प्रेरणादायी नेतृत्त्व
पुरवणी डोकेः केंद्रप्रमुख संजय रासम सेवानिवृत्ती विशेष
swt301.jpg
67112
संजय रासम
swt302.jpg
67113
ओरोसः येथील कार्यक्रमात शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा, वैभववाडी तालुकास्तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना संजय रासम, बाजूला इतर मान्यवर.
swt303.jpg
67114
वैभववाडी ः केंद्रबल लोरे-हेळेवाडी या केंद्रातील सर्व शिक्षकांच्यावतीने केंद्रप्रमुख संजय रासम आणि सोनिया रासम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रेरणादायी नेतृत्त्व
लीड
संजय रासम यांचा शैक्षणिक प्रवास हा प्रेरणा आणि समर्पणाचा एक आदर्श आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सेवेची कर्मभूमी ही सिंधुदुर्ग राहिली. येथील शैक्षणिक सेवेत त्यांनी उपशिक्षक, विषयतज्ञ, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख अशी उत्तुंग भरारी घेतली. विज्ञान प्रदर्शनातील त्यांचे योगदान, विद्यार्थ्यांना व्यावसायिक बनवण्याचे प्रयत्न आणि शैक्षणिक नवोन्मेष यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे. शनिवारी (ता. ३१ मे) ते निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला प्रकाशझोत...
-----------------
संजय रासम यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई परळ येथील डॉ. के. एम. एस. शिरोडकर विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन बांधकाम विभागाचे वायरमन म्हणून शासकीय परवाना मिळवला. त्यानंतर मुंबई शहर परिवहन विभाग (बेस्ट) मध्ये अवजड वाहने मोटार अभियांत्रिकीचे अडीच वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर मुंबईत डी. एड. केले. मुंबईत इलेक्ट्रिक, अभियांत्रिकी तसेच इतर क्षेत्रात छोटी मोठी कामे करत त्यांचा जीवनप्रवास सुरू होता. एक दिवस त्यांचे हरकूळ या आपल्या गावी येणे झाले. तेथेही पंखे दुरूस्ती, मिक्सर दुरूस्ती, पंप दुरूस्ती अशी कामे, कुठली ना कुठली यंत्रणा, मशिन बंद बदली की त्याचे रिपेअरिंग अशी हरहुन्नरी प्रकारची कामे सुरू असताना त्यांची तत्कालीन तालुका मास्तर रावजी भिकाजी रासम उर्फ बाबी मास्तर यांच्याशी गाठ पडली. संजय रासम यांना त्यांनी सिंधुदुर्गातच स्थायिक हो आणि शिक्षकी सेवेत करिअर करा, असा सल्ला दिला. शिक्षक सेवेसाठी डी. एड. ही पात्रता त्यांनी आधीच पूर्ण केली होती. त्यामुळे १९८८-८९ मधील शिक्षक भरती प्रक्रियेत त्यांनी अर्ज केला. लागलीच २० फेब्रुवारी १९८९ मध्ये ते उपशिक्षक या पदावर केंद्र शाळा डामरे तिवरे (ता.कणकवली) येथे रूजू झाले. त्याचबरोबर अध्यापन करतानाच त्यांनी सेवांतर्गत बी. एड आणि एम. एड. देखील पूर्ण केले.
