काँग्रेसची कणकवलीत आज मशाल फेरी

काँग्रेसची कणकवलीत आज मशाल फेरी
Published on

kan113.jpg
69798
कणकवली येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना इर्शाद शेख. शेजारी विजय सावंत, प्रवीण वरूणकर आदी
--------
काँग्रेसची कणकवलीत आज मशाल फेरी
इर्शाद शेखः आंबेडकरभवनापासून पटवर्धन चौकापर्यंत फेरी
कणकवली, ता. ११ः विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानाच्या जिवावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याबाबत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्रिय निवडणूक आयोगाकडे मागितलेली माहिती दिली जात नाही. या निषेधार्थ जनमानसात जागृत व्हावी या हेतूने काँग्रेसतर्फे मशाल यात्रेचे आयोजन केले आहे. कणकवलीमध्ये उद्या (ता.१२) सायंकाळी साडेसहा वाजता आंबेडकर पुतळ्यापासून पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही जनजागृती मशाल फेरी निघणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.
येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्षा आयशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत आदी उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले, राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडे याबाबत सर्व माहिती मागवली. काही पुरावेही दिले. निवडणूक आयोगाकडे काही प्रश्न केले. परंतु, याची उत्तरे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देत आहेत. मुळात हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला असताना भाजपच्या मंडळींना त्याचे उत्तर देण्याची काय गरज. तुम्ही बोगस मतदानातून निवडून आलात हे आता सिद्ध झाले आहे. हीच माहिती ग्रामीण आणि शहरी भागात पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनजागृती मशाल यात्रा आयोजित केली आहे. ज्या नागरिकांचे संविधानावर प्रेम आहे विश्वास आहे. लोकशाही टिकवायची आहे. अशा सर्वांनी यात सहभाग घ्यावा. आंबेडकर प्रेमी, निर्भय चळवळ व अन्य चळवळीत काम करणाऱ्यांनी यात सहभागी व्हावे. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाकडून दिली जात नाहीत. त्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर आता जनमानसामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची ही तफावत आहे. ती आश्चर्यकारक आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर सहा वाजल्यानंतर जे पाच टक्के मतदान झाले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडून दिले जात नाही. त्यामुळे राज्याच्या विधानसभेची निवडणूक ही पूर्वनियोजित होती. हे सिद्ध होते. मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड करताना कायद्यातही बदल केला आहे. यात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मत विचारातच घेतले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच निर्णय घेतात. या विरोधात आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसने मशाल यात्रा आयोजित केली आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com