उचित ठरेल. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी, मंडणगड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.