बोल बळीराजाचे
बोल बळीराजाचे ............लोगो
अतिशय अनपेक्षित वळवाच्या म्हणा किंवा पूर्वमोससी म्हणा, पावसानं बळीराजाचं कंबरडंच मोडलंय. आताशा हवामान खात्याचे अंदाज ब-याच प्रमाणात बरोबर येतात. वीस मे च्या दरम्यान पाऊस पडणं तसं अपेक्षित होतं पण तो कोसळधार पडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. याआधीही वीस मे नंतर वळवाचा पाऊस पडून तो नंतर खराच झालाय. होळीच्या शेंड्यावर पाऊस पडतोच. पण यावर्षी त्यानं ठाणच मांडलं. निसर्गकृपेनं आंबा आटोपला असला तरी फणस, रतांबा यंदा मागस होता. करवंद, जांभुळ तर कोणाच्या खिचगणतीतच नाहीत. पण आगोटाची कामं, बेगमीची वाळवणं, लोणची-पापड-आमसुलाची वाळवणं साफ धुवून नेली त्या पर्जन्य राजानं..! आता तो कधी दमतोय याची वाट बघायची.. माझा बळीराजा या असल्या संकटांना धूप घालणारा नाही. शासकीय नुकसान भरपाई, पंचनामे यात तो रडतही बसणार नाही. फुकट वाटणारे आता काही द्यायच्या परिस्थितीत राह्यले नाहीत. तो नव्या दमानं या चिखलात अंकुर फुटायसाठी प्रयत्न करणार..त्याला हवाय फक्त पाठीवर हात..‘तु लढ..’ म्हणणारा.. सहासष्टच्या वादळात,फयान-तोक्तेनंतर तो असाच उभा राह्यलाय..नव्या उमेदीनं.
rat३०p२.jpg-
25N67098
- जयंत गोपाळ फडके, जांभुळआड पूर्णगड रत्नागिरी
---
उघडीपीची वाट बघणार,
मुगा रहु काढुन पेरे करणार
खरंतर या पावसानं पर्यटन, लग्न सराई, कॅनिंग अन्य प्रक्रिया उद्योग, प्रवासी वाहनं, मासेमारी, हॉटेल, छोटे मोठे व्यावसायिक सा-यांचंच अतोनात नुकसान केलंय. कशा कशाचा पंचनामा करणार आणि मदत तरी किती देणार? पण माझा बळीराजा भाजावळीचा मसावा वाहुन गेला आणि वाफसा फुगला म्हणुन कपाळाला हात लावून बसणार नाही. तो उघडीपीची वाट बघणार, मुगा रहु काढुन पेरे करणार..वाफसा जेव्हा शेतात शक्य नाही तेव्हा कोमटपाणी, भाताच्या पेंढ्यात भात उमलवुन दाबुन त्याला उब आणून मोड आणायची कला माझा बळीराजा चांगलीच जाणून आहे. इथं दुबार पेरणीचं संकटच हार मानतं त्याच्या पुढे..रतांबा फोडुन साली मीठ लावून ठेवल्या की नुकसान झेपवतात आणि फणस काढता आले नाही तर पाडून गरे तळायला, फणसाचा रस कॅनिंग करायला, आटवायला वापरणार तो. कुर्याढांच्या तुंबलेल्या मळ्यांचे बांध दारी मोकळी करून राखणार आणि घोंगडीच्या आडोशाने पडवळ, भेंडी,वाल टोवायची तयारीही करणार..!
संकटात संधी शोधणारा कोकणातील शेतकरी रडणारा नाही लढणारा आहे.त्यानं मागच्या उप-याच्या कोळ्या आंब्याचं लोणचं घातलंय आणि पावशी, भोपळी आंबे हौशीनं आलेगेलेल्याला वाटतोय. मागच्या दारी परातीत छान रस आटवून मावा तयार होतोय. चाकरमान्याना आमसुलं देता नाही आले तरी तळलेले गरे आणि गुळांबा, मेथांबा नक्कीच देणार तो.. वाळवलेलं खोबरं,थाळीत भाजलेल्या बीया,आठळा, आंबोशी बेगमीसाठी साठवुन ठेवतोच तो..शिमग्यालाच भाजावळी सुरू होत असल्या तरी रोपटे, अळी वळवानं धुऊन नेली तरी तो जरा दमानं आणि धीरानं वागून नक्कीच या परिस्थितीवर विजय मिळवणारच..
खरंतर आंबा कल्पनेपेक्षा आधीच आटोपल्यानं जगाच्या दृष्टीनं असं काय मोठं नुकसान झालंय? पण आंबा हा पैसे देणारा असला तरी तो कमालीचा लहरी आहे.दरवर्षीच दामदुप्पट पैसे आंब्यात मिळत नाहीत.‘उतू नको मातू नको’.. असं करत माझा बळीराजा त्याची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतो. पहील्या पेटीच्या दराच्या गप्पा मारणा-यानी आत्ता कलमांखाली फिरून जरूर बघावं. कॅल्क्युलेटरवर गणितं करीत ‘कोया चोखणा-या’ आणि चाकण्याला ‘मसाला गरे’ हवेच म्हणणा-या स्थावर जंगंम इस्टेटीच्या गप्पा मारणा-यांना वळवाच्या पाऊस अत्तराच्या बाटल्या फोडणारा मृदुगंध का देत नाही हे कसं समजणार?
गेल्या दहा बारा दिवसात माझ्या बळीराजाचे झालेले अतोनात हाल दारा समोरचे फुगलेले झापाचे मांडव आणि उखळलेल्या खळांपेक्षा भीषण आहेत. समाज माध्यमांवर चिखलानं भरलेले मुंबई गोवा हायवेचे फोटो फिरतायत. पण रातांबीखाली पडलेला कोकममाचा सडा आणि शेतखळ्यावर भिजून उमललेला माझ्या गुराढोरांचा घास का बरं दिसत नाही? ‘दुगस्ता पिक बरा व्हता आवंदा हातात काय नाय’ हा चेष्टेचा विषय नाही तर भुतकाळाच्या सुबत्तेवर आणि भविष्याच्या आशेवर वर्तमान साजरं करणा-या माझ्या बळीराजाची ही वृत्ती आहे. तो हार मानत नाही आणि पिढ्यांन पिढ्या थकत नाही. तो जगाचं पोट भरायला समर्थ आहे.. त्याला सरकारी मदतीची भिक नकोय फक्त एकदा पाठीवर हात ठेवून तू लढ म्हणणारा समाज, त्याची प्रतिष्ठा जपणारं मायबाप सरकार हवंय.. असे कितीतरी वळीवाचे ढग त्यानं पचवलेत, पचवतोय..नाही का?
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.