

rat1p17.jpg
67534
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री नीतेश राणे.
मिरकरवाडा बंदरासाठी २२ कोटी
मंत्री नीतेश राणे : अवैध धार्मिक स्थळांवरील कारवाईने मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : मिरकरवाडा बंदरात अवैध पद्धतीने धार्मिक स्थळे बांधली होती. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत होते. तसेच काही गैरप्रकार सुरू होते. मात्र आमच्या खात्याने अनधिकृतांवर कारवाई केली. आता मिरकरवाडा बंदर विकासासाठी पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याची निविदाही निघाली आहे. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन करण्याचा विचार आहे. त्यानंतर मिरकरवाड्याचा विकास खऱ्या अर्थाने मार्गी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री राणे यांनी सांगितले की, मिरकरवाड्यासाठी सर्व पारदर्शक पद्धतीने निविदा काढली आहे. मागील चुका पुढे होऊ नयेत, याकरिता काळजी घेतली आहे. अनधिकृत मच्छीमारी, एलईडीद्वारे मासेमारी करणारे वर्षानुवर्षे एलईडीवर आळा आणण्यात यश आले आहे. त्यासाठी प्रयत्नही करू. त्यात सागरी सुरक्षेच्यानिमित्ताने शिस्त आणायची आहे.
मच्छीमारीला शेतीला दर्जा मिळाल्याचा क्रांतिकारी निर्णय असल्याबद्दल मंत्री राणे म्हणाले की, यापूर्वी फक्त शेतकऱ्यांना राज्य, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत होता. त्या निकषांत मच्छीमारांना कसे बसवायचे हा प्रश्न होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मच्छीमारीला शेतीचा दर्जा देण्यात यश आले. त्यामुळे आता विमा, कर, साधनांमध्ये तसेच शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ मच्छीमारांना घेता येईल. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डही योजना असते. तशी मच्छीमारांनाही मिळेल. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
मत्स्य व बंदर विकास ही दोन्ही कोकणातल्या एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत. यामुळेच राज्यातील बंदरांना आर्थिक ताकद देण्याचे काम सरकार करत आहेत. टप्प्या-टप्प्याने विकास होईल. सरकारला एक वर्ष झाल्यानंतर मत्स्य खात्यामार्फत केलेल्या उपाययोजना व मत्स्योत्पादनात झालेली वाढ याची माहिती देऊ. सध्या समुद्री मत्स्योत्पादनात सहावा आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा १६ वा क्रमांक आहे. तो पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी आमची तयारी असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
चौकट १
क्रूझद्वारे जलवाहतूक
रस्ते, रेल्वे वाहतुकीप्रमाणेच जलवाहतूक वाढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यानुसार मांडवा ते रत्नागिरी व पुढे मालवणपर्यंत रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या क्रूझमध्ये १०० गाड्या आणि ५०० प्रवाशांची सोय होईल. येत्या गणेश चतुर्थीच्या अगोदर ही सेवा सुरू होईल. रो रो सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी प्रयत्न आहे, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
चौकट २
राज्य बॅंकेकडून हजार कोटींची तरतूद
जिल्हा बॅंक फक्त शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जायची. अनेक योजनांमुळे ग्रामीण अर्थकाला बळ मिळायचे. आता राज्य सहकारी बॅंकेद्वारे मच्छीमारांसाठी योजना द्या, अशी विनंती केली आहे. त्यांनी प्रत्येक जिल्हा बॅंकेला निर्देश दिले आहेत. तसेच एक हजार कोटीची तरतूद मच्छीमारांसाठी केली आहे. योजना बनवण्याचे काम आमच्या खात्याकडून सुरू आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.