

65993
कुडाळात १३ जुलैला ‘मॉन्सून हाफ मॅरेथॉन’
डॉ. जी. टी. राणे ः राज्यातील खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन २०२५ तर्फे आयोजित मॉन्सून हाफ मॅरेथॉनचे आयोजन १३ जुलैला केले आहे. येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी येथून ५, १०, १६ व २१ किलोमीटर अशी ही हाफ मॅरेथॉन होणार आहे. यात सिंधुदुर्गसोबतच मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथील धावपटू सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मॉन्सून रन २०२५ सज्ज आहे, अशी माहिती राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळचे डॉ. जी. टी. राणे यांनी शुक्रवारी (ता. २३) स्पाईस कोकण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गजानन कांदळगावकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, सचिन मदने आदी उपस्थित होते. या मॅरेथॉनसाठी जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. पुरस्कार प्राप्त प्रसाद कोरगावकर तसेच ओमकार पराडकर, रत्नागिरीचे डॉ. तेजानंद गणपत्ये, मुंबईतील अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मॉन्सूनला मिळणार आहे. गतवर्षी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह ७५० स्पर्धक सहभागी झाले होते. आपले हृदय चालत राहावे यासाठी आपण चालत राहण्याचा मोलाचा संदेश घेऊन जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या दुसऱ्या वर्षी होऊ घातलेल्या या पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा, हेच टीम कुडाळ मॉन्सून रनचे ध्येय आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार आहेत. खुल्या गटातून तसेच वयोमानाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षिसेही आहेत. सहभागी सर्वांना टी-शर्ट दिले जातील. कुडाळ एमआयडीसीमधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. पाच कि.मी.ची ‘फन रन’ असेल. यामध्ये बक्षिसे नसली, तरी टी-शर्ट व डिजिटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तसेच १० कि.मी., १६ कि.मी. व २१ कि.मी. प्रकारात वयोगटानुसार आकर्षक रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागासाठी संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावरून नावनोंदणी करावी, असे आवाहन डॉ. राणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.