रत्नागिरी-कृषी संशोधन केंद्रातून ५१२.४५ टन बियाणे तयार
शिरगाव केंद्रात ५१२.४५ टन बियाणे तयार
डॉ. विजय दळवीः हळव्या भात बियाण्याच्या पेरणीसाठी घाई नको
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ः कोकणातील खरीप हंगाम जवळ येऊ लागला आहे. यावर्षी पाऊसही लवकरच सुरू झाला आहे. परंतु हा नियमित पाऊस नाही. त्यामुळे भात बियांणे पेरण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये. ज्या शेतकऱ्यांकडे भात रोपवाटिकेला पाणी देण्याची सोय आहे, त्यांनी भात पेरणी केल्यास गरव्या भात बियाण्याची निवड करावी. जर हळव्या भात बियाण्याची पेरणी केली तर कापणीस लवकर तयार होवून नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर्षी विद्यापीठाने ५१२.४५ टन भात बियाणे विकसित केले असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येथील शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
दापोली कृषी विद्यापीठानेच विकसित केलेल्या भात जातीच्या बियाण्यांचा वापर जास्तीत जास्त करावा कारण केव्हाही स्थानिक जमीन, हवामान मध्ये विकसित केलेल्या जातीचे उत्पन्न जास्त असते किंवा बदलत्या हवामानाला जास्त प्रतिसाद देत असतात. खरीप-२०२५ या हंगामासाठी विद्यापीठाने एकूण ५१२.४५ टन भात बियाणे उत्पादित केले आहे. यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरणारी जात म्हणून रत्नागिरी-८, कर्जत-३, रत्नागिरी-६, रत्नागिरी-७, रत्नागिरी-२४, रत्नागिरी-१, या जातीच्या बियाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते. विद्यापीठाकडील मर्यादित क्षेत्राचा विचार करता आवश्यक मागणीप्रमाणे बियाणे उत्पादित करता येत नाही. परंतु शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून विद्यापीठाने काही खासगी कंपन्या, शेतकरी गट यांच्याशी सामजंस्य करार करून बियाणे उत्पादित करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठ स्वतःच्या खर्चाने कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शेतकरी खरेदी-विक्री संघामध्ये मागणीप्रमाणे बियाणी पोहोचती केलेली आहेत.
यावर्षी विद्यापीठाने सर्व प्रकारचे मिळून ५१२.४५ टन भात बियाणे निर्माण केले आहे. त्यामध्ये रत्नागिरी-८ या भात वाणाचे एकूण १८०.० टन, रत्नागिरी- ६ वाणाचे ५०.० टन, रत्नागिरी-७ वाणाचे १५.० टन, रत्नागिरी-१ वाणाचे ५०.० टन, कर्जत-३ वाणाचे ६०.० टन बियाणे तयार करुन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात तालुका पातळीवर उपलब्ध करुन दिले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या भात बियाण्याचा वापर दरवर्षी वाढताना दिसत आहे. यामुळे कोकणातल्या भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ होताना दिसत आहे.
चौकट...
जास्तीत जास्त क्षेत्र लागवडी खाली आणावे
यावर्षी महाराष्ट्र शासनाने भात खरेदीचा दर २ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल एवढा दिलेला होता. पुढील वर्षी यामध्ये नक्कीच दहा टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन पड न ठेवता जास्तीत जास्त क्षेत्र भात लागवडी खाली आणणे आणि आपले उत्पन्न वाढवावे अशी अपेक्षा आहे, असे मत शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दळवी यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.