एसटीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३४ फुकट्यांना चाप

एसटीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३४ फुकट्यांना चाप

Published on

(एसटीचे चित्र)

एसटीतून फुकट प्रवास करणाऱ्यांना चाप
विनातिकीट १३४ प्रवाशांवर कारवाई ; वर्षात ३५ हजारांचा दंड वसूल, भरारी पथक सक्रीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी , ता. २७ ः एसटी महामंडळाच्या एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्याविरुद्ध एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षभरात रत्नागिरी विभागात भरारी पथकाकडून बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३४ प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून, अशा फुकट्या प्रवाशांकडून ३५ हजार १११ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एसटीची सेवा ही शहराबरोबरच ग्रामीण लोकांची वरदायिनी मानली जाते. सध्या एसटीने विविध सवलत योजना आणल्या आहेत. शासनाने ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एसटी बसकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या जास्त असली तरी तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. याच एसटी बसमधून हजारो प्रवासी जिल्हाअंतर्गत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यांसह विविध ठिकाणी प्रवास करत असतात. वाहक प्रत्येक प्रवाशांना तिकीट काढले आहे का, विचारत आपले कर्तव्य पूर्ण करत असतात. परंतु यामधूनही काही प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढता बिनधास्तपणे प्रवास करत असतात. अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांविरुद्ध एसटी महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.
फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या भरारी पथकांमार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बसची तपासणी करण्यात आली. फुकटचा प्रवास करणाऱ्या १३४ प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३५ हजार १११ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येथून पुढेही ही कारवाई अखंडितपणे सुरू राहणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तिकीट काढून प्रवास करा...
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी मोठी रक्कम असेल ती प्रवाशांना भरावी लागते. त्यामुळे दंडाची दुप्पट रक्कम भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन ही एसटी महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com