रत्नागिरी ः बेशिस्त, बेजबाबदारपणा... याचीच मिजास

रत्नागिरी ः बेशिस्त, बेजबाबदारपणा... याचीच मिजास

Published on

rat6p5.jpg
68487
संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे चारही मार्गीकेवर आलेली वाहने.

दखल... लोगो

इंट्रो

मंदिरापासून मैदानापर्यंत, गल्लीपासून महामार्गापर्यंत, ओढ्यापासून सागरापर्यंत आपल्याकडे सर्वत्र एक सामाजिक रोग समान आढळतात. नागरी जीवनाबद्दल बेपर्वाई, बेशिस्त, बेजबाबदारपणा. देवदर्शनासाठी मंदिरात जाताना चेंगराचेंगरीत लोकं मरतात. मैदानावर मिळालेला विजय साजरा करताना चेंगराचेंगरी. तेथेही मरण. गल्लीमध्ये अरुंद रस्ता आणि आणखी काही कारणे म्हणून अपघात आणि महामार्गावर वेगावर नियंत्रण नाही म्हणूनही अपघात. परिणाम एकच, स्वस्त मरण. ओढ्यात बेदरकारपणे उतरून तो पार करताना बुडतात आणि धरणात अथवा समुद्रात मौजमस्ती करताना पुन्हा मरणच. धबधब्याखालीही तेच. या सर्वांचा परिणाम एकच जीव गमावणे, तरी त्याची कारणे वेगवेगळी; मात्र त्यातही वैशिष्ट्यपूर्ण अधोरेखित करता येईल, अशी बाब म्हणजे वर नोंदलेले तीनही दुर्गुण.
- शिरीष दामले, रत्नागिरी
---------

बेशिस्त, बेजबाबदारपणा... याचीच मिजास
वाहतूककोंडी, गाड्या फसल्या किनारी; सामाजिक रोग सर्वत्र

गेला महिनाभर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होत होती. सध्या छोट्या शहरांमध्येही वाहतूककोंडीची समस्या आहेच. याच्या मुळाशी वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, असलेले रस्ते व्यापाऱ्यांनी किंवा वाहनचालकांनी वाहने अडवून आणखी अरूंद केलेले ही कारणे आहेतच; परंतु त्याच्या जोडीला बेपर्वाई हाही मोठा दुर्गुण आहे. यावर्षी मे महिन्यात सतत वाहतूककोंडीच्या बातम्या येत होत्या. संगमेश्वर येथे बसस्थानक आणि नजीकचा सोनवीपूल येथे याचा सर्वाधिक ताप झाला. तेथील वाहतूककोंडी किती काळ आणि कोणत्या कारणाने, याला काही सुमारच नव्हता; मात्र वाहतूककोंडीची तेथील कारणे लक्षात घेऊनही एकूण जात असलेला वेळ हा निव्वळ बेशिस्त आणि बेजबाबदारपणामुळे जात होता. दुर्दैवाची बाब म्हणजे या दोन दुर्गुणाचीच मिजास दाखवली जात होती. मुंबईत शिस्तीत वाहने हाकणारे चाकरमानी कोकणात घुसल्यावर असे सैरावैरा का चालवतात, असा प्रश्न पडतो. वाहतूककोंडी झाल्यावर पुढचे वाहन थांबले आहे, याला काहीतरी कारण असणार हे ध्यानी न घेता आपली गाडी पुढे दामटवण्याचा अट्टाहास केला जातो. यात कार आघाडीवर. मालवाहू वाहतुकीच्या छोट्या गाड्याही घुसतात.
महामार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न यावर्षी संगमेश्वर येथे पोलिसांना हाताळता आला नाही. तेथे सुरू असलेले रस्त्याचे काम संगमेश्वर बसस्थानकाच्या तोंडावर चारी बाजूने येणारी वाहने, अवजड वाहतूक आणि मे महिन्याच्या काळात होणारी वाढती वाहतूक या गोष्टी आयत्यावेळी घडलेल्या नव्हेत. त्या लक्षात घेऊन ना पोलिसांनी नियोजन केले ना वाहतूक शाखेने. हे काम कोणाचे, याच्यावरच वाद सुरू असेल. जे झाले त्याने लोकांचा बहुमोल वेळ, इंधनाचा भुर्दंड आणि हालअपेष्टा यातच वाढ झाली. या सर्वाला वाहन चालवणाऱ्यांची बेपर्वाई आणि बेशिस्तही कारणीभूत आहे, याचा विचार न करता पोलिस, महामार्गाचे काम करणारे यांनाच झोडपले जात होते. त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असले, तरी आपले आपले सामाजिक रोग दृष्टीआड करता येणार नाहीत.
तुरळ येथे झालेल्या एका अपघातात दारूण अनुभव आला. तेथील अपघातानंतर वाहने जायला मोकळी जागा असताना महामार्गावरील ट्रॅफिकला वेठीस धरण्यात आले. त्यात दोन तासांहून अधिक वेळ मोडला शिवाय बेपर्वाईची भर. समोर दोन-दोन मार्गिकेत वाहने थांबलेली असतानाही डाव्या-उजव्या बाजून वाहने घुसवण्यात आली. हे सगळे शहाणे महामार्गावर वाहने हाकणारे होते. परिणाम काय झाला, तर समोरून मार्ग मोकळा करणे कठीण. अपघात झाला तेथील स्थानिकांची काहीएक भूमिका असू शकते; पण म्हणून महामार्गावरचे ट्रॅफिक वेठीला धरण्यात हशील काय?

चौकट
...आता विचार करण्याची वेळ
रत्नागिरीनजीक आरे-वारे येथे वाहने वाळूवर अडकतात. भाट्येकिनारी हा प्रकार जास्त होतो. मग अशी वाहने वाहून गेली किंवा जाऊ लागली की, ती वाचवण्यासाठी यंत्रणेने धडपड करायची. ती धडपड कमी पडली की, त्यांना ठोकणाऱ्या ब्रेकिंग न्यूज व्हायच्या; पण मुळात जी शिस्त पाळायची ती पाळत नाहीत. त्यांच्याबाबत काय? अशांवर थेट गुन्हा नोंदवता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com