गुहागर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित

गुहागर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित
Published on

गुहागरात पावसामुळे जनजीवन विस्कळित
भातगावमध्ये दरड कोसळली ; तळवळीतील घरावर पडली वीज
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २४ : गेले पाच दिवस सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. अनेकांची घरांची आणि आगोटची कामे अपुरी राहिली आहेत. भातगाव येथे मार्गावर दरड कोसळली.
गुहागरात मे महिना हा पर्यटन हंगाम असतो. हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात; परंतु, मॉन्सूनपूर्वी पावसाने आलेल्या पर्यटकांनाही झोडपून काढले. याचा परिणाम येथील व्यावसायिकांवर झाला आहे. तसेच लग्नकार्यालादेखील पावसाचा फटका बसला. लग्नमंडपात पावसाच्या पाण्याची धार लागलेले चित्र दिसत आहे. काहींनी आगोटची कामे मार्गी लावलेली नाहीत. काही लोकांनी पावसाआधी घरावरील कौले झाडण्यासाठी काढलेली असतानाच पाऊस आल्याने घरात चिखल झाला आहे.
वडद गावामध्ये गेले तीन दिवस वीजपुरवठा खंडित आहे. १५ मिनिटेसुद्धा वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. पाण्याचे पंप चालत नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाहीय साखरीआगर धरणवाडी येथे घराबाजूची दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घरातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले आहे. मोडकाआगर ते रोहिलेपर्यंत केबल टाकली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली आहे; मात्र केबल टाकल्यानंतर तिथे रोलिंग करणे आणि रस्त्याचे गटार मोकळे करणे कंपनीला बंधनकारक असताना अधिकाऱ्यांनी कुठेही रोलिंग केले किंवा गटार मोकळे केली नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊनसुद्धा त्यांनी देखील यात लक्ष घातले नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी अडचणी येत आहेत. पाचेरीसडा बौद्धवाडी येथे दरड रस्त्यावर कोसळली होती. मंडळ अधिकारी काजरोळकर व तलाठी बरकडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ जेसीबी बोलावून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.
तळवली येथील एका घरावर वीज पडून घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवली गावातील आनंद विठ्ठल भोळे व गणेश विठ्ठल भोळे हे भाऊ एकाच घरात राहत आहेत. एक घर असल्याने दोघांची घरपट्टी वेगळी आहे. एकाचवेळी एकाच घरावर वीज पडल्याने दोन्ही कुटुंबातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आनंद भोळे यांचे ३ लाख ५ हजार रुपयांचे तर त्यांचे बंधू गणेश भोळे यांचे २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com