कोकणी शेतकऱ्याच्या लग्नाची समस्या.....
बोल बळीराजाचे ------लोगो
(३१ मे टुडे ३)
चाकरमान्यांनी भरलेल्या कोकणातल्या वाड्या शाळांची चाहूल, पावसाची सुरुवात आणि संपलेल्या रजा यांच्या जाणिवांनी रिकाम्या व्हायला लागल्यायंत. मे महिनाभर ओरडत असलेले लाऊडस्पीकर आता शांत झालेत. वाडी-गावपूजा आणि लग्न-हळदींना स्पीकर हवेच. कोकणात बालपण घालवलेले चाकरमानी कोकणात येतातच; पण ज्यांची पुढची पिढीच शहरात जन्मल्येय त्यांनाही गावचं वेड आहेच. शाळांच्या सुटया आणि चाकरमान्यांच्या रजा बघूनच गावात अजूनही लग्नं ठरवली जातात. माझ्या बळीराजाच्या पंचविशी-तिशीच्या मुलांची लग्नही खूप मोठी समस्या आहे. तशी ती घर सांभाळणाऱ्या सगळ्याच मुलांची आहे. यात जात, धर्म, व्यवसाय, आर्थिक स्थिती हा कोणताच भेदाभेद नाही. अगदी राज्यघटनेत मांडलेल्यापेक्षाही जास्त समानता आहे; पण शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न हा ओसाड पडत चाललेल्या कोकणातील वाड्यावस्त्याचा मुलभूत प्रश्न बनला आहे......
- rat६p७.jpg-
P25N68489
- जयंत फडके,
जांभूळआड पूर्णगड रत्नागिरी
---
कोकणी शेतकऱ्याच्या लग्नाची समस्या...
काय नाहिये आता कोकणात? शहरात असलेल्या साऱ्या भौतिक सोईसुविधा आहेत. दळणवळणाची साधनं आहेत. करणाऱ्याला काम आहे. अगदी शिक्षणानुसार काम आहे; मात्र नकारात्मक मानसिकतेमुळे मासिक पंधरा-वीस हजाराच्या नोकरीवर मुलं शहरात धावत आहेत. आपण नोकरी देऊ शकतो, हे विसरतायत. त्याचे एक कारण त्यांना शेतकरी आई-वडील असलेल्या मुलीच लग्नाला नकार देत आहेत. सार्वत्रिक शिक्षणानं शिक्षण तळागाळापर्यंत पोचलं; पण ते आपल्या जीवनात कुठं वापरायचं, हे मात्र आपण शिकवू शकलो नाही. ना मुलींना..ना मुलांना..! यात मुला-मुलींचा दोष नाही. आपल्या शिक्षणाचा माझ्या गावात काहीच उपयोग नाही. त्यासाठी शहरातील संधी चकाकत आहेत, असं वाटणं ही केवढी मोठी विसंगती आहे. अगदी मनापासून विचार केल्यास, ‘मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं,’ हा फेक नॅरेटिव्ह याच्या मुळाशी आहे. माझ्या बळीराजाच्या मुलाशी त्याची मैत्रीण प्रेमाने, आकर्षणाने इ. कोणत्याही कारणाने लग्न करण्यास तयार होईलही; पण तिची आई तिला असं लग्न करू देईल का? हा कळीचा मुद्दा आहे.
याच लाल मातीच्या कुशीत मोठं झालेल्यांना जरूर विचारा, काय कमी पडलं त्यांना आयुष्यात? पिझ्झा-बर्गर नसला तरी लाल भात, भाकरी, भाजलेले मासे, आंबील यावर त्यांचे शरीर, मन पोसले की, भेसळीच्या खाण्याने ते रोगट बनले! जिल्हा परिषदेच्या शाळेत पोटच्या पोरापेक्षा माया लावणारे, काहीतरी आलं पाहिजे या भावनेने शिकवणारे शिक्षक नव्हते? वेळेवर लग्न होऊन आनंदानं संसार करणारे कित्येक पिढ्या या कोकणात नांदल्याच ना? आत्ताही नांदतायत ना? मग शिक्षणाने अशी काय शिंगं फुटली की, आपण क्षणिक झगमगाटात झिंगून गेलो! आर्थिक सुबत्ता, राहणीमानाचा दर्जा, उज्ज्वल भविष्य कोकणातल्या माझ्या बळीराजाच्या आयुष्यात नाही, असं आपण का समजतो? अगदी शेतीतही असलेल्या अनेक संधी का दुर्लक्षित करतो?
कोकण रेल्वे, सहापदरी रस्ते, पायाभूत सुविधा कोकणातून शहरात लवकर पोचण्यासाठी नसून माझ्या बळीराजाला कोकणातच राहून आपल्या शेतशिवाराचा, गावाचा, तालुका-जिल्ह्याचा पर्यायाने देशाच्या विकासासाठी आहेत. कोकणातील शेती, उद्योग, व्यवसायाचा मुलभूत प्रश्न कामाला माणसं नाहीत, माणसाला काम नाही की, काम करायची इच्छा नाही? यावर सुशिक्षित बळीराजाच्या पुढच्या पिढीनं जरूर विचार करायला हवा. कधी काळी कर्नाटकी कोणतंही काम कोकणात करत होते, ते फक्त ‘होय शेठ’ या भांडवलावर..!
आता गुरख्यांच्या जीवावर आंबा, मासळी व्यवसाय उभा आहे. कोकणात वाहात असलेल्या विकासाच्या गंगेत काम करणारे, करून घेणारे कोकणातील सुशिक्षित युवक, युवती किती आहेत? आणि आपण लग्न होत नाही म्हणून मुंबईकर बनून माझ्या बळीराजाच्या मुलांसमोर गोंडे उडवून शायनिंग मारतोय. पोटं भरणं प्रत्येकाच्या शारीरिक, शैक्षणिक कुवतीनुसार, मानलं तर नशिबानुसार नक्कीच शक्य आहे. फक्त माझा बळीराजाच्या मुलांची लग्न होताना ‘सर्व काम समान दर्जाचे’ हे शिक्षणाने शिकवलेले सूत्र मात्र सोईस्करपणे विसरलं जातं. मग आपली गावं ओस पडतात आणि फुगलेली शहरं समस्या बनतात.
गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय की, ‘मातीच्या बंधनापासून मुक्ती हे झाडाचे स्वातंत्र्य नव्हे.’ येथे माती हे नैतिक मूल्ये, कर्तव्य, परंपरा, कौटुंबिक पार्श्वभूमी, वडीलधाऱ्यांचे संस्कार यांचे प्रतीक तर झाड हे माणसाचे प्रतीक आहे. मुळांपाशी असलेल्या मातीमुळेच झाड मजबूत असते. अशावेळी झाडाला माती नकोशी वाटू लागली तर झाडाचे अस्तित्वच उरणार नाही. आपले वडीलधारे, पालक, आपली संस्कृती, आपला प्रदेश, परंपरा, जीवनमूल्ये हे सारे बंधन वाटू लागले किंवा प्रगतीतील अडसर वाटू लागले तर आपले अस्तित्वच नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आपले पोषण, संरक्षण, प्रगती आणि मुख्यतः स्थैर्य आपण तिथे दटून असण्यावरच अवलंबून असते. माझ्या पंचविशीतील शेतकरीमित्रांनो बघा पटतंय का..!!
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.