अहिल्यादेवींचा कारभार लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत
67502
अहिल्यादेवींचा कारभार लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत
पालकमंत्री नीतेश राणे ः त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सावंतवाडीत महिला मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३५० व्या जयंती उत्सवानिमित्त भाजपने त्यांना खऱ्या अर्थाने सन्मानित केले आहे. लोकहितासाठी आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी काम करणे ही जबाबदारी मानून कार्य करणे हा अहिल्यादेवींच्या कारभाराचा मूळ मंत्र आहे आणि तो जपणे आपले कर्तव्य आहे. अहिल्यादेवींचे जीवनचरित्र, त्यांचे जनहिताचे निर्णय व त्यांचा लोकाभिमुख कारभार हा लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत असून लोकप्रतिनिधी म्हणून कारभार करीत असताना अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श नजरे समोर ठेवा, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्यावतीने सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, माजी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, डॉ. ज्योती तोरस्कर, आंबोली मंडल अध्यक्ष प्राजक्ता केळुस्कर, समन्वयक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रदेश सदस्या तथा माजी जिल्हा परिषद सभापती शर्वाणी गावकर, मेघा गांगण, माजी सभापती मानसी धुरी, मिसबा शेख, सुजाता देसाई आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘भाजपने अहिल्यादेवींचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती घेतलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आपला पक्ष ज्यावेळी एखादा कार्यक्रम देतो त्यावेळी त्यामागे निश्चितच कोणतीतरी महत्त्वाची भूमिका असते. अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास व त्यांचा संघर्षमय जीवनातील लोकाभिमुख प्रवास आपल्याला ज्ञात व्हावा व त्यातून भविष्यातील आदर्शवत लोकप्रतिनिधी निर्माण व्हावे हाच यामागील उद्देश आहे. इतर कोणत्याही पक्षाने अशा प्रकारे कार्यक्रम राबवले नाहीत, त्यामुळे भाजपचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘महिला आरक्षणामुळे अनेक महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर सरपंच, सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे आपला कारभार केला तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला कारभार लोकाभिमुख व जनतेच्या हिताचा करून आपल्या खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. तसे केल्यास आपला भारत देश महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सद्यस्थितीत काही ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी आपल्या पतींवर अवलंबून असल्याचे दिसून येते. परंतु, याबाबत मी सर्व महिला लोकप्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या आहेत. उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार करण्यासाठी अहिल्यादेवींचा आदर्श मनात बिंब. प्रत्येक शासकीय कार्यालयात अहिल्यादेवींची प्रतिमा भिंतीवर लावलेली असते. अहिल्यादेवींच्या कारभाराची आठवणच या प्रतिमेच्या माध्यमातून व्हावी, हा त्यामागे उद्देश आहे. ''मला माझ्या लोकांचे हित पाहायचे आहे'' हा विचार करून त्यांनी कारभार केला. त्यांनी ज्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले, त्याचप्रमाणे आपणही कारभार करावा याची आठवण त्यांच्या प्रतिमेतून व्हावी. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनात केलेला प्रवास हा आपणा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी जनहितासाठी घेतलेले निर्णय आणि केलेला लोकाभिमुख कारभार आपल्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळे मी सुद्धा मंत्री म्हणून कारभार करताना आणि निर्णय घेताना अहिल्यादेवींचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच घेईन.’’
-----------------
येत्या काळात निवडणुकांमध्ये बदल
येत्या २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कदाचित दोन भागांमध्ये विभागला जाईल. तसेच, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन तीन ऐवजी चार विधानसभा मतदारसंघ निर्माण होतील. त्यावेळी महिलांची संख्या लक्षात घेता रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गपैकी एका मतदारसंघात महिला खासदार निवडून येईल, तर चार विधानसभांपैकी दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आमदार असतील, अशी शक्यता पालकमंत्री राणे यांनी यावेळी वर्तवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.