मंडणगड ः अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर
rat6p19.jpg-
68529
अग्निशमन बंब
-----------
मंडणगडमध्ये अग्निशमन
यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर
वर्षभरात आगीच्या ४ घटना; प्रशासनाकडून कार्यवाहीची गरज
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ : तालुक्यात वाढलेल्या आगीच्या घटना आणि त्याकरिता आग नियंत्रणासाठी उपलब्ध नसलेली आवश्यक यंत्रणा यामुळे अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदा वर्षभरात मंडणगड शहरात आगीच्या चार घटना घडल्या. त्यातील एक घर जवळपास पूर्णतः भस्मसात झाल्याने मोठा फटका बसला. आगीच्या घटनांमध्ये नागरिकांना, स्थानिक प्रशासनाला अग्निशमन यंत्रणेशिवाय आग विझवणे अशक्य ठरते. त्यामुळे तालुक्यासाठी वेगळी अग्निशमन यंत्रणा असणे काळाची गरज आहे.
नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर आठ वर्षांत अग्निशमन यंत्रणा प्रस्तावित असूनही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. नेहमीच मंडणगड नगरपंचायतीला मिळत असल्याची सापत्नपणाची वागणूक या निमित्ताने खरी ठरत आहे. त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. तालुक्यात आगीची दुर्घटना घडली की, नजीकच्या दापोली तालुक्यातील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते. सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या दापोली, खेड या तालुक्यातून ही यंत्रणा पोहोचेपर्यंत एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्या यंत्रणेचा कोणताही उपयोग आगीच्या घटनाक्रमांत होत नाही.
तालुक्यातील वेसवी येथील घराला लागलेल्या भीषण आगीची घटना अजूनही ताजी आहे. या घटनेत तर नजीकच्या श्रीवर्धन तालुक्यातून अग्निशमन बंबाला पाचारण केले होते. अग्निशमन बंब घटनास्थळी पोचेपर्यंत घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते. या घटनांचे गांभीर्य प्रशासनाकडून आजतागायत ओळखलेले नाही. आग लागण्याच्या घटना तालुक्यात वाढत आहेत. अनेकवेळा वणव्याने आंबा, काजूच्या बागा खाक होत आहेत. मंडणगडमध्ये पर्यटनस्थळांची संख्या वाढल्याने मंडणगड शहराला महत्त्व प्राप्त होत आहे. शहरीकरण वाढत असल्याने इमारतींची संख्याही वाढणार आहे. हे लक्षात घेऊन नगरपंचायतीसाठी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
चौकट
शासनस्तरावर पावले उचलणे गरजेचे
आगीमुळे निर्माण होणाऱ्या दुर्घटनांनंतर तालुक्याला स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा मिळणे आवश्यक आहे. अशा यंत्रणा मागवण्यासाठी शासकीय सोपस्कार करण्यात येतात; मात्र ते शासनपातळीवर लाल फितीत अडकत असल्याने त्याची झळ नागरिकांना बसते. त्यामुळे नगरपंचायतीला मिळणारी अग्निशमन यंत्रणा शहरासह तालुक्यात वापरता येईल, हे लक्षात घेऊन शासनस्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे.
कोट
अग्निशमन यंत्रणेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. याबाबत नगरपंचायतीला संबंधित अग्निशमन संचालनालय विभागाकडून लवकर कार्यवाही अपेक्षित आहे. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- अभिजित कुंभार, मुख्याधिकारी, मंडणगड, नगरपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.