-ऐन पावसाळ्यात एसटीचे वेळापत्रक कोलमडले
पावसात एसटीचे वेळापत्रक कोलमडले
नोकरदार, व्यावसायिकांचे हाल ; अपुऱ्या फेऱ्यांमुळे गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : ऐन पावसाळ्यातच एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यामुळे नोकरदार, व्यवसाय, जिल्हांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. बसस्थानकाचे काम रखडले आहे. त्यातच आता अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
चिपळूण-रत्नागिरी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तब्बल एक ते दीड तास एसटी बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. आगारप्रमुख, विभाग नियंत्रकांनी आणि विशेषत: लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशीच मागणी प्रवासी करत आहेत. एसटी महामंडळाची लाडकी लालपरी ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची वरदायिनी मानली जाते. याच एसटी बसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे सरकारच्यावतीने दिलेल्या सवलतीमुळे एसटीत प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे एसटी बसेसची संख्या कमी पडत आहे. चिपळूणमध्ये १०५ बस आहेत. यातील काही जुन्या आहेत. नव्या दहा बसची आगारातून मागणी करण्यात आली आहे. त्या अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास एसटीची वाट पाहावी लागत आहे. काहींना भिजतच उभे राहावे लागत आहे, पाऊस वाढल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कित्येक वर्षापासून बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यातच महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचे रस्ते चिखलमय, जलमय झाले आहे. त्यामुळे एसटी ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. प्रवासी नाईलाजास्तव खासगी वडापचा आधार घेऊन आपल्या गावी, तालुक्याला जात आहेत. ऑफिसला जाण्याच्यावेळी ८ ते १० या वेळेत व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत एसटी बस वेळेत सुटणे गरजेचे आहे. या वेळेत खासगी बस सुटतात; मात्र प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागते. चिपळूण आगारातून रत्नागिरी-गुहागर-खेड मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांना विलंब होतो. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
........
कोट
चिपळूण आगारातून सध्या विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमीच्या मार्गावर गाडी सोडताना अडचणी येतात. तरीही शक्य तितक्या फेऱ्या वेळेवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.