पत्ता शोधण्यासाठी टपाल विभागाची डिजिपिन सेवा

पत्ता शोधण्यासाठी टपाल विभागाची डिजिपिन सेवा

Published on

पत्ता शोधण्यासाठी टपाल विभागाची ‘डिजिपिन’ सेवा
डिजिटल पिनकोडचा उपयोग ; इस्रोच्या सहकार्याने प्रणाली विकसित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः घरपोच पार्सल मागवणार असाल किंवा कुणाला पाठवणार असाल अथवा पत्र लिहिणार असाल तर आता पिनकोडची आवश्यकता नाही. त्यासाठी टपाल विभागाने डिजिपिन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये स्थान निर्देशांकांवर आधारित डिजिटल पिनकोड असणार आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यातील पत्ता शोधणे अगदी सोपे होणार असून, कुरिअर किंवा पार्सल योग्य पत्त्यावर जाण्यास मदत होईल, अशी माहिती रत्नागिरीतील डाक अधीक्षक ए. डी. सरंगळे यांनी दिली.
सध्या पत्र पाठवण्यासाठी वापरतो तो पिनकोड ६ आकडी असतो. भारतातील कोणत्याही क्षेत्राला डाक विभागाने दिलेली ती ओळख असते; परंतु आपण पाठवलेले पत्र एखाद्याला अचूकपणे पोहोचवता यावे म्हणून डिजिपिन नावाची नवी ओळख भारतीय डाक विभागाने तयार केली आहे. सध्या देशात अशी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही, जिच्या मदतीने घराचा अचूक पत्ता सहजपणे शोधता येईल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्याने तयार करण्यात येणारा डिजिटल पत्ता आयडी अनेक बाबतीत उपयुक्त ठरणार आहे. हे आयडी एकप्रकारे घराचाच आधार क्रमांक असणार आहे. खूप मोठा परिसर दर्शवणाऱ्या ६ अंकी पिनकोडऐवजी अचूक स्थान दर्शवणारा १० आकड्यांचा डिजिपिन लवकरच वापरात येईल. तुम्हाला तुमच्या घराचा डिजिपिन हवा असेल तर डिजिपिनच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टिम तुम्हाला १० अंकी किंवा अक्षरी युनिकोड देईल. हा पत्ता तुमचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक स्थान दर्शवतो. भविष्यात भारतीय डाक -खात्याच्या सेवा ऑनलाइन डिलिव्हरी आणि सरकारी यंत्रणा याच डिजिपिनचा वापर करतील, असे सरंगळे यांनी सांगितले.
भारतीय डाकखात्याने आयआयटी हैद्राबाद आणि इस्रोसोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीअंतर्गत देशाला ४ बाय ४ मीटरच्या छोट्या आकारात विभाजित करण्यात आले आहे. प्रत्येक भागाला एक युनिक आयडी देण्यात आला आहे. हा दहा अक्षरांचा समूह असेल त्याला डिजिपिन असे म्हटले जाते. हा कोड अक्षांश आणि रेखांशावर आधारित आहे.

चौकट
डिजिपिनचा उपयोग
डिजिपिन उपयोग फक्त कुरिअर आणि पार्सल डिलिव्हरीपुरता मर्यादित नाही. याचा वापर आपत्कालीन सेवासांठीदेखील होऊ शकतो. उदा. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमचा डिजिपिन शेअर करून पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमनदलाकडे तातडीने मदत मागवू शकता. डिजिपिनमुळे तुमचे अचूक स्थान शोधणे या सेवांना सोपे होईल याशिवाय डिजिपिनचा वापर लॉजिस्टिक, कुरिअर डिलिव्हरी आणि अगदी कॅब बुकिंगासाठीही करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com