मनसेतर्फे खेडमध्ये रोपांचे वाटप
मनसेतर्फे खेडमध्ये
वडाच्या रोपांचे वाटप
खेड ः महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची फांदी न मोडता वडाच्या रोपाची पूजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोफत वडाची रोपे वाटण्यात आली. या कार्यक्रमात खेड शहरातील असंख्य महिला सहभागी झाल्या. या कार्यक्रमामध्ये खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, भालचंद्र साळवी, मिलिंद नांदगावकर, प्रदीप भोसले, प्रसिद्धी माध्यमप्रमुख सर्वेश पवार, मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा पूनम पाटणे, अक्षता दांडेकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
‘आरोग्यवर्धिनी’त
रक्तदात्यांचे रक्तदान
दापोली ः कै. डॉ. प्रशांत मेहता यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त दशानेमा गुजराथी युवक संघटनेतर्फे ‘आरोग्यवर्धिनी’ हा समाजोपयोगी उपक्रम श्री राधाकृष्ण मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत भव्य महारक्तदान शिबिर व मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच डॉ. जयवंत जालगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. सुधीर बुटाला यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या आरोग्य उपक्रमात एकूण १५० नागरिकांनी रक्तदान केले तर १३० नागरिकांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. या शिबिरासाठी सायन ब्लड बँक, मुंबई यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. मोफत नेत्रतपासणीसाठी डॉ. पवन सावंत यांचे सहकार्य मिळाले. दापोली वनविभागानेही या उपक्रमाला सहकार्य केले. प्रत्येक रक्तदात्याला एक रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. त्यासाठी रामदास खोत व सूरज जगताप यांचे सहकार्य होते.
खेड येथे शुक्रवारी
मॅरेथॉन स्पर्धा
खेड ः युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, माजी पर्यावरण आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, युवासेना कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जूनला सकाळी १० वा. भरणेनाका येथे युवासेना खेड तालुक्याच्यावतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्र.१० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा युवासेनाप्रमुख अजिक्य मोरे यांनी दिली.
‘होडे वाचनालया’तर्फे
विद्यार्थ्यांचा गौरव
संगमेश्वर ः तालुक्यातील आरवली येथील श्रमिक कृषी संवर्धन संस्था आणि विलास होडे स्मृती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे आंबतखोल येथील कै. जी. के. खेतल सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मिलिंद कडवईकर यांनी ''करिअर निवडताना'' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, करिअर हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग असून, नुसते गुण व मित्रमैत्रिणींची आवड लक्षात घेऊन करिअर निवड न करता स्वतःची आवड लक्षात घेऊन करिअर निवडावे. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अमर भाट यांचा गौरव करण्यात आला. तसेच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर निवड झाल्याबद्दल रोहन शिगवण, पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल प्रणय जाधव, एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. सुदर्शन भुवड, डॉ. अनिकेत कांबळे, पोलिसपदावर निवड झाल्याबद्दल प्रियांका भुवड यांचे विशेष सत्कार करण्यात आले. साक्षी सुवरे हिने नीट परीक्षा देताना बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३६० गुण मिळवून देशात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. युवा साहित्यिक अभय शिगवण याचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.