आंबोली पर्यटनास सज्ज; मात्र समस्या कायम
swt2611.jpg
swt2612.jpg
66390, 66391
आंबोली ः सद्यस्थितीतील येथील निसर्ग सौंदर्य.
आंबोली वर्षा पर्यटनास सज्ज
कोसळणाऱ्या दरडींची समस्या मात्र कायम; दरडी हटविण्यासाठी चौवीस तास यंत्रणा तैनात
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः महाराष्ट्राचे प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखली जाणारी आंबोली वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाली आहे. यावर्षी घाटातील बऱ्याच समस्यांवर मात केली असली तरी कोसळणाऱ्या दरडींची टांगती तलवार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागही अशा दरडीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठी तशा प्रकारची यंत्रणा चौवीस तास तैनात ठेवली आहे.
जिल्ह्यातील पावसाळी हंगामातील पर्यटन स्थळांपैकी आंबोली हे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. आंबोली सोबतच चौकुळ व गेळे या गावातही नयनरम्य सौंदर्य, घनदाट धुके व फेसाळणारे धबधबे दरवर्षी पर्यटकांना खुणावत असतात. त्यामुळे या ठिकाणी वर्षा पर्यटनाला दरवर्षी तुडुंब गर्दी पाहायला मिळते. गतवर्षीपासून मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर नव्या धबधब्यांचा शोध घेत तेथे वनविभागाने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे एकाच धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीला काहीसा ब्रेक लागला आहे. नव्या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रॅलींग, पायऱ्या उभारल्याने त्या ठिकाणीही पर्यटकांची ओढ वाढली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये कोसळणाऱ्या पूर्व मौसमी पावसाने काहीअंशी मुख्य धबधबे आणि लहान धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले हळूहळू आंबोलीकडे वळू लागले आहेत. एक प्रकारे आंबोली, गेळे आणि चौकुळ या तिन्ही गावातील वर्षा पर्यटन पर्यटकांना खुणावू लागले आहे.
आंबोली वर्षा पर्यटनासाठी नेहमीच चर्चेत असली तरी कोसळणाऱ्या दरडींची भीतीही तितकीच कायम राहिली आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामध्ये दरडीचा काही भाग दोन दिवसापूर्वीच रस्त्यावर आला होता. पूर्वीचा वस मंदिरापासून काही अंतरावर दरडीचा धोका जास्त आहे. अधूनमधून याच ठिकाणी दरड रस्त्यावर येण्याचे प्रकार वाढले आहेत. दरडींची मोठी समस्या सोडली तर अन्य समस्या या पर्यटनाला बाधा पोहचविणाऱ्या नाहीत. यामध्ये मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अलीकडेच नव्याने निर्मिती केलेल्या धबधब्यांवर करण्यासाठी लोखंडी पायऱ्या उभारण्यात आल्या आहेत. त्या पावसाळ्यात निसरड्या होतात. त्यावरून पाय घसरून पडण्याची भीती जास्त आहे. याकडे पर्यटकांनी आणि वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मुख्य धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या रेलिंगच्या मुळातील सिमेंट सुटू लागले आहे. यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुख्य धबधब्याच्या समोरील नव्याने उभारण्यात आलेला कठडा हा कमी उंचीचा असल्याने तेथे सेल्फी घेण्याच्या नादात अपघात होण्याची भीतीही नाकारता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणीही उपाययोजना आखणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या दृष्टीने उभारण्यात आलेले फायबर चेंजिंग रूम व टॉयलेट यांचे दरवाजे गंजले आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. एकूणच तकलादु पद्धतीचे हे चेंजिंग रूम आणि टॉयलेट असल्याचा आरोप पर्यटकांतून केला आहे.
यावर्षी सावंतवाडी ते आंबोली महामार्ग नव्याने मजबुतीकरण केल्याने खड्डे मुक्त प्रवास पर्यटकांचा होणार आहे. मात्र, असे असले तरी दरडींवरील झाडे कोसळण्याचा धोका कायम आहे. बऱ्याच ठिकाणी कोसळलेल्या संरक्षक कठड्याच्या ठिकाणी नव्याने संरक्षण कठडे उभारले आहेत. परंतु, धोकादायक ठिकाणी हे संरक्षण कठडेच उभारले नसल्याने ही कमतरता मात्र वर्षा पर्यटनातील त्रुटी राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्यावरील दिशादर्शक फलक गटाराची साफसफाई अन्य कामही युध्दपातळीवर आहेत. गटारात दगड, माती जाऊन पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबवणे हे महामार्ग विभागाला आव्हान राहणार आहे. एकूणच यावर्षी वर्षा पर्यटन सुखकर होण्याच्या दृष्टीने सर्वच यंत्रणा सज्ज आहे.
चौकट
हुल्लडबाज पर्यटकांना आवर घालणे गरजेचे
आंबोली वर्षा पर्यटन दरवर्षी पर्यटकांनी गजबजलेला असतो. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची आवक असते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि हुल्लडबाज आणि मद्यपी पर्यटकांना आवरणे पोलिसांसमोर आव्हान असते. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणेने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
चौकट
पर्यटन वाढीसाठी ‘वन’चा पुढाकार
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने वन विभागाने पर्यटकांना पर्यटन स्थळांची सैर घडवण्यासाठी दोन वाहने सज्ज ठेवली आहेत. ही वाहने वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देण्यात आली आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आंबोली परिसरातील निसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल. सध्याही आंबोलीमध्ये दाट धुके आणि पावसाचा अनुभव घेता येत असून, घाटात धुक्याची चादर पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
चौकट
पर्यटकांचे आकर्षण केंद्रे
* आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबे
* नांगरतास धबधबा
* हिरण्यकेशी नदीचा उगम आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ
* महादेव गड पॉईंट
* वनबाग
* फुलपाखरू उद्यान
* गेळे-कावळेसाद पॉईंट
* चौकुळमधील विविध पर्यटन स्थळे
कोट
आंबोली घाटामध्ये दरडी तसेच झाडे कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जेसीबी, ट्रॅक्टर आणि अन्य यंत्रणा २४ तास तैनात ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत घाटातील दिशादर्शक फलक तसेच गटारातील साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर आहे. एकूणच वर्षा पर्यटन शुकर होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
- वैशाली पाटील, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.