तिवरे-डामरे शाळेत अध्यापन सुरू असताना श्री. रासम यांनी आपल्यातील अंगभूत कला विविध उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापनात उतरवल्या. त्यामुळे अल्पावधीतच उपक्रमशील शिक्षक म्हणून ते नावारूपाला आले. आपल्या उद्यमी व्यक्तिमत्त्वाने त्यांनी या शाळेला खरे वैभव प्राप्त करून दिले. तेथील प्रदीर्घ सेवेनंतर ते ''पदवीधर शिक्षक'' म्हणून कुर्ली (ता. वैभववाडी) येथील अतिशय दुर्गम शाळेत रूजू झाले. तेथेही त्यांनी उत्तम अध्यापक, उपक्रमशील आणि विज्ञाननिष्ठ शिक्षक म्हणून सेवा बजावली. वैभववाडी येथे ते ''विषयतज्ञ'' म्हणून काही काळ कार्यरत होते. त्यानंतर ''उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून केंद्र शाळा खांबाळे आणि पदवीधर शिक्षक म्हणून भारत वि. मं. लोरे येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. एप्रिल २०२५ मध्ये त्यांना केंद्रप्रमुखची बढती मिळाली. ते लोरे हेळेवाडी केंद्रात नियुक्त झाले. उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, विषयतज्ञ, उच्च श्रेणी मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख अशा शैक्षणिक सर्वोच्च पदावर त्यांनी आपली कारकिर्द सुवर्ण अक्षरांनी कोरली. आजवरच्या या शैक्षणिक कार्यात त्यांनी शिष्यवृत्ती, क्रीडा तसेच विज्ञान प्रदर्शन अशा सर्वच क्षेत्रात आपल्या शाळांनी बक्षिसांची लयलूट केली. अध्यापनाबरोबर अनेक राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये ते सहभागी झाले.
''संजय रासम'' या नावाला जिल्हाभर वलय लाभले याचे मुख्य श्रेय त्यांनी साकारलेल्या विज्ञान प्रदर्शनातील वैज्ञानिक प्रतिकृतींना द्यावे लागेल. तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर त्यांनी भक्कम कामगिरी करताना ते नेहमीच अजिंक्य राहिले. गेली २९ वर्षे विज्ञान प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. यात महत्वाची बाब म्हणजे ते २१ वेळा विजेते ठरले. यातून त्यांची उपक्रमशीलता आणि विज्ञान विषयातील वैविध्यता, व्यावसायिक उपयुक्तता दिसून येते. याखेरीज चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन व वादन क्षेत्रातील प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले. या सर्वांचा उपयोग त्यांनी सांस्कृतिक उपक्रमांतही केला. त्यांनी तब्बल ८ वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले. यात दोन वेळा ते राज्य पातळीवर विजेते ठरले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर विविध जिल्ह्यांचा दौरा केला. कळसूत्री बाहुल्यांचा वापर त्यांनी अध्यापनात केला. दिवाळीतील आकाश कंदील आणि पणती बनवण्याचे कौशल्यही त्यांनी विद्यार्थ्यामध्ये उतरवले. विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख बनवले. गतवर्षी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतही त्यांनी तालुक्यात प्रथम प्राप्त केला. रासम यांना मूळातच फोटोग्राफी आणि व्हिडिओ निर्मितीची कौशल्यात्मक आवड होती. त्याचा अध्यापनासाठी तसेच इतर शिक्षकवर्ग, शिक्षणप्रेमी यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी यु-ट्युबसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ देखील बनवले आहेत. श्री. रासम यांच्या आजवरच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, क्रीडा क्षेत्रातील चतुरस्त्र कार्याची दखल राज्य शासनाने घेतली. २००५ चा मानाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात त्यांना प्रदान करून गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेनेही त्यांना २००४ मध्ये आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. याखेरीज राज्यस्तरीय नवनीत सन्मान पुरस्काराने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे गौरविण्यात आले. डामरे-तिवरे ग्रामस्थ मंडळाचा उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार तर शिवशाही मित्रमंडळ फोंडाघाटचा आदर्श शिक्षक पुरस्कार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सर्व पुरस्कारांनी श्री. रासम यांच्या कार्याला नवी झळाळी प्राप्त करून दिली आहे.
--------------
चौकट
कुटुंबाची भक्कम साथ
श्री. रासम यांच्या आजवरच्या या प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सोनिया रासम आणि मुलांनीही मोलाची साथ दिली आहे. सोनिया रासम ह्या भरत विद्यामंदिर लोरे क्रमांक १ या प्रशालेतून ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या देखील शाळेच्या गुणात्मक आणि संख्यात्मक वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्यरत राहिल्या. संपूर्ण शैक्षणिक सेवेमध्ये शैक्षणिक कार्याबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा, आदी क्षेत्रांतही त्यांनी सेवा बजावलेल्या शाळांना नाव लौकिक पाप्त करून दिला आहे.
