अस्मानी संकटाने शंभर कोटीची हानी

अस्मानी संकटाने शंभर कोटीची हानी

Published on

६७४३३
६७४३४
६७४३५
६७४३६

इंट्रो

कोकणची अर्थव्यवस्था आंबा, मासळी आणि पर्यटन यावर अवलंबून असते. मात्र यंदा मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही व्यवसायाला फटका बसलेला आहे. हंगाम संपण्यापूर्वीच आवराआवर करावी लागल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. वातावरण बिघडल्यामुळे आंबा हंगाम अडचणीत सापडलेला असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाची भर पडली. त्याचा सर्वाधिक फटका कॅनिंगला बसला. दुसरीकडे मच्छीमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय पंधरा दिवस आधीच गुंडाळावे लागले. त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटूंबांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आर्थिक स्रोत असलेल्या तिन्ही व्यवसायातील सुमारे शंभर कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले असून त्याचा बाजारपेठांवरही परिणाम होणार आहे. या पावसाने खरीप हंगामातील भातशेतीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. बळीराजा द्विधा मनस्थितीत आहे. या व्यवसायातून पावसाळ्याची बेगमी करणाऱ्यांना या अस्मानी संकटाचे फटके पुढील काही महिने सहन करावे लागणार आहेत.

--------

अस्मानी संकटाने शंभर कोटीची हानी
पर्यटन, आंबा, मासळी, वाहतुकदारांना फटका; परिणाम दिर्घकालीन ठरणार, शेतीचं काय?

वेळेआधीच पर्यटक माघारी

मार्च ते मे या कालावधीत दरवर्षी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरं तसेच इतर पर्यटनस्थळांवर देशभरातून आणि परदेशातून पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. यंदा हवामानातील अनियमितता, पाऊस, वाऱ्याचा वेग, विजांच्या कडकडाटामुळे हे पर्यटन थांबलेले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे पर्यटकांचे आरक्षण रद्द करण्यात आले असून, अनेकांनी प्रवास टाळणे पसंत केले आहे. परिणामी, स्थानिक पर्यटन व्यवसायिक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, होमस्टे मालक, बोटचालक, प्रवासी वाहतूकदार तसेच स्थानिक हस्तकला विक्रेते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम रोजगारावरही त्याचे विपरित परिणाम दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी बुकिंग्स रद्द झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे छोटी-मोठी मिळून दीड ते दोन हजार हॉटेल व्यवसायिक आहेत. यामध्ये पाच खोल्यांचे हॉटेल व्यवसायिकाला दहा दिवसात सरासरी एक लाखाचे नुकसान झाले आहे. तेच हॉटेल उच्च दर्जाचे असेल तर त्याला ५ लाखापर्यंत नुकसान सहन करावे लागले आहे. पाऊस थांबल्यानंतरही पर्यटकांचा ओघ कमी आहे. परिणामी, मे महिन्यात २५ टक्केच व्यवसाय झाला, असे गणपतीपुळे येथील हॉटेल व्यावसायिक कल्पेश सुर्वे यांनी सांगितले. तसेच गणपतीपुळे, दापोली, गुहागरसह अन्य समुद्रकिनाऱ्यावरील नारळविक्रेते, उंट व घोडेसफर करणारे, जलक्रीडा व्यावसायिक यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पर्यटकांचा उत्साह कमी झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायीकांना सुमारे पन्नास कोटीहून अधिक फटका बसलेला आहे.

----------
चौकट

छोट्या व्यावसायिकांवर परिणाम

चिपळूणमध्ये ९५ हॉटेल्स आहेत. जेवणाची व्यवस्था, लॉजिंग आणि खानावळीत मे महिन्याच्या पर्यटन हंगामातच दिवसाला ५० हजार ते १ लाखाहून अधिक व्यवसाय होत होता. पण मेच्या मध्यंतराला पडलेल्या पावसाने नियमित व्यवसाय ५० टक्केपेक्षा कमीच झाला. हॉटेलच्या बाहेर चालणाऱ्या पानटपरीचा दिवसाला पाच हजार रुपयाचा व्यवसाय होत होता. त्यांचेही नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात १ हजार १७९ रिक्षा व्यावसायिक आहेत. २०० च्या दरम्यान खासगी वाहने आहेत. चिपळूण रेल्वेस्थानकावर दिवसाला १३ रेल्वेगाड्या थांबतात. एका रेल्वेतून एका व्यवसायिकाला एक भाडे मिळाले तरी एका व्यावसायिकाची दिवसाची कमाई दोन हजार रुपये होते. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना दिवसाला साडेचार ते पाच हजार रुपये एका भाड्याने मिळतात. पर्यटकच घटल्याने त्यावर पाणी फेरले आहे.

