-डाटा म्हणजे जगाच्या भविष्याचा नकाशा

-डाटा म्हणजे जगाच्या भविष्याचा नकाशा

Published on

टेक्नो..........लोगो
(२१ मे टुडे ३)
जगभरात दरदिवशी अब्जावधी डाटाचे तुकडे निर्माण होत असतात; पण या डाटाचा खरा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तो ''डाटा अ‍ॅनालिटिक्स’ या संज्ञेच्या छायेखाली अभ्यासला जातो. ही प्रक्रिया म्हणजे विज्ञान, गणित, सांख्यिकी, मानवी निरीक्षण आणि संगणक यांचा अद्वितीय संयोग आहे. अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये मागील महिन्यांमध्ये किती किराणा सामान लागले यावरून पुढील महिन्याच्या खरेदीची योजना तयार करणे हे सुद्धा एकप्रकारचे डाटा अ‍ॅनालिटिक्सच होय; पण जेव्हा ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर संगणकीय पद्धतीने केली जाते तेव्हा तिचं रूप वेगळं दिसून येतं.

- rat३p१.jpg -
P25N67818
- प्रा. अमेय फणसे, चिपळूण
----
डाटा म्हणजे जगाच्या भविष्याचा नकाशा

आजचे युग हे ‘माहितीचे युग’ म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारांमधून नकळत कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती निर्माण करत असतो. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडियावर व्यक्त होताना ऑनलाईन खरेदी करताना किंवा अगदी बँकेच्या व्यवहारातूनही आपण या माहितीच्या साठ्यामध्ये भर घालत असतो. ही सर्व माहिती म्हणजेच आजच्या काळातील परवलीचा शब्द ‘डाटा’ होय.
डाटा म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे तर आधुनिक जगाच्या प्रत्येक हालचालीचं प्रतिबिंब आहे. हा डाटा कधी शब्दस्वरूपात असतो, कधी संख्यांच्या स्वरूपात असतो तर कधी चित्रांच्या किंवा व्हिडिओच्या स्वरूपात असतो; पण प्रामुख्याने डाटा तीन स्वरूपात उपलब्ध असतो, असे मानले जाते. हे तीन प्रकार म्हणजे सुसंरचित, असुसंरचित आणि अर्धसुसंरचित डाटा. उदा., एखाद्या एक्सेल फाईलमध्ये टेबलच्या स्वरूपात असणारा कोष्टकबद्ध डाटा हा सुसंरचित डाटा मानला जातो. सोशल मीडियावरील पोस्ट्स, वृत्तपत्रातील किंवा न्यूज चॅनल्सवरील बातम्या या असुसंरचित असतात तर ई-मेल हे अर्धसुसंरचित स्वरूपात असतात, असे मानले जाते.
ग्राहक काय विकत घेतो, त्याच्या खरेदीची वारंवारता किती आहे, त्याला कोणत्या गोष्टी विकत घ्यायला आवडतात, कोणत्या महिन्यामध्ये ग्राहक जास्त खरेदी करतो, एक महिन्यामध्ये ग्राहक किती रुपये खर्च करू शकतो, कोणत्या प्रकारच्या जाहिराती बघून ग्राहकांची वस्तू विकत घेण्याची वारंवारता वाढते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘डाटा’ म्हणून साठवली जातात आणि या डाटावर प्रक्रिया करून कंपन्या आपल्या उत्पादनांमध्ये आणि उत्पादनक्षमतेमध्ये बदल करत असतात, यालाच डाटा ॲनालिटिक्स असे म्हटले जाते.
डाटा अ‍ॅनालिटिक्स ही प्रक्रिया म्हणजे केवळ गणिती विश्लेषण नाही तर ती एक सर्जनशील व निर्णयक्षम प्रक्रिया आहे. यात डाटा गोळा करणे, त्यामधील त्रुटी दूर करणे, विश्लेषणासाठी उपयुक्त रूपात त्याचे रूपांतर करणे नंतर वेगवेगळ्या गणिती, सांख्यिकीय व संगणकीय पद्धतीने विश्लेषण करणे आणि शेवटी साध्या, समजण्यासारख्या रूपात त्याचे सादरीकरण करणे हे सारे टप्पे समाविष्ट असतात. या साऱ्या सुनियोजित पायऱ्यांमधून येणारा निष्कर्ष निश्चित, वस्तुनिष्ठ आणि उपयोगी ठरतो.
डाटा अ‍ॅनालिटिक्सचे चार मुख्य प्रकार आहेत – वर्णनात्मक, कारणात्मक, भविष्यदर्शक आणि मार्गदर्शक विश्लेषण. एखाद्या कंपनीच्या वेबसाइटला किती लोकांनी भेट दिली याचा अभ्यास म्हणजे वर्णनात्मक विश्लेषण; ती भेट का दिली हे अभ्यासणे म्हणजे कारणात्मक विश्लेषण. पुढील आठवड्यात किती लोक भेट देतील, याचा अंदाज वर्तवणे म्हणजे भविष्यदर्शक विश्लेषण आणि त्यानुसार कोणत्या जाहिराती वेबसाइटवरून प्रदर्शित कराव्यात हे ठरवणे म्हणजे मार्गदर्शक विश्लेषण.
आज अनेक कंपन्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलसारख्या सोप्या साधनांपासून ते अगदी आर प्रोग्रामिंग आणि पायथन प्रोग्रामिंगसारख्या संगणकीय भाषांपर्यंत सर्व साधनांचा डाटा ॲनालिटिक्ससाठी वापर करत आहेत. यामधून मिळणारी अर्थपूर्ण माहिती सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सादर करणे ही सुद्धा एक कला आहे. त्यासाठी पॉवरबीआय, टॅब्लू यांसारखी साधने वापरली जातात.
डाटा अ‍ॅनालिटिक्स हे केवळ संगणक क्षेत्रापुरते मर्यादित नाही तर आजकाल कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, क्रीडा आणि अशा अनेक क्षेत्रांपर्यंत ते सहजगत्या वापरले जात आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर मानवी निर्णयक्षमतेला योग्य दिशा देणारे आणि त्यासाठी सहाय्यभूत ठरणारे एक अद्भुत विज्ञान आहे. त्यामुळेच आजच्या घडीला ‘डाटा’ म्हणजे जगाच्या भविष्याचा नकाशा असेल तर ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’ म्हणजे तो नकाशा वाचण्याची कला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

(लेखक घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयएमएल विभागात प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com