कचरा सांभाळला तरच आरोग्य सांभाळणे शक्य
rat25p3.jpg
66131
प्रशांत परांजपे
---------
इंट्रो
आला पावसाळा तब्येत सांभाळा, असं घोषवाक्य आरोग्य विभाग सातत्याने सांगत असते; मात्र याच्यामागे आणखी एक ओळ आहे ती म्हणजे ‘आला पावसाळा कचरा सांभाळा’ कारण, कचरा सांभाळला तरच आरोग्य सांभाळणे शक्य आहे. कचरा आणि आरोग्य सांभाळणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; मात्र ही गोष्ट आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा अवगत नसल्यामुळे आपण कोठेही, कसाही, कधीही आणि कोणताही कचरा फेकून देतो आणि तद्नंतर पाऊस सुरू होताच सर्व दवाखाने आणि हॉस्पिटल भरून कचऱ्यासारखे ओसंडून वाहू लागतात, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
- प्रशांत परांजपे, दापोली
--
कचरा सांभाळला तरच आरोग्य सांभाळणे शक्य
हाताला चांगली सवय लावणं, हे केव्हाही प्रत्येकाच्या आरोग्य रक्षणाचे पहिलं पाऊल आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पावसाच्या झालेल्या अवेळी सुरवातीपासूनच ही गोष्ट लक्षात घेणे अत्यावश्यक आहे की, आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण आपणच करायचे आहे. हे करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ आपला वाया जात नाही, हे प्रथमतः लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. कारण, कचरा वेगळा करायला वेळ नाही, असं टोमणे प्रत्येक घरातून ऐकू येत; मात्र ती आता काळाची गरज आहे. तुम्ही कचऱ्याचे वर्गीकरण न करता कचरा तसाच कचराकुंडीत टाकला तर त्याचे वर्गीकरण करणे अतिशय कष्टप्राय होते किंबहुना होऊच शकत नाही आणि त्यामुळे तो एकत्रित असलेला कचरा पुढे जाऊन संबंधित आस्थापनेला वर्गीकरण करणे अत्यंत जिकिरीचे जाते आणि दुर्दैवाने वर्गीकरण न करता सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकावा लागतो किंवा टाकला जातो, हे कटू सत्य आहे; मात्र सर्व दोष संबंधित अस्थापनेला देऊन आपण हात झटकून मोकळे होतो. ज्या वेळेला कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संबंधित आस्थापनेला आपण दोष देतो त्याच वेळेला तो दोष हा त्यांना देत नसून स्वतःलाच देत असतो याची जाणीवजागृती नसल्यामुळे आपण कचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापनेला दोष देतो.
पावसाळा सुरू झाल्यामुळे प्लास्टिक कचरा, कपडा, पुठ्ठा, ई-वेस्ट हे प्रकर्षाने स्वतंत्र आणि कोरडं राखणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण, तसं न केल्यामुळे कचरा वर्गीकरण करताना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना हा संबंधित आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना करावा लागतो. प्रसंगी त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच तो कसाही आणि कोठेही टाकल्यामुळे जलप्रदुषणात प्रचंड वाढ होते. आपण कुठेही फेकलेला कचरा अतिपावसात अतिपाण्याबरोबर थेट सर्व जलस्रोतांमध्ये जातो. तेच पाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते त्याच पाण्यामध्ये अनेक जलचर वावरत असतात. त्यांच्या जीवावर आपला हलगर्जीपणा बेततो. किंबहुना त्यातील मासळीसारखा मानवाला खाद्यान्न म्हणून लागणारा घटक आहे तोही प्रदूषित होतो आणि स्वतःच आपल्या हाताने आपले खाद्य प्रदूषित करतो. या एकत्रित कचऱ्याचा दुष्परिणाम वारंवार सांगूनही आपणाला उमजत नाही म्हणून स्पष्ट लिहिणे अत्यावश्यक वाटते आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकांना पाणी आणि कचरा या दोन गोष्टींना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सामोरे जावे लागते. किंबहुना या दोन्ही गोष्टींचा अत्यंत जवळून प्रत्येक लहान-थोर व्यक्तीचा संबंध थेट येत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपलं काम झाल्यानंतर जी आपल्याला नको असलेली वस्तू आहे ती स्वतंत्रपणे नीटनेटकेपणे राखून ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये चार डस्टबिन नसतीलही; पण त्याकरिता पर्याय म्हणून चार गोणी, चार पिशव्या नक्कीच उपलब्ध करू शकतो. यामध्ये काच, प्लास्टिक, ई-वेस्ट व इतर सुका कचरा असं वर्गीकरण करू शकतो. ओला कचरा आवर्जून या सुक्या कचऱ्यामध्ये टाकणं टाळणं अत्यावश्यक आहे. तसं न करता आपण सोसायटीच्या खाली असलेल्या खड्ड्यामध्ये सर्वच एकत्र कचरा फेकतो आणि त्यातून दुर्गंधी सुरू होते.
पाऊस असल्यामुळे कचरा जाळू नका, या सांगण्याला किंवा या सूचनेला फाटा देऊनही जे कचरा पेटवतात; पण पावसामुळे भिजलेला कचरा पेटवून आता शक्य होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी माशा, डास, इतर कीटक, जिवाणू, कुजवा, दुर्गंधी याचे साम्राज्य बनते आणि आपल्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. डेंगी, मलेरिया, वांती, जुलाब आदी रोगांना आमंत्रण आपण स्वतःच्या हातानेच देत असतो. याच समवेत आपल्या घराच्या आसपास असलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आपल्या घराच्या परिसरामध्ये कुठेही छोटी करवंटी, टायर, जुने शूज, भंगारवर्गीय वस्तू या उघड्यावर असणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण, या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठलं तर त्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्यांची निर्मिती होते आणि चहूबाजूंनी डास घोंगावू लागतात. येथूनच आपल्या आरोग्यावर आघात करण्यासाठी पुन्हा सुरवात होते.
पाणी उकळून आणि गाळून प्या, अशा सूचनाही आरोग्यविभाग वारंवार देत असते; मात्र हे पाणी आपण स्वतःहून ते प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेणे हेही तितकेच अत्यावश्यक गोष्ट आहे आणि म्हणूनच आला पावसाळा कचरा सांभाळा, हे घोषवाक्य सातत्याने सर्वांनी सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक गोष्ट आहे. आपल्यासमवेत आणखी चार व्यक्तींचे प्रबोधन नक्कीच करूया तरच कचराप्रश्नावर उत्तर मिळणं शक्य आहे.
(लेखक जल, वन आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.