घोटगे-सोनवडे घाटमार्ग अजूनही लाल फितीत
swt512.jpg
68323
घोटगे - सोनवडे घाटमार्गाच्या पूर्णत्वासाठी गेली ४५ वर्षे नागरिकांचा लढा सुरू आहे.
घोटगे-सोनवडे घाटमार्ग अजूनही लाल फितीत
केंद्रीय मान्यतेची प्रतीक्षाः नव्या आराखड्यात लांबी ४ किलोमीटरने वाढली
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ः घोटगे-सोनवडे घाटमार्गाचा नव्याने आराखडा तयार केला असून तो केंद्राच्या तीन समित्यांकडे मंजूरीसाठी पाठविला आहे. या समित्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच घाटमार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे. केंद्रीय समित्यांच्या सकारात्मक अहवालानंतर राज्य वनविभागाच्या विविध परवानग्यांचीही आवश्यकता आहे. राज्याच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करावी लागणार आहे. ही निधीची तरतूद झाल्यानंतरच अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी गेली ४५ वर्षे तेथील नागरिकांचा लढा सुरू आहे. पाच वर्षापूर्वी या घाटमार्गातील सर्व अडथळे दूर झाले होते. घाटमार्गाच्या कामाची निविदाही काढण्यात आली. प्रत्यक्षात कामाला सुरवात करताना मात्र या घाटमार्गाचा आराखडा १९८० मध्ये करण्यात आला आणि या आराखड्यानुसार काम पूर्ण केले तर अवजड वाहने घाटमार्गातून जाऊ शकणार नाहीत ही बाब उघड झाली. त्यामुळे गेली दोन वर्षे घोटगे-सोनवडे घाटमार्गाची नवीन संरेखन आणि त्याअनुषंगाने सर्वेक्षणाचे काम सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्याचा नवा आराखडा तयार केल्यानंतर तो केंद्रीय समित्यांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जानेवारी २०२५ मध्ये केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या तीन समित्यांमधील तज्ज्ञांनी, बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या घाटमार्गाच्या आराखड्याची पाहणी केली. या आराखड्यात वन्यजीव संरक्षण विभागाने काही बदल सुचवले. त्यानुसार घाटमार्गाचा नवा प्रकल्प अहवाल तयार करून बांधकाम विभागाने तो या तिन्ही समित्यांकडे पाठवला आहे.
घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्वी साडे नऊ किलोमीटर लांबीचा होता. मात्र, नव्याने केलेल्या सर्वेक्षणात हा घाटमार्ग १३.३४ किलोमीटर एवढा झाला आहे. यातील ३ किलोमीटरचा घाटमार्ग कोल्हापूर हद्दीत तर उर्वरीत मार्ग सिंधुदुर्ग हद्दीत आहे. घाटमार्गाचा हा नवा आराखडा सार्वजनिक बांधकामच्या मुख्य अभियंता कार्यालयाकडून केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समितीकडे पाठविला आहे. या समित्यांनी नव्या आराखड्याला मंजुरी देणे आवश्यक आहे. या तिन्ही समित्यांकडून घाटमार्गाच्या कामाला ना हरकत दाखला दिल्यानंतर, राज्यस्तरावरील वनविभागाच्या विविध परवानग्या घेणे आवश्यक राहणार आहे. यात वनविभागाची जागा बांधकामकडे हस्तांतरण करणे आणि त्या बदल्यात वनविभागाला पर्यायी जागा देणे या बाबींचाही समावेश आहे.
घाटमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे घाटमार्गातील नव्याने भूसंपादन करावयाच्या ४ किलोमीटर लांबीच्या खासगी मालकीच्या जागेच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने पाच कोटींची तरतूद केली आहे. तर घाटमार्गातील एकूण १३.३४ किलोमीटर लांबीच्या मार्गाची संयुक्त मोजणीचाही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर भूमी अभिलेख, कृषी विभाग, वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर घाटमार्ग बाधितांना जागेचा मोबदला वितरण केले जाणार आहे.
१९९९ मध्ये युती शासनाच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोल्हापूर-सिंधुदुर्ग जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे घाटमार्गाला मंजूरी दिली होती. त्यानंतर वनखात्याची जागा बांधकामकडे वर्ग करणे, वनखात्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, केंद्रीय खात्यांची मंजुरी मिळणे आदी कामांना तब्बल १८ वर्षे लागली. सप्टेंबर २०१७ मध्ये घाटमार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आणि निविदा प्रकिया होऊन सप्टेंबर २०१८ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू होणार होते. मात्र, घाट मार्गाचे संरेखन चुकल्याने काम थांबले. आता जानेवारी २०२५ मध्ये या घाटमार्गाचा नव्याने आराखडा तयार करण्यात आलाय. त्यामुळे केंद्रीय खात्यांच्या नव्याने परवानग्या घेणे आवश्यक झाले आहे. या सर्व परवानग्या तथा ना हरकत दाखला मिळाल्यानंतर घाटमार्गाच्या बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव बजेटमध्ये सादर केला जाणार आहे. तर बजेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून या घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
--------------
चौकट
घोटगे-सोनवडे घाटमार्ग दोन ''एक्सप्रेस वे''ना जोडणार
सिंधुदुर्गातून शक्तीपीठ आणि कोकण ग्रीनफिल्ड असे दोन एक्सप्रेस वे तयार होणार आहेत. यातील सोनवडे घोटगे हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी रस्त्याला जोडला जाणार आहे. गारगोटी मार्ग शक्तिपीठला जोडला जाणार आहे. तर घोटगे सोनवडे घाटमार्ग रस्ता हा वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून सुरू होतो. मठ या रस्त्याला कामळेवीर, पालकरवाडी या भागातून कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस देखील जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गातून जाणाऱ्या दोन्ही एक्सप्रेस रस्त्यांना जोडणारा हा मार्ग ठरणार आहे.
कोट
घोटगे-सोनवडे मार्गासाठी आमचा गेली ४५ वर्षे लढा सुरू आहे. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह, कुडाळचे आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून आम्ही घाटमार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. नुकतीच केंद्रीय समित्यांनीही या घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची पाहणी केलीय. त्याला केंद्राकडून मान्यता मिळेल आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा आहे.
- चैताली ढवळ, सरपंच, घोटगे
---------------
कोट
घोटगे घाटमार्गासाठी २००५ पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. तर प्रत्यक्षात २०१२ पासून जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू झाली. या जमीन मालकांचे नुकसान होऊ नये यासाठी जमीन मालकांना त्यांच्या मंजुर झालेल्या मोबदला रक्कमेवरील सात वर्षाचे व्याज दिले जावे, अशी आमची मागणी आहे. याखेरीज नव्याने भूसंपादन होत असलेल्या जागा मालकांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जावा यासाठीही आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- लॉरेन्स मान्येकर, माजी जिल्हा परिषद सदस्य
-------------
कोट
सोनवडे घाटसाठी गेल्या दोन पिढ्या संघर्ष करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा घाट रस्ता पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. दळणवळणाचे पर्यायी साधन उपलब्ध होण्याबरोबरच इथला सोनवडे गड, येथील धबधबे देखील पर्यटकांना आकर्षण ठरणार आहेत. त्या माध्यमातून रोजगाराचे नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
- सचिन तेली, नागरिक घोटगे
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.