

67287
कुडाळ एमआयडीसीला ऊर्जितावस्था देऊ
नीलेश राणे ः असोसिएशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी वीजवाहिनीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार नीलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित एमआयडीसी असोसिएशनच्या बैठकीत दिली. कुडाळ एमआयडीसी विकसित होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी केले.
कुडाळ एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पॅकेज जाहीर केले होते. या अनुषंगाने आमदार राणे यांनी असोसिएशन सोबत एमआयडीसी विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेता संजय आंग्रे, दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर, खजिनदार उदय शिरोडकर, अमित वळंजू, राजन नाईक, विशेष निमंत्रित सदस्य मुश्ताक शेख, प्रमोद भोगटे, सल्लागार शशिकांत चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, कायम निमंत्रित सदस्य संतोष राणे उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष होडावडेकर यांनी, एमआयडीसीमध्ये विद्युत पुरवठ्याची कमतरता आहे. त्यामुळे मोठे गुंतवणूक असणारे ४५ उद्योजक गुंतवणुकीची तयारी असूनही येथे प्रकल्प उभारू शकत नाहीत. या ठिकाणी उपकेंद्राची आवश्यकता आहे. तसेच कौशल्य विकास केंद्र येथील उद्योजकांसाठी सामायिक केंद्र आणि एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर होण्याची गरज आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच भुयारी विद्युत वाहिनी या सुविधांकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर आमदार राणे यांनी, एमआयडीसी परिसर विकसित होण्यासाठी कितीही निधी लागला तरी उद्योगमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करून तो मिळवून देईन. विद्युत पुरवठ्यासाठी उपकेंद्र उभारणे महत्त्वाचे आहे. वीज उपकेंद्र व भुयारी वीजवाहिनी या कामांबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे सांगितले. यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना उपअभियंता रेवंडकर यांना दिल्या. एमआयडीसी विकसित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
...................
कचरा प्रकल्प मार्गी लागणार
कुडाळ एमआयडीसीमध्ये नगरपंचायतीने कचरा प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. असोसिएशनने त्याला ना हरकत दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चित मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा आजूबाजूच्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कचरा प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा केला जाणार आहे, अशी माहिती आमदार राणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.