महावितरण आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्‍यक

महावितरण आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्‍यक

Published on

महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्‍यक

लोकेश चंद्र ः महावितरणचा वर्धापन दिन मुंबईत उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ ः ‘‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप आदी योजनांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात नावलौकिक मिळवला आहे. ऊर्जा परिवर्तनाचे महावितरणचे मॉडेल जगासाठी मोठे उदाहरण ठरणार आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. मात्र, महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध होऊन मिशन मोडवर काम करण्याचा निर्धार करावा,’’ असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
महावितरणचा २० वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड, मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकेश चंद्र बोलत होते. विशेष अतिथी म्हणून म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (संचलन तथा प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. चंद्र म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने ऊर्जा परिवर्तनाचा आराखडा तयार केला असून त्याची यशस्वी अंमलबाजवणी करण्यात येत आहे. या ऊर्जा परिवर्तनामुळे महावितरणच्या वीज खरेदीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. आगामी काळात विजेची मागणी ४५ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचणार असून त्यासाठी महावितरणकडून यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महावितरणच्या ऊर्जेची स्थापित क्षमता ८२ हजार मेगावॅटपर्यंत वाढणार असून वापरात न येणारी ऊर्जा साठवून ठेवण्याची यंत्रणा महावितरणकडून उभारण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविण्याचे महावितरणचे नियोजन जगासाठी मॉडेल ठरणारे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी व तक्रार निवारणामध्ये सुधारणा करावी. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या हितासाठी असून त्यामुळे ग्राहकांच्या बिलिंगच्या तक्रारी राहणार नाहीत. ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या फायद्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन लोकेश चंद्र यांनी केले. प्रा. गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर व्याख्यान झाले. अधिकारी ललित गायकवाड यांनी आभार मानले.
---
अधिक जोमाने काम करणे गरजेचे!
यावेळी श्री. पाठक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेली प्रगती उल्लेखनीय असून स्पर्धेच्या युगात सक्षम होण्यासाठी महावितरणने अधिक जोमाने काम करणे आवश्‍यक आहे.’’ संचालक राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. ‘‘महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण राज्यात राबविलेली विद्युत सुरक्षा मोहीम अशीच प्रभावीपणे अमलात आणावी,’’ असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com