--------------
जीवनप्रवास
* मुंबईतील डॉ. के. एम. एस. शिरोडकर विद्यालय, परळमध्ये दहावीपर्यंत शिक्षण
* इलेक्ट्रीक ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण करून पीडब्ल्यूडी वायरमन परवाना
* मुंबई शहर परिवहन (बेस्ट) विभागामध्ये अवजड वाहने मोटार अभियांत्रिकीसाठी २.५ वर्षे प्रशिक्षण
* समर्थ अध्यापक विद्यालय, दादरमध्ये डी. एड. पूर्ण
* शा. कृ. पंतवालावलकर, अध्यापक महाविद्यालय देवगड येथे बी. एड. पूर्ण
* बहिस्थ, अध्यापक महाविद्यालय, सोमय्या कॉलेज, विद्याविहार घाटकोपरमध्ये
--------------
शैक्षणिक सेवा
* प्रथम नियुक्ती ः उपशिक्षक, केंद्रशाळा डामरे-तिवरे (ता. कणकवली) २० फेब्रुवारी १९८९
* द्वितीय ः पदवीधर शिक्षक, केंद्रशाळा, कुर्ली (ता. वैभववाडी) डिसेंबर २००५
* तृतीय ः उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रशाळा खांबाळे (ता. वैभववाडी) जून २०११
* चतुर्थ ः मुख्याध्यापक रिव्हर्शन, भारत विद्यामंदिर लोरे (ता. वैभववाडी)
* पाचवी ः एप्रिल २०२५ केंद्रप्रमुख, लोरे-हेळेवाडी (ता. वैभववाडी)
* सेवानिवृत्ती ः ३१ मे २०२५ भारत विद्यामंदिर, लोरे (ता. वैभववाडी)
----------------------
शैक्षणिक-वैज्ञानिक उपक्रम
* कोकणातील पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्यापासून हंगामी वीज निर्मिती
* निर्धूर वनचूल
* सायकल मिक्सर
* टाकाऊतून उपयुक्त बॉडी मसाजर
* बहु उद्देशीय स्वच्छता यंत्र
* मोबाईल टॉवरपासून वीज निर्मिती
* सोलार कांदा वाळवणी यंत्र
* कचरा निर्मितीतून उद्योग निर्मिती
* सायकल वॉशिंग व ड्रायर मशिन
* बायो वेस्ट कलेक्टर व वीज निर्मिती
* सरकता जिना (एक्सिलरेटर) पासून वीज निर्मिती
* उर्जा रुपांतरण व उपयोग
* मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करणाऱ्या विविध सुलभ पद्धती
* तरफेचे प्रकार व सेंट्रीफ्यूज
-------
पुरस्कार
* उपक्रमशील शिक्षक, केंद्रबल डामरे- तिवरे
* आदर्श शिक्षक पुरस्कार, डामरे ग्रामस्थ मंडळ मुंबई
* शिवशाही मित्र मंडळ, आदर्श शिक्षक पुरस्कार फोंडाघाट
* जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २००४
* राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राजश्री शाहू रंगभवन, कोल्हापूर २००५
* राज्यस्तरीय नवनीत सन्मान पुरस्कार टपाडिया सांस्कृतिक भवन औरंगाबाद
* बा. रा. कदम गुरुजी राज्यस्तरीय ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार २०१६ साठी नामांकन
* ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात चित्ररथ निर्मितीसाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र
* महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा चंद्रपूर संस्थेच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र
* वसुंधरा विज्ञान संमेलन २०१२
* वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली येथे द्वितीय क्रमांक पारितोषिक
-----------------
विज्ञान प्रदर्शन
* तालुकास्तरीय सहभाग-२९ वर्षे आणि सलग २१ वर्षे क्रमांक
* जिल्हास्तरीय सहभाग-२१ वर्षे आणि १७ वर्षे क्रमांक
* राज्यस्तरीय सहभाग-८ वर्षे आणि क्रमांक दोन वेळा
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.