अवकाळी पावसाने पर्यटन व्यावसायिक अडचणीत
मॉन्सूनपूर्व पावसाने पर्यटन अडचणीत
सुनील देसाई ः मंत्री उदय सामंत यांच्याकडे मदतीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : जिल्ह्यात जवळपास १५ मेपासून मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात व्यावसायिकांना नेहमीच मदत होणाऱ्या पर्यटन व्यवसायाची सारी गणिते बिघडली आहेत. पर्यटकांची संख्याही कमी झाल्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा हॉटेल्स असोसिएशनचे सचिव सुनील देसाई यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांकडे त्यांनी निवेदनही दिले आहे.
मे महिन्याच्या मध्यावरच पाऊस सुरू झाला. त्यामुळे पर्यटकांचाही विरस झाला. अनेकांनी आपले फिरण्याचे नियोजन रद्द केल्याने याचा परिणाम कोकणातील पर्यटन व्यावसायिकांवर झाला. पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या रोडावली. व्यावसायिकांना ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे. पावसाच्या फटक्याने व्यावसायिक अडचणीत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या की, कोकणात एप्रिल- मे महिन्यात, उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. आंबा हंगाम आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे आकर्षण यामुळे देशभरातून अनेक पर्यटक कोकणात येतात. मुंबई-पुण्यात राहणारे कोकणवासियही आपल्या गावी येतात. त्यामुळे महिना दोन महिने कोकण गर्दीने गजबजलेले असते. या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते. पर्यटन व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, चारचाकी, रिक्षा व्यावसायिक यांच्यामध्ये समाधान असते. संपूर्ण मे महिना ही उलाढाल चालू असते.
गेले वर्षभर मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हैराण झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, वाहन व्यावसायिक यांना आता अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. या व्यावसायिकांना राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून मदत मिळावी
उन्हाळी सुटीत होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवरच पावसातील २ महिन्याचे खर्च भागत असतात; पण या वर्षी मात्र अवकाळी पावसामुळे ही सारी गणिते बिघडली आहेत. या सर्वांचा परिणाम पर्यटन व्यवसाय आणि त्याच्याशी निगडित इतर व्यवसायांवर झाला आहे. कर्ज काढून, भाडे तत्वावर हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकांची अवस्था तर फार बिकट झाली आहे. पावसाळा हंगाम काढायचा कसा, हा मोठा प्रश्न या व्यावसायिकांसमोर समोर उभा राहिला आहे. व्यावसायिक शासनाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत.
पर्यटक एकदा रत्नागिरीत आला की तो खर्च करतोच. त्यातून जिल्ह्याचे अर्थकारणही चालते. परंतु आता या उद्योगावर अवलंबून व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या याकडे गांभीर्याने लक्ष घालून व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा.
- सुनील देसाई, सचिव, जिल्हा हॉटेल्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.