संगमेश्वर-मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

संगमेश्वर-मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण

Published on

rat28p2.jpg-
66696
संगमेश्वरः मुसळधार पावसात मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा. (छायाः रूपेश सावंत, मारळ)

मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा
पर्यटकांसाठी आकर्षण
संगमेश्वर, ता. २८ ः संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावाजवळील श्री क्षेत्र मार्लेश्वर व तेथील धारेश्वर धबधबा संपूर्ण राज्यात विशेष प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील उंच अशा सह्याद्रीच्या डोंगरातून छोटे छोटे धबधबे व दुधाळ, फेसाळणारा असा येथील धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचा उंचावरून कोसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो.
ऐन मे महिन्यात गेला आठवडाभर संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सह्याद्रीच्या डोंगररांगातून सात छोटे-छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याला जाऊन मिळतात. त्यामुळे देवस्थानच्या समोरून दिसणारा मोठा धबधबा सध्या वाहत आहे. हे दृश्य पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरत आहे; मात्र पावसाळ्यात हा धबधबा अतिप्रवाहित असतो. त्या वेळी धबधब्याखाली आंघोळ करणे धोक्याचे आहे. सातत्याने उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे येथे तलावसदृश स्थिती निर्माण होते. त्याची खोलीही मोठी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. तशा प्रकारचे सुरक्षाफलकही या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

चौकट
देवरूखातून १८ किलोमीटर
मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरूख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ५३० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे. येथील धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व वाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com