मराठा महासंघातर्फे
वक्तृत्व स्पर्धा

मराठा महासंघातर्फे वक्तृत्व स्पर्धा

Published on

मराठा महासंघातर्फे
वक्तृत्व स्पर्धा
ओटवणे ः पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्गतर्फे ४ जुलैला सकाळी १० वाजता कुडाळ मराठा समाज हॉल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा लहान व खुल्या गटात होणार आहे. लहान गट १४ वर्षांपर्यंतचा असून ३० जूनपर्यंत १४ वर्षे पूर्ण झालेले स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. लहान गटासाठी ‘पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे कार्य’ व खुल्या गटासाठी ‘पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची सावंतवाडी संस्थानची सामाजिक सुधारणा’ हा विषय आहे. खुल्या गटासाठी अनुक्रमे १५००, १०००, ७५० रुपये व प्रत्येकी ट्रॉफी, तर लहान गटासाठी १०००, ७५०, ५०० रुपये व प्रत्येकी टॉफी आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेच्या लहान गटातील स्पर्धकाला ४ ते ५ मिनिटे आणि खुल्या गटासाठी ६ ते ७ मिनिटांची वेळ देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० जूनपूर्वी नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी गणेश नाईक, विनय गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केले आहे.
..................
मालवण-बेळणे मार्गावर
अस्वच्छतेमुळे दुर्गंधी
मसुरे ः मालवण-बेळणे मार्गावरील विरण पोईप पुलाच्या शेजारी पोईपच्या बाजूने व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक बाटल्या व अन्य कचरा टाकून प्रदूषण करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल पोईप गावातील मुंबई स्थित महिला स्नेहा नाईक यांनी सोमवारी (ता. ९) पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक व सदस्य पंकज वर्दम यांना टाकलेल्या प्लास्टिक कचऱ्याबाबत जाब विचारला. विरण पुलाशेजारी पोईपच्या दिशेने मागील काही वर्षे प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा टाकून त्या ठिकाणी घाण केली जाते. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथील परिसर अस्वच्छ झाला असून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे, याकडे लक्ष वेधले. यावेळी पोईप ग्रामपंचायतीच्या वतीने कचऱ्याबाबत लवकरच कार्यवाही साफ करण्यात येईल. कचरा टाकण्याबाबत संबंधितांना योग्य ती सूचना देण्यात येईल, असे आश्वासन सरपंच नाईक यांनी स्नेहा नाईक यांना दिले.
.....................
धोकादायक फांद्यांची
कुडाळमध्ये छाटणी
कुडाळ ः गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह गावागावांत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी महावितरण विभागाने पावले उचलली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने महावितरणने कुडाळ शहरात ट्री कटिंगची मोहीम हाती घेतली आहे. वीज वाहिन्यांवर झुकलेल्या वेली किंवा स्पर्श झालेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांवर व वीज खांबावर मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्या लटकलेल्या असतात. त्या महावितरणकडून पार्श्वभूमीवर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जाते. साधारण मेच्या अखेरीस ही साफसफाई सुरू होते; मात्र यावर्षी मेमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसामुळे महावितरणचे हे काम रखडले होते. त्यानंतर वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब व वाहिन्या तुटून महावितरणचे मोठे नुकसान झाले. सध्या पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे महावितरणने या कामाला जोरात सुरुवात केली आहे.
.................
काळेथरमध्ये १३ पासून
रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
मालवण ः डी.सी.सी. वायरी मित्रमंडळातर्फे ‘एक गाव एक संघ’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा १३ ते १५ जून या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये काळेथर डोब मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख २१,००० रुपये तर द्वितीय १०,००० रुपये तसेच वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
------
सहकारी संस्थांसाठी
२१ जूनला कार्यशाळा
मालवण ः ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’ निमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आणि मालवण तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनला दैवज्ञ भवन येथे सहकारी संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com