संतवाणीतून आम्रकौतुक
लोगो..............संतांचे संगती
धनंजय चितळे
कोकण म्हणजे विविध फळाफुलांचे आगरच. करवंद, जांभळे, अळू, अटकं या रानफळांची गोडी काही औरच. फणसाचेही अनेक प्रकार इथे चाखायला मिळतात. या साऱ्या फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. मराठी वाङ्मयातही या फळाने स्थान मिळवले आहे. लोकगीतापासून ते चित्रपटगीतांपर्यंत आढळणारा आंबा संतवाणीत कसा नसेल?
rat२८p७.jpg-
- धनंजय चितळे, चिपळूण
----
संतवाणीतून आम्रकौतुक
आपल्या संतांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व चराचरात श्री भगवंतांचे दर्शन घेतात. त्यांच्या दृष्टीने या जगातील सजीव, निर्जीव साऱ्याच गोष्टी भगवंतांनी घडवलेल्या आहेत. पृथ्वीवरी जितुकी शरीरे। तितुकी भगवंतांची घरे। असेच संतांचे मानणे आहे म्हणूनच संत वाङ्मयात अनेक प्रकारचे विषय हाताळलेले दिसतात. समर्थ श्रीरामदास स्वामींनी धबधबा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते याबद्दल जसे लिहिले तसेच झाडांबद्दलही सविस्तर लिहिले आहे. नुकताच आंब्याचा मोसम संपला आहे. फळांचा राजा असणाऱ्या रसराज आंब्याविषयी श्रीसमर्थांनी १८ ओव्या लिहिल्या आहेत. आंब्याप्रमाणे या ओव्याही अत्यंत रसाळ आहेत. श्री समर्थांनी या काव्याची मोठी नाट्यमय सुरुवात केली आहे. जणू श्रोते गडबडीत आहेत, निघून जात आहेत म्हणून ते त्यांना थांबवताना म्हणतात,
ऐका ऐका थांबा थांबा । कोण फळ म्हणविले बा ।
सकळा फळांमध्ये आंबा । मोठे फळ ।।१।।
येथे मोठे फळ हा शब्दप्रयोग श्रेष्ठफळ या अर्थाने आला आहे. ते पुढे सांगतात, या फळाच्या चवीची कल्पना करता येत नाही म्हणजे तो एकाच चवीचा नाही, त्यांचे रंगरूपही वेगवेगळ्या प्रकारचे आहे.
त्याचा स्वाद अनुमानेना। रंगरूप हे कळेना।
भूमंडळी आंबे नाना ।। नाना ठायी।। २।।
मावे हिरवे सिंदूर वर्ण । गुलाली काळे गौरवर्ण ।
जांभळे ढवळे नाना जाण । पिवळे आंबे ।।३।।
आंबे एकरंगी दुरंगी । पाहू जाता नानारंगी।।
अंतरंगी बाह्यरंगी। वेगळाले ।।४।।
आंबे वाटोळे लांबोळे । चापट कळकुंबे सरळे।
भरीव नवनीताचे गोळे । ऐसे मऊ ।।५।।
नानाफळांची गोडी ते । आंब्यामध्ये आढळते।
सेपे कोथिंबीर वासाचे । नानापरी।। ६।।
शेपूच्या किंवा कोथिंबिरीच्या वासाचे आंबे हे वाचताना मला लहानपणी खाल्लेले रायवळचे अनेक प्रकार आठवले. आज एकाच चवीचा हापूस खाणारी नवी पिढी पाहिली की, त्यांना रायवळ, पायरी इ.चा आस्वाद घ्यारे, असे सांगावेसे वाटते. असो,
आंबे वाकडेतिकडे । खर्बड नाकाडे लंगडे ।
केळे कुहीरे तुरजे इडे । बाह्याकारे ।।७।।
कोयी लहान वाणे मोठे । मगज अमृताचे साठे ।
हाती घेता सुख वाटे । वास येता ।।८।।
वरील आठ ओव्यांमधील आंब्याचे विविध रंग, आकार वाचताना श्रीसमर्थांच्या सुक्ष्म निरीक्षणशक्तीची कमाल वाटते. यातील पाचव्या ओवीतील पिकलेला आंबा म्हणजे जणू भरलेला लोण्याचा गोळा ही उपमा किती अप्रतिम आहे ना! ज्या आंब्यांची कोय लहान असते ते जणू अमृताचे साठेच होत. असे आंबे हातात घेऊन त्याचा वास घेतानाही सुख वाटते, हे आठव्या ओवीतील सांगणेही अगदी पटते ना? या आंबावर्णनाच्या पुढच्या ओव्याही अतिशय सुंदर आहेत..त्यांचा आस्वाद पुढील भागात घेऊया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.