‘इथे ओशाळला मृत्यू’ ची घोडदौड

‘इथे ओशाळला मृत्यू’ ची घोडदौड
Published on: 

swt2613.jpg
66402
‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकातील टिम.


‘इथे ओशाळला मृत्यू’ ची घोडदौड

लीड
स्वराज्याचे धाकले धनी हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास चारशे वर्षानंतरही तेवत ठेवण्याचे काम प्रा. वसंत कानेटकर यांच्य स्व-हस्त लेखणीतून साकारलेल्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाट्य कृतीने केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील खडतर प्रसंग व स्वराज्य रक्षणाबरोबरच धर्म रक्षणासाठी दिलेली प्राणाची आहुती, त्या इतिहासातील धगधगत्या निखाऱ्याची जीवनगाथा सांगणाऱ्या या नाट्य कृतीची पताका फडकवत शिव गणेश प्रोडक्शन छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवून मनामनात रुजविण्याचे सतकार्य करीत आहे. शिव गणेश प्रोडक्शनचा इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा ७५ व्या अमृत महोत्सवी प्रयोगाचे सादरीकरण आज कास (बांदा) येथे होणार आहे. यानिमित्ताने...
- संदेश देसाई
---------------
नाट्य रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते, उत्कृष्ट दिग्दर्शक तसचे पेशाने मूर्तिकार असलेले शिवगणेश प्रोडक्शनचे संस्थापक गणेश ठाकुर हे गेली अनेक वर्षे उत्सव व प्रायोगिक रंगभूमीवरून चारशे वर्षा पूर्वीच्या ऐतिहासिक प्रसंगांची अनुभूती करून देत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या शिवगणेश प्रोडक्शनला १२ वर्षाचे एक तप लोटले आहे. या माध्यमातून ते आपल्या सहकलाकारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नाट्य कृतीतून जागृत ठेवण्याचे कार्य करीत आहेत. अनेक वर्ष कलाकार म्हणून वावरत असताना वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या सानिध्यात राहून त्यांनी अनुभव संपादन केला आणि, त्याच्या जोरावर दिग्दर्शनाला सुरुवात केली. दांडगा अनुभव गाठीशी असल्याने यातूनच अनेक कलाकारांना सामाजिक, ऐतिहासिक, संगीत, पौराणिक नाटकांसाठी मार्गदर्शन करण्यास सोपे झाले अन् कलाकारांची खाण निर्माण केली. गोवा राज्य तसेच सिंधुदुर्गमधील अनेक कलाकार घडवून कलेची जोपासना करण्याचा कानमंत्र दिला. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून वावरत असताना आपले स्वतःचे प्रोडक्शन असावं, अशी त्यांच्या मनी इच्छा निर्माण झाली. शिवगणेश प्रोडक्शन स्थापन करून त्यांनी आपल्या इच्छेला मूर्त स्वारुप देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राज्यातील पहिले महानाट्य केले होते. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपल्या प्रोडक्शनच्या माध्यमातून श्री. ठाकूर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘शिवरत्न संभाजी’ महानाट्य उभे केले. या नाट्य पुस्तिकेचे लिखाण आणि दिग्दर्शन स्वतः करून दोनशे कलाकारांचा संच गोळा करत महानाट्याचा घाट घातला. हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील या महानाट्यात त्यांनी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. आणि येथूनच अभिनयाबरोबर त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. महत्वाचे म्हणजे या महानाट्यात येसूबाई भूमिका साकारणासाठी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी या संस्थेच्या संचालिका डॉ. सोनल लेले यांची वर्णी लागली. प्रायोगिक तत्त्वावर हे पहिले महानाट्य सावंतवाडी येथे सादर करण्यात आले. घोडे, भव्यदिव्य दू-मजला रंगमंच, दोनशे कलाकार असलेल्या या महानाट्याने लोकांची मनी जिंकली. मात्र, या महानाट्यासाठी येणारा आर्थिक बोजा ही बाब जमेची नसल्याने पुढे त्याचे प्रयोग करण्यास कठीण झाले. असे झाले असले तरी येतीलच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
शिव गणेश प्रोडक्शन व मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या माध्यमातून एका नव्या नाटकाची निर्मिती झाली. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित आणि प्रभाकर पणशीकर यांनी औरंगजेब ही खलनायकाची भूमिका अजरामर करून नावलौकिक प्राप्त झालेले ‘इथे ओशाला मृत्यू’ हे नाटक पुन्हा शिव गणेश प्रोडक्शनच्या माध्यमातून पुढे आले. या नाटकाचे दिग्दर्शक आणि स्वतः संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे ठाकूर यांनी तळागाळातील कलाकार एकत्र करून ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा संच उभारला. या संस्थेच्या माध्यमातून निर्मिती केलेल्या या नाट्यप्रयोगाचा पहिला पडदा २०१६ ला सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै या नाट्यगृहात उघडला. या प्रयोगाचा प्रारंभ श्री शिवाजी रायगड मंडळ पुणेचे कार्यवाह, इतिहास संशोधक सुधीर थोरात यांच्या हस्ते झाला. हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला होता. पहिल्याच प्रयोगाने गाठलेल्या उंचीच्या चर्चेला उधाण आले. तिकीट अभावी जो प्रेक्षक वर्ग नाटकाचा आस्वाद न घेता माघारी परतला होता, त्यांच्या व खास लोकाग्रहास्तव लगेचच दुसऱ्या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. दर्जेदार सादरीकरण झालेल्या या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अद्वितीय पराक्रम भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याची वैभवशाली मुहूर्तमेढ या प्रयोगांने रंगभूमीवर रोवली गेली. तेव्हापासून ते आतापर्यंत एक दशक ही नाट्यकृती संपूर्ण महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना भुरळ घालत आहे.
दिग्दर्शक म्हणून अनेक ठिकाणी जात असताना ठाकूर यांनी नाटकासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या गुणी कलाकारांची पारख केली. त्यांना आपल्या संस्थेत सहभागी करून घेत ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचे यशस्वी कलाकार घडविले. अनुभवी दिग्दर्शकाची शिदोरी गाठीशी असल्याने त्यांनी कलाकारांमध्ये अनेक पैलू पाडले. प्रत्येक भूमिकांवर वेगवेगळी छाप टाकली. इतिहासाची आणि नाट्यकलेची अतीव आवड असलेल्या डॉ. सोनल लेले यांनी शिवरत्न संभाजी या महानाट्यात महाराणी येसूबाईची उल्लेखनीय भूमिका साकारली साकारली होती. त्यामुळेच ‘इथे ओशाळला मृत्यू’ मधल्या भावभावनांचे अनेक कंगोरे असलेल्या तडफदार महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी त्याचं नाव निश्चित झाले. डॉ. लेले यांनी महाराणी येसूबाई यांची हुबेहूब आणि लिलया पेललेल्या भूमिकेमुळे महाराणी येसूबाई आणि डॉ. लेले असं समीकरण रसिकांच्या मनात रुजलं. सावंतवाडी तालुक्यातील एक हरहुन्नरी व प्रमाणिक कलाकार प्राध्यापक मिलिंद कासार हे डॉ. सोनल लेले यांच्या माध्यमातून या ग्रुपला येऊन मिळाले. त्यांच्या अंगी असलेल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर गणोजी शिर्के आणि कवी कलश या दोन्ही महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांचे नाव कोरले गेले. साजेशी दे एसटी आणि भरगच्च आवाजाने पात्रांवर त्यांनी आपली मोहर उमटवली. संताजी घोरपडे या पात्रासाठी निवड झालेले युवा कलाकार मंदार जंगम यांच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे मल्लोजी बाबा ही या नाटकातील मर्मभेद करणारी वजनदार भूमिका त्यांच्या वाट्याला आली. उत्सव रंगभूमीवर गणेश ठाकूर यांच्या दिग्दर्शनाच्या कुशीतून आपली अभिनयाची कारकीर्द सुरू करतानाच कृष्णा देसाई हे नाव आलमगीर (औरंगजेब) भूमिकेसाठी निश्चित झालं. नटवर्य प्रभाकर पणशीकरांच्या भूमिकेने उत्तुंग उंची सत्तरच्या दशकात गाठलेली होती. असदखान भूमिका वटवताना अजिंक्य देसाई हे आपल्या मुद्रा अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे आपल्याकडे ठेवतात. युवा कलाकार संदेश देसाई या नाटकात एक आव्हानात्मक भूमिका पेलत आहेत. फक्रुद्दीन (मौलवी) ही ७० वर्षाच्या भूमिकेतील व्यक्तिरेखा साकारत असताना मनोरंजनाबरोबरच सरते शेवटी छुप्या खलनायकाची गुप्तता भेदून संभाजी महाराजांना मौत सुनावणाऱ्या क्रुरतेचे प्रमाण देणारी भूमिका ते अलगद पेलतात.
प्रयोग संपल्यानंतर मौलवीची भूमिका साकारणाऱ्या संदेश देसाई यांची विंगेत भेट घेऊन त्यांच्या वास्तवातील वयाची विचारपूस कसून केली जाते. आपल्या वयापेक्षा चार पटीने जास्त असेल्या वयाची भूमिका साकारण्याचं आव्हान समर्थपणे पेलत प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. प्राध्यापक मिलिंद कासार यांच्या माध्यमातून विनय वाडकर हाही युवा कलाकार नाट्याच्या संपर्कात संताजी घोरपडे या भूमिकेसाठी आला आणि संताजीमय होऊन गेला. या छोट्याशा भूमिकेतही आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाने त्यांनी रंग भरले. मुकर्रब खान या क्रूरकरम्याची भूमिका सुरुवातीच्या काळात मदन गवस यांनी अफाट ताकतीने उभी केली. तर, ही भूमिका आता दीपक झोरे सारख्या अवलिया कलाकाराने उचलून धरली. मंदार जंगम व दीपक झोरे या दोन्ही अवलिया कलाकारांनी या प्रयोगात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम देखील नोंदवलेला आहे. आदेश खानोलकर या उदयोन्मुख कलाकाराने ही बालकलाकार म्हणून येऊन पुढे संताजी, धनाजी व असदखान या भूमिका सहजपणे पार पाडल्या. गेली पंचवीस वर्ष गणेश ठाकूर यांनी दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि त्यांच्या या कसलेल्या दिग्दर्शकीय अनुभवातून इथे ओशाळाचा ७५ प्रयोगांचा महोत्सवी घोडदौड प्रवास यशस्वी झाला.

कोट
मातृभूमी शिक्षण संस्था संचलित शिव गणेश प्रोडक्शन ही संस्थापक आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे गणेश ठाकुर यांच्या आता परिश्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमृत महोत्सवी ऐतिहासिक प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये संस्थेने प्रवास सुरू ठेवला आहे. माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माहिती तंत्रज्ञान व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार निलेश राणे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही प्रयोगांचे आयोजन करत सहकार्य केले. सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम भोसले यांनी संपूर्ण नाट्यप्रयोगालाच ‘वन्स मोअर’ देत नाट्यसृष्टीतच नवीन इतिहास घडवला. आणि ‘वन्स मोअर’चा नाट्यप्रयोग पुन्हा सादर देखील झाला.
- विनीत गाडगीळ, संस्थापक, अग्रेसर भारत
------------
कोट
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अजरामर करणाऱ्या मराठी नाट्यसृष्टीतील पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आठवणींना आता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारणारे गणेश ठाकूर यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहला प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा गतवैभवाची जाणीव झाली.
- श्रीमती कांचनताई काशिनाथ
----------------
कोट
‘इथे ओशाळला मृत्यू’सारख्या क्लासिक्स या सदरात मोडणाऱ्या नाटकाचे शिवधनुष्य आत्ताच्या काळात पेलणाऱ्या शिव गणेश प्रोडक्शन्सच्या दिग्दर्शकाचे व सर्व कलाकारांचे विशेष कौतुक. 
- दिग्पाल लांजेकर, सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक
--------------
कोट
खुर्चीला खीळवून ठेवणारा देखणा नाट्यप्रयोग अनुभवायला मिळाला. या संचातील सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक.
- गश्मीर महाजनी, सिने अभिनेते
--------------
कोट
पहिलाच नाट्यप्रयोग पाहिला. ज्यामध्ये प्रत्येक भूमिका तेवढीच उत्कृष्ट होत आहे. त्यामुळे नाटकही अतिशय उत्कृष्ट होत आहे. हे नाटक प्रत्येक शहरात, गावात व्हायला पाहिजे.
- ऋषिकेश रानडे, गायक
-----------
कोट
नाटकाची अतिशय अवघड भाषा, पल्लेदार डायलॉग अर्थपूर्ण रीतीने बोलण्यात सर्वच कलाकार यशस्वी झालेले आहेत.
- जान्हवी पणशीकर, नाट्य अभिनेत्री
--------------
कोट
इतिहासातील घडामोडी अतिशय बारकाव्याने नाट्यरूपात सादर केलेलं उत्कृष्ट नाटक, सर्वच भूमिकांचे अभ्यासपूर्वक मांडणी, उत्कृष्ट दिग्दर्शन लाभलेली नाट्य कलाकृती आहे.
- अनिल गवस, अभिनेते
--------------
कोट
नवीन पिढीला हा इतिहास समजावा यासाठीच मी या नाटकाचे आयोजन केले होते. खरेखुरे संभाजी महाराज आपण उभे केले. संभाजी राजे आणि महाराणी येसूबाई दोघांचेही आभार. बोलायला शब्दच नाहीत, डोळ्यात अश्रू आहेत.
- सुधीर गाडगीळ, आमदार
-----------------
कोट
कर्नाटक राज्यात नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांचा पहिला प्रवेशाच्या शेवटी हैदराबादच्या एका मराठी व्यक्तीने अभिनयाने भारावून आपल्याला मंचावर बसण्याची विनंती करत पैशांचा अभिषेक व साष्टांग दंडवत घातला. अनपेक्षित अशा दृश्याने सर्वजण चकित झाले. हा क्षण अविस्मरणीय ठरला. अमृत महोत्सवी प्रयोगापर्यंतचा प्रवास पूर्ण होताना गवसलेले सर्वच कलाकार अनमोल रत्न आहेत. समवयस्क असूनही दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करतात. माझ्या गुरुवर्यांचे ते शब्द; कितीही हुशार असलं तरी दिग्दर्शकाच्या सूचनांचे पालन करणारा गुणी कलाकार होऊ शकतो. माझ्या कलाकार गुणी आहेत याचा मला अभिमान आहे. सर्वांच्या सोबतीने नाट्य क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेता यावी अशी प्रार्थना नटेश्वर चरणी करतो.
- गणेश ठाकुर, संस्थापक, दिग्दर्शक, अभिनेते
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.