दोडामार्ग वीज समस्येवर विस्तृत चर्चा

दोडामार्ग वीज समस्येवर विस्तृत चर्चा
Published on

swt1118.jpg
69922
दोडामार्गः नुतन उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी यांची नगरसेवक संतोष नानचेंसह व्यापाऱ्यांनी भेट घेत तालुक्यातील विज समस्येवर चर्चा केली.

दोडामार्ग वीज समस्येवर विस्तृत चर्चा
नगरसेवक नानचेंसह व्यापाऱ्यांचा पुढाकारः नुतन उपकार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ः येथील महावितरणच्या कार्यालयात नव्याने दाखल झालेल्या उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी यांची नगरसेवक संतोष नानचे व व्यापाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले. यावेळी दोडामार्ग शहरातील व तालुक्यातील सततच्या भेडसावणाऱ्या वीज समस्येवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
नगरसेवक नानचे यांनी शहरासह तालुक्यात सतत विजेचा लंपडाव सुरूच असतो. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचा व ग्राहकांचा देखील रोष महावितरणला सोसावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली सेवा मिळणे आम्हा सर्व शहरवासीयांना आपल्याकडून अपेक्षित असल्याचे सांगितले.
यावर नूतन उपकार्यकारी अभियंता हत्तरगी म्हणाले, ‘‘मी नुकताच कार्यभार स्वीकारला असून तालुक्यात येणाऱ्या सर्व लाइन तपासल्या आहेत. त्याशिवाय कोणत्या भागात जास्त समस्या उद्भवतात त्याचाही अभ्यास केला आहे. सध्या आडाळी एमआयडीसीत नवीन सबस्टेशनचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत्त पोल टाकून सबस्टेशनपर्यंत वीज आणून ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे. या संदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांशी नुकतीच बैठक झाली. त्यामुळे इन्सुली येथून जंगल भागातून येणारी वीज खंडित झाल्यास तोपर्यंत आडाळी एमआयडीसीतून वीज पुरवठा सुरळीत ठेवता येईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘इन्सुली येथून दोडामार्ग तालुक्यात येणारी वीज ही पूर्णतः जंगल भागातून येते. त्यामुळे पावसात वादळी वाऱ्यामुळे या भागातील झाडे तुटून पडतात. परिणामी तालुक्याचा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे पावसाच्या अगोदर ही पूर्ण लाइन सुरळीत ठेवण्यासाठी काम सुरू केलेले आहे. तसे नियोजन देखील केले असून येणाऱ्या तीन ते चार दिवसांत ते पूर्ण होईल.’’
महालक्ष्मी कंपनीची साटेली–भेडशीपर्यंत वीज आलेली आहे, ती स्वतंत्र फिडर टाकून दोडामार्गला देण्यात यावी. यासाठी आम्ही गेल्या चार- पाच वर्षांपासून मागणी करत आहोत. ही लाइन वीजघर दोडामार्ग मार्गालगत स्वतंत्र फिडर टाकून दोडामार्ग शहराला मिळावी, अशी मागणी केली होती. यावर हत्तरगी म्हणाले, ‘‘येणाऱ्या काळात प्राधान्याने यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच आडाळी एमआयडीसीतील सबस्टेशन, इन्सुली त्याशिवाय महालक्ष्मीची वीज अशाप्रकारे तीन पर्याय जर शहराला मिळाले तर एकाला काही समस्या उद्भवल्यास दुसरा पर्याय निवडता येईल जेणेकरून वीज पुरवठा खंडित होणार यासाठी प्रथमतः प्रयत्न करणार आहे.’’
महावितरणला जेव्हा काही कामांसाठी निधीची आवश्यकता असेल त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच महावितरणला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही व्यापारी देणार असल्याचे नानचे यांनी स्पष्ट केले. यावेळी सागर शिरसाट, सुधीर चांदेलकर, फोंडू हडीकर, विशांत परमेकर, सुमंत मणेरीकर, शिवम पांचाळ, संतोष बोर्डेकर आदी उपस्थित होते.

चौकट
‘भूमिगत’ प्रश्न लवकरच मार्गी
मागील आठवड्यात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत दोडामार्ग शहरात येणारी मुख्य वीज वाहिनी भूमिगत करून मिळावी, अशी मागणी आम्ही केली असून पालकमंत्री राणे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तुम्ही या संदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे का ? याबाबत विचारणा केली असता हत्तरगी म्हणाले की, आम्ही तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. त्यामुळे तोही प्रश्न लवकरच निकाली लागेल, असेही हत्तरगी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com