

67295
शेतकऱ्यांना भरपाई द्या; अन्यथा ‘आक्रोश’
संजू परब ः तहसीलदार, कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः पंधरा दिवस अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांचे नुकसान होऊनही तहसीलदार व कृषी विभागाने पंचनामे केलेले नाहीत किंवा शेतकऱ्यांपर्यंत यंत्रणा पोहोचलेली नाही. तहसीलदार व तलाठी वाळू, खडी व चिरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात धन्यता मानत आहेत. शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्यास ‘आक्रोश’ मोर्चा काढू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.
यावेळी बंटी पुरोहित, विनोद सावंत, प्रसन्न शिरोडकर आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, ‘‘आमदार केसरकर यांनी नुकसानीच्या पाहणीचे तहसीलदारांना सक्त निर्देश दिले आहेत. शिवसेनेचे नेते शेतकरी व बागायतदारांना भरपाई देण्याबाबत सरकारकडे बाजू मांडतील. त्यामुळे तहसीलदार व कृषी विभागाने नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून पाठविले पाहिजेत. शेतकऱ्यांचे मिरची, कोकमसह विविध फळांचे, बागायतीचे नुकसान झाले आहे. पाऊस पंधरा दिवस अगोदरच आल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून सरकार दरबारी गेले तर नुकसानीचा निर्णय घेता येईल; मात्र तहसीलदार व कृषी विभागाने पंचनामे केलेले नाहीत. तहसीलदार, तलाठी वाळू, खडी व चिरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात धन्यता मानतात; मात्र शेतकरी व बागायतदार यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वेळीच पंचनामे झाले नाहीत तर आक्रोश मोर्चा काढला जाईल.’’ आमदार केसरकर आणि आमदार नीलेश राणे शेतकरी व बागायतदार यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले तर सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांना आर्थिक नुकसानीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
................
तिन्ही तालुक्यांमध्ये शिवसेनाच पुढे
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांत शिवसेना मजबूत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना नंबर एक आहे, हे येत्या निवडणुकीत दिसेल. शिवसेना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला असून, आमदार केसरकर सतत कार्यरत आहेत, असे श्री. परब यांनी सांगितले.
.................
वाफोली रस्त्याबाबत जाब विचारू
सावंतवाडी शहरातील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय आमदार केसरकरांनी घेतला होता. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला; मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आठ वर्षांपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने सावंतवाडी शहरातील लोकांना काळोखात राहावे लागले, असे श्री. परब यांनी सांगितले. दाणोली ते बांदा रस्त्यावरील वाफोली रस्त्याला भेट देऊन पाहणी करून जाब विचारला जाईल, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.