-----
दहा दिवसांपूर्वीच मच्छीमारी थांबली

पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे मच्छीमारांनी नौका १० दिवसापूर्वीच बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. जिल्ह्यात मच्छी उलाढालीची २८ केंद्रे आहेत. त्यात नाटे, मिरकरवाडा, हर्णै ही मोठी बंदरे आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत साडेतीन हजार मासेमारी नौका आहेत. यंदा ७३ हजार मेट्रिक टनएवढे मासळीचे उत्पादन झालेले आहे; मात्र मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्वसाधारणपणे होणारी १० ते १२ कोटीची उलाढाल ठप्प झाली. खलाशांचे वेतन देण्यापासून पुढील वर्षी नौकांच्या डागडुजीपर्यंतचा होणाऱ्या खर्चावर त्याचा परिणाम होईल. मासेमारी हंगामाच्या शेवटी मच्छीमारी जाळी स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. यंदा जाळी वाळवण्याची संधी पावसाने मच्छीमारांना दिली नाही. त्यामुळे जाळ्यांचे नुकसान सहन करावे लागू शकते.

-----

पावसाचा परिणाम १० टक्के बागायतदारांवर

मे महिन्यात पावसामुळे साकाही आढळला. जिल्ह्यातील बहुसंख्य बागायतदारांकडील आंबा संपुष्टात आलेला होता. रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली येथे हापूसची लागवड सर्वाधिक आहे. त्यामुळे या परिसरातील बहुसंख्य बागायतदारांनी पंधरा दिवस आधीच आंब्याची तोड केलेली होती. दापोली, संगमेश्वर, गुहागर, मंडणगड, राजापूरसह अन्य तालुक्यातील काही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा उपलब्ध होता; मात्र त्या उरलासुरल्या आंब्यावर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे पावसाचा फटका १० टक्केच बागायतदारांना बसल्याचे चित्र दिसत आहे; मात्र यंदा हंगामच अडचणीत आल्यामुळे बागायतदारांचे पाय पावसामुळे आणखीनच खोलात गेले आहेत. सलग पाऊस पडल्यामुळे आंब्याची काढणी करणेच शक्य झाले नाही तर अॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव झाल्याने कॅनिंगला टाकण्याशिवाय पर्यायच नव्हता. दरवर्षी शेवटच्या टप्प्यात प्रतिदिन पाच ते दहा हजार पेटी आंबा बाजारात जातो. मात्र यंदा उत्पादन कमी राहिल्याने शेवटी किमान ५ हजार पेटी दररोज बाजारात जाईल अशी अपेक्षा होती. परंतु त्यावर पाणी फेरले गेले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सुमारे १० कोटीच्या दरम्यान नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

----

कॅनिंगवर फेरले पाणी

मे महिन्यातील बराचसा हापूस आंबा हा कॅनिंगसाठी (प्रक्रिया) वापरला जातो; मात्र याच काळात पडलेल्या पावसामुळे झाडावरील आंबा काढणी करणे बागायतदाराला शक्यच झाले नाही. बऱ्याचशा बागांमधील आंबा गळून गेला. परिणामी, कॅनिंगसाठी आंबा कमी पडला आहे. दरवर्षी हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या कॅनिंग फॅक्टरीमध्ये २० हजार टन आंब्यावर प्रक्रिया करून पल्प बनवला जातो. यंदा मुळातच उत्पादन कमी असल्यामुळे सुमारे ६ हजार टन माल कमीच मिळालेला आहे. त्यात पावसामुळे शेवटच्या टप्प्यात सुमारे २५०० टन मालावर प्रक्रियाच झालेली नाही. त्यामुळे बाजारात पल्पचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे ८५० ग्रॅम पल्पचा डबा ६ रुपयांना महागणार आहे. एवढा आंबा विकला न गेल्यामुळे आंबा बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले. सुमारे ५ कोटीची उलाढाल ठप्प झाली. कमी आंबा असल्यामुळे मोठ्या कॅनिंग फॅक्टरीत कार्यरत कामगारांना याचा फटका बसला आहे. १० जूनपर्यंत चालणारा हा व्यवसाय माल नसल्याने १० दिवस आधीच बंद केला गेला आहे. त्यामुळे सुमारे ५ हजार कामगारांना सुमारे १० दिवसाच्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. सरासरी कॅनिंग फॅक्टरीत ५०० रुपये दरदिवसाला घेतले जातात. त्यानुसार २५ लाखाचे नुकसान सहन करावे लागणार आहे तसेच पाऊस पडल्यामुळे कॅनिंगचा दरही कमी होता. सुरवातीला किलोला ६५ रुपये दर मिळाला. शेवटी तो २० रुपयांपेक्षा खाली आलेला होता.

चौकट
दृष्टिक्षेपात

* कॅनिंगचे जिल्ह्यात २०० प्रक्रिया उद्योग
* तीन महिन्यात २० हजार टनावर होते प्रक्रिया
* सव्वापाच कोटीचा फटका
* आंबापोळी, फणसपोळीच्या उत्पादनात घट
* दहा दिवसपूर्वीच फॅक्टरी बंद

-----

रानमेव्याच्या विक्रीलाही फटका

मे महिन्यात डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेली करवंदे, अळू, लोणच्यासाठी वापरात येणारे भोकरे, आमसूल व सरबतसाठीचे कोकम, जांभळे हे सारे गळून गेले. ग्रामीण महिला शहरातील रहदारीच्या ठिकाणी टोपलीमध्ये रानमेवा आणून विकतात. चिपळूण तालुक्यातील १३ गावांमध्ये महिला बचतगटाच्या महिला रानमेव्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जातात तसेच मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, खेड या परिसरातील महिलावर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरतात. मे महिन्यात पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे महिला बचतगटांच्या उत्पादनालाही ग्राहक मिळेनासे झाले आहेत. परशुराम गावात घरोघरी रानमेव्यावर प्रक्रिया केली जाते. त्यालाही फटका बसला. गणपतीपुळे, आंजर्ले, हर्णै, मुंबई-गोवा व मिऱ्या-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य बाजारपेठांच्या ठिकाणी बसणाऱ्या व्यवसायिकांना मोठा फटका बसलेला आहे. रानमेव्याची एक टोपली संपली तर एका महिलेला ७०० ते १००० रुपये मिळतात. यावर्षी त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यातील भात, वरी, नागलीची लावणीही पावसावर अवलंबून असते. डोंगरकपारीतील अवघड वाटेवर राहणाऱ्या शेतकऱ्याला चिखल तुडवत बाजार आणणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील कष्टकरी पावसाळ्याच्या आगोटची बेगमी मे महिन्याच्या अखेरीस पेरणीपूर्वी करतात. त्यातून व्यापाऱ्यांची दिवसाला लाखाच्यावर उलाढाल होते; मात्र पावसाने त्यांचे गणित बिघडले. अन्नधान्याबरोबर कडधान्य, मसाला, सुकी मासळी, मीठ व इतर लागणाऱ्या सामानाचा साठा केला जातो. सावर्डे, खेर्डी, वहाळ, आरवली, मार्गताम्हाणे या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. तिथे दहा ते पंधरा लाखाची उलाढाल एका दिवसाला होते. आठवडा बाजारच्या ठिकाणी पाणी साचल्याने येथील व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला. चिपळूण, दापोली आणि रत्नागिरीतून सुखी मच्छी विक्रीसाठी आणली जाते. सुखी मच्छीची मोठी खरेदी होते. यावर्षी सुखी मच्छीलाही ग्राहक मिळेनासा झाला आहे.

------

भातशेतीचे भवितव्य अधांतरीच !

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टवर भातशेती होते. गेल्यावर्षी ५१ हजार हेक्टरवर शेती केली गेली. मे महिन्याच्या अखेरीस संगमेश्वर, राजापूर परिसरात धूळवाफ पेरण्या केल्या जातात; मात्र त्यापूर्वीच पावसाने सुरवात केली आणि शेतकऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. काहींनी धूळवाफ पेरण्यांसाठी केलेली तयारीच वाया गेली तसेच पावसामुळे नद्या-नाले, विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पावसामुळे उपळट झाल्याने पाणथळ शेतात पाणी साचलेले आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर पेरणी सुरू होते; पण याच काळात पाऊस पडल्यामुळे पुढील सर्वच वेळापत्रक थांबले. मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने धूळवाफ पेरणीकरिता योग्य परिस्थिती नाही शिवाय पडलेल्या पावसामुळे मृदेचे तापमान बऱ्याचअंशी ढासळलेले आहे. त्याचा भातपिक पेरणीनंतर भातबियांच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी भाताची पेरणी रहू पद्धतीने करावी, अशा सूचना कृषी विभागाकडून दिल्या गेल्या आहेत.

---------
चौकट १

अडीच लाखाची पर्यटनाची उलाढाल २५ हजारावर

मे महिना हा पर्यटनाचा मोठा हंगाम असतो असतो. पर्यनासाठी दिवसाला १५ ते २० गाड्या भाड्याने जातात. या हंगामात दिवसाला २ लाखाची उलाढाल होता. परंतु गेल्या अकरा दिवसांमध्ये कोसळलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे संपुर्ण हंगाम तोट्यात गेला. दिवसाला २५ हजार देखील मिळाले नाहीत, अशी माहिती पॉश ट्रॅव्हल्सचे बाळा सावंत यांनी सकाळला दिली. ते म्हणाले, पावसाच्या अकरा दिवसांचा विचार केला तर ही उलाढाल २७ लाखाच्या वर जाते. मात्र या अकरा दिवसांमध्ये पाऊस कोसळल्याने दिवसाला २५ हजाराची उलाढाल होत होती. आजवरच्या व्यवसायात ही सर्वांत कमी उलाढाल आहे.

----

चौकट २
rat१p२.jpg- सुधीर पटवर्धन
67432

वाहन व्यावसायीकांच्या चरितार्थावर परिणाम

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच गाडी मालक-चालक संघटनेचे जवळपास पाच हजार लोक या व्यवसायात आहेत. या व्यवसायात रत्नागिरीमध्ये २५० जणं कार्यरत आहेत. जिल्ह्याचा विचार करता सुमारे तीन ते चार हजार चालक व एक हजार गाडीमालक आहेत. त्याशिवाय वैयक्तिक व्यावसाय करणारे वेगळेच आहेत. त्या साऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहेत. पंधरा दिवस पडलेला पाऊस आणि रेड अलर्टमुळे पर्यटकांनी आपले सर्व दौरे रद्द केले. पर्यटनस्थळी जाण्यासाठी केलेली सर्व आरक्षणे रद्द झाली. त्यामुळे पंधरा दिवसांत वाहनचालकांचे मोठे नुकसान झाले. यातच हा पर्यटनाचा हंगाम संपला. पुढे पावसाळ्यात चार महिने फारशी कामे नसतात. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवणे थोडे कठीण जाणार आहे. त्यामुळे संघटनेतर्फे शासनाकडे मदतीची मागणी करण्याचा विचार चालू आहे, असे व्यावसायिक सुधीर पटवर्धन यांनी सांगितले.

----------------------------
कोट

शाळांना सुट्टी पडल्यानंतर मेच्या पहिल्या आठवड्यापासून १५ जूनपर्यंत पर्यटन हंगाम फूल असतो; मात्र यावर्षी १८ मे पासून पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील बुकिंग रद्द झाल्या आहेत. जूनमध्येही फारशा बुकिंग मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे.
- प्रथमेश कापडी, हॉटेल व्यवसाय, चिपळूण

पावसामुळे कॅनिंगसाठीचा सुमारे २० टन आंबा काढता आलेला नाही. ३५ वर्षांपूर्वी साधारण १९९२-९३ च्या दरम्यान १७ मे रोजी सलग चार दिवस पडलेल्या पावसाने आंब्याचे नुकसान झाले होते. आंबा पडून गेल्याने कॅनिंगसाठी मालच कमी आला होता. यंदा अधिक काळ पाऊस राहिल्याने कॅनिंग व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. कोवळा आंबा प्रक्रियेसाठी आल्याने तो बाजूला काढावा लागला. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- आनंद देसाई, कॅनिंग व्यावसायिक

यंदा मुळातच आंबा कमी होता. त्यात एप्रिलपासूनच कोकणच्या बऱ्याचशा भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे फळमाशीचा त्रास सुरू झाला. त्याचा फटका फळाच्या वाढीवर झाला. त्याच कालखंडात बाजारभाव पडला. पुढे ८ मे पासून अधुनमधून पाऊस पडत होता; मात्र १५ ते ३० मे या कालावधीत पावसाने कहर केल्यामुळे झाडावरील आंबा काढताच आलेला नाही. त्यामुळे बाजारात आंबाच आला नाही.
- डॉ. विवेक भिडे, बागायतदार

मे महिन्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थकारणाचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी नाउमेद झालेला आहे. सध्या शेतकऱ्याची द्विधा मनःस्थिती आहे. पुढील अंदाज बांधून ते खरिपाची तयारी करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून योग्य नियोजन आणि सल्ल्याची अधिक गरज निर्माण झालेली आहे.
- समीर पारधी, शेतकरी.

मागील काही दिवस पाऊस झालेला असला तरीही सध्या उन्ह पडलेले आहे. जमिनीत भातरोपांची रूजवात होईल अशी स्थिती आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेती करणे शक्य आहे. जमिनीमध्ये पाणी साचून राहिले असेल तर त्याचा निचरा करावा.
- विजय दळवी, संशोधक, भात संशोधन केंद्र

(संकलन ः राजेश कळंबटे, मुझ्झफर खान, सचिन माळी, सिद्धेश परशेट्ये, राजेंद्र बाईत, राजेश शेळके, मकरंद पटवर्धन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com