बंद कालावधीआधीच मासेमारी हंगाम संपुष्टात

बंद कालावधीआधीच मासेमारी हंगाम संपुष्टात

Published on

66662

बंद कालावधीआधीच मासेमारी हंगाम संपुष्टात

मॉन्सूनचे लवकर आगमन; मच्छिमारांकडून नौका किनाऱ्यावर आणण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः अवकाळी पाऊस आणि लवकरच झालेले मॉन्सूनचे दमदार आगमन यामुळे वेळेआधी मच्छीमार हंगाम संपुष्टात आला. आता किनारी भागातील वातावरण खराब असल्याने मच्छीमारी नौका बंदरात थांबून होत्या. काहींनी नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरूवातही केल्याचे चित्र आहे. दरम्यान, रविवारपासून (ता.१) मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी सुरू होणार आहे.
अनेक अडचणींवर मात करीत यंदाच्या मासेमारी हंगामाचे अखेर पावसामुळे सूप वाजले. समुद्रातील मासेमारीचा शेवट होण्यास अजुन काही दिवस बाकी होते. मात्र, तत्पूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरत मासेमारी हंगामाला ब्रेक लावला. त्यामुळे स्थानिक मासेमारी थंडावली होती. स्थानिक मच्छीमारी नौका बंदरात थांबून होत्या. समुद्रातील वातावरण बदलल्याने तसेच खोल समुद्रात मासेमारीला जावू नये आवाहन प्रशासनाने केल्याने मासेमारी हंगाम थंडावला होता. मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत असतानाच त्यातच वेळेआधीच मॉन्सूनचेही दमदार आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासून किनारी भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे मासेमारी नौका बंदरात थांबून आहेत. रविवारपासून (ता.१) मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वी पावसानेच मासेमारी हंगाम संपुष्टात आणला. हंगामाचा शेवट आल्याने मच्छीमार नौका पाण्याबाहेर काढण्याबरोबरच मच्छीमारी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू होती. मात्र, पावसाने हंगामाचा आधीच शेवट झाला. १ जुनपासून ३१ जुलैपर्यंत एकूण ६१ दिवस मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी असतो. या काळात समुद्रातील मासेमारी बंद असते. मात्र, पावसामुळे मच्छीमारांना वेळेआधी हंगाम ओटोपता घ्यावा लागला. उन्हाळी हंगामात अखेरच्या टप्यात किंमती मासळी मिळते. यंदा मात्र मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने कहर केला. पर्यायाने मासेमारी हंगाम अडचणीत आला. पावसामुळे मच्छीमारी नौका पाण्याबाहेर काढण्यात येत आहेत. खाडीकिनारी मासेमारी नौका पाण्याबाहेर काढण्याचे नियोजन सुरू आहे. खाडीकिनारी पाण्याबाहेर काढलेल्या नौकांची शाकारणीची कामे सुरू आहेत. पावसाळी हंगामातील कामे उरकण्यावर मच्छीमारांचा भर आहे. काहींनी आपल्या नौका किनाऱ्यावर घेऊन त्याची शाकारणीची कामे सुरू केली आहेत. पावसाने हंगामाचा शेवट झाल्याने खाडीकिनारी मच्छीमारांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे. खाडीकिनारी भागातील मासळी लिलावाच्या ठिकाणची लगबग थंडावली आहे. येथील बंदरात मासेमारी नौका विसावल्या आहेत.
.......................................
मच्छिमार परतीच्या प्रवासास
मासेमारी हंगामाचा शेवट होण्यास काही दिवस अद्याप शिल्लक होते. मात्र, तत्पूर्वी पावसाने हंगाम आटोपता घ्यावा लागला. नौका पाण्याबाहेर काढण्यात येत आहेत. खाडीकिनारी सर्वत्र धांदल दिसत होती. विविध नौकांवरील मच्छीमार आता आपापल्या गावी परततील. पावसाळ्यानंतर नवीन हंगामाच्या अनुषंगाने नियोजन आता सुरू होईल.
.........................................
खाडी, ओहळांनजिक मासे पकडण्याची लगबग
समुद्रातील वातावरण पाऊस आणि वाऱ्यामुळे खराब असल्याने समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले जात आहे. येथील बंदरात स्थानिक नौकांबरोबरच काही अन्य ठिकाणच्या नौकाही आश्रयाला आल्या आल्या होत्या. समुद्रातील मासेमारी थंडवल्याने पावसाळी हंगामात आता खाडीतील माशांवर खवयांचा भर असेल. विशेषतः तिसर्‍या, मुळे, खेकडे याकडे आता खवयांचे लक्ष असेल. खाडीकिनारी पावसाळ्यात मासे गरवण्यात येतात. तसेच ग्रामीण भागात ओहोळातील खेकडे पकडण्यासाठी पावसाळ्यात धावपळ सुरू होईल.
...................
मासेमारीचे साहित्य वाळवण्यास संधीच नाही
दरवेळी मासेमारी हंगामाचा शेवट होताना मच्छीमारी जाळी चांगली स्वच्छ करून ऊनात वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. मात्र, यंदा जाळी वाळवण्याची संधी पावसाने मच्छीमारांना दिली नाही. सुरूवातीला मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत असल्याने नंतर पाऊस थांबेल या आशेवर मच्छीमार असतानाच त्याला जोडूनच मॉन्सूनचेही आगमन झाल्याने मासेमारीची जाळी वाळवण्यास पुरेसा अवधी